Kolhapur Panchganga River Pollution : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीमध्ये प्रदुषण झाल्याने हजारो मासे मृत्यूमुखी पडत आहेत. मागच्या दोन दिवसांपासून नदीला मलयुक्त व रसायनमिश्रित सांडपाणी येत आहे. त्यामुळे पाण्याला गढूळ, काळेकुट्ट रंग आला असून, उग्र वास येत आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे तडफडन मत्य पावत आहेत. त्यामुळे सुज्ञ नागरिकांच्या तक्रारीमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांनी तेरवाड बंधारा येथे पाहणी करुन दूषित पाण्याचे नमुने घेतले.
शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधारा ते शिरढोण पुलापर्यंत पक्ष्यांचे थवे माशांना खाण्यासाठी येत आहेत. दरम्यान याप्रकरणी दुषित पाण्याची पाहणी करण्यासाठी शिरोळ तालुक्यात आलेल्या प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना स्वाभिमानी संघटनेचे बंडू पाटील, विश्वास बालीघाटे यांनी दुषित पाणी पाजवण्याचा प्रयत्न केला. तर, मच्छिमार करणाऱ्या बागडी समाजाने चांगलेच धारेवर धरत नदी प्रदुषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी अधिकारी हरबड यांनी दुषित पाण्याचे नमुने घेऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले.
दुषित पाण्याची तक्रार स्वाभिमानीचे बंडू पाटील यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केल्याने गुरुवारी दुपारी हरबड तेरवाड बंधारा येथे आले होते. यावेळी पाटील, बालीघाटे यांच्यासह नदीकाठावरील रहिवासी, मच्छीमार करणारे बागडी समाज यांनी तीव्र भावना व्यक्त करत अधिकारी हरबड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले होते.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी दूषित पाण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊनही इचलकरंजी महापालिका अथवा नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. पंचगंगा प्रदुषीत करणारे निवांत आहेत तर प्रदूषण नियंत्रण मंडळही निष्क्रिय बनले आहे असा प्रश्न उपस्थित करुन पंचगंगा काठच्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अधिकारी हरबड यांनी नदी प्रदूषित झाल्याचे मान्य करत इचलकरंजी महापालिकेच्या सांगली नाका येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी - केली. यावेळी विनाप्रक्रिया सांडपाणी नाल्याद्वारे पंचगंगा नदीत प्रवाहित होत - असल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना खडसावत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ - अधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी अहवाल पाठविण्याचा इशारा दिला होता.
त्यामुळे महापालिका या कारवाईला घाबरून नदीपात्रात सोडणारे प्रदूषित पाणी थांबवतील, अशी आशा पंचगंगा काठच्या नागरिकांना होती. मात्र, शुक्रवारी दिवसभर नदीपात्रात दूषित पाण्याचे प्रमाण वाढले होते. संपूर्ण नदीपात्रात गढळ पाण्याचे दिसत होते.
रासायनिक घटकांमुळे पाण्यावर फेस येत असून, मासे मृत्युमुखी पडत होते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भय नाही, तर अभय कोणाचे आणि कशाचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.