Sugarcane Factories Season : दिवाळीपूर्वीच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू व्हायचा परंतु यंदा निवडणुका आणि पावसाच्या विलंबाने यंदाचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. याचबरोबर विधानसभेचे मतदान २० नोव्हेंबरला असल्याने परराज्यातून येणारे ऊस तोड मजूर गावाकडेच अडकल्याने हंगाम वेळेत सुरू होणार का असा प्रश्न समोर आहे. अशातच राज्यातील अनेक साखर कारखानदार विधानसभेच्या रिंगणात असल्याने गुलालानंतर म्हणजेच २५ नोव्हेंबरनंतरच अनेक साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार आहे.
यंदा राज्य शासनाने १५ नोव्हेंबरनंतर साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करावेत, असा आदेश काढला आहे. दिवाळी संपल्याने १५ नोव्हेंबरपूर्वी ऊस तोड मजूर कारखाना तळावर येतील, असा अंदाज होता. पण, विधानसभेचे २० नोव्हेंबरला मतदान असल्याने मराठवाड्यातील मजूर तिथे अडकून पडणार आहेत. त्यामुळे हंगाम २५ नोव्हेंबरनंतरच सुरू होणार असून, हंगाम १ डिसेंबरपासून खऱ्या अर्थाने गती घेणार आहे. हंगाम उशिरा सुरू झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पहिल्या दीड महिन्यात आडसाल व सुरुच्या लागणीची तोड होणार आहे.
रंगतदार निवडणुकीमुळे मजुरांना कोणी सोडेना
मराठवाड्यात सर्वच ठिकाणी अटीतटीची लढाई आहे. त्यात मनोज जरांगे-पाटील यांच्यामुळे सर्व पक्षीयांनी सावध भूमिका घेतली आहे. आपल्या हक्काचे मजूर मतदार जाऊ नयेत, म्हणून उमेदवारांनी दक्षता घेतली आहे. मतदान झाल्यानंतरच त्यांना आपापल्या जिल्ह्यातून सोडले जाऊ शकते. तसा निरोप साखर कारखान्यांना आला आहे.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
दरवर्षी ऊस दराचे आंदोलन झाल्यावर आॕक्टोबर महिन्यातील शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होतो. यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सुगी पुढे गेली. काढणीस आलेल्या पिकांच्या काढणीत परतीच्या पावसामुळे व्यत्यय आला होता. जनावरांच्या वैरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या भुईमुगाच्या जाळ्या, भाताचे पिंजार पूर्णपणे कुजले आहे.
शासनाने कारखान्याने १५ नोव्हेंबरनंतर गळीत हंगाम सुरू करावा, असा आदेश काढला आहे. त्यामुळे वैरणीसाठी उसाचे वाडे उपलब्ध होईल, अशा शक्यता होती, पण परतीचा पावसामुळे शिवारात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने ट्रक, ट्रॕक्टर ट्रालीने ऊस वाहतूक करणे कठीण होणार असल्यामुळे हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.