ShriGuru Paduka Darshan : सुखी जीवन जगण्याची ही वैचारिक क्रांती

Shri Family Guide Programme : आपण दु:खी आहोत, जीवन हे दुःखाचा सागर आहे, अशा कपोलकल्पित कल्पनांना मागे सारून जीवन हे आनंदाचे, सुखाचे, ऐश्वर्याचे एक जगण्याचे साधन आहे.
ShriGuru Paduka Darshan
ShriGuru Paduka DarshanAgrowon

New Mumbai : आपण दु:खी आहोत, जीवन हे दुःखाचा सागर आहे, अशा कपोलकल्पित कल्पनांना मागे सारून जीवन हे आनंदाचे, सुखाचे, ऐश्वर्याचे एक जगण्याचे साधन आहे. या वैचारिक क्रांतीची सुरुवात आजच्या कार्यक्रमातून होणार आहे, असा विश्वास अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ व विश्व फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांनी व्यक्त केला.

सकाळ आयोजित श्री फॅमिली गाईड उपक्रमाअंतर्गत मंगळवारी वाशी येथील श्री गुरूपादुका दर्शन उत्सवात डॉ. राजिमवाले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री एम सत्संग फाऊंडेशनचे प्रमुख पद्मभूषण श्री एम., सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार उपस्थित होते. डॉ. राजिमवाले यांनी आजचा कार्यक्रम एका नव्या सूर्योदयाची ही चाहूल आहे. एक सुवर्णकाळ उगवतोय आणि त्याचा एक प्रतीक म्हणून जणू आजचा हा कार्यक्रम आहे.

इतिहासामध्ये अनेक घटना घडत असतात. सहज इतिहासामध्ये वाईट घटनांची नोंद होते. मात्र, या कार्यक्रमाची आणि यातून झालेल्या सगळ्या परिश्रमाची नोंद इतिहास अवश्य घेईल. पहिल्यांदा इतिहासामध्ये सर्व संत महंत अवतार सद्‌गुरू यांच्या पादुका एका मंचावर उपस्थित आहेत. इतिहासामध्ये असे घडलेले नाही. श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, श्री साईबाबा यांच्या तिघांच्याही पादुका मूळ अधिकारी मंचावर उपस्थित व्हाव्‍या, असे बहुतेक पहिल्यांदाच झाले आहे.

त्यामुळे ही उगवणाऱ्या नव्या युगाची ही चाहूल असे म्हणता येईल. या कार्यक्रमातून चांगले विचार प्रचलित व्हावे आणि हाच संदेश देण्यासाठी म्हणून सर्व सद्‌गुरू एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेले आहेत. या सगळ्या सद्‌गुरूंचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या गावी जायची वेळ आली तर, काही शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. काही तास रांगेमध्ये उभे राहावे लागेल. त्याच्यानंतर लांबून कुठेतरी धर्मग्रहांमध्ये दर्शन घ्यावे लागेल; पण आज या कार्यक्रमांमध्ये काही फुटांवरून काही मिनिटांमध्ये दर्शन मिळत आहे.

ShriGuru Paduka Darshan
Shriguru Paduka Utsav : ।। संत दर्शनी हा लाभ । पद्मनाभ जोडीला ।।

या सगळ्या संतांच्या या एकत्रित येण्यामागे इथून बाहेर पडताना एक नव व्यक्ती, वैचारिक क्रांती घेऊन बाहेर पडणार आहोत. या सर्व संतांच्या महंतांच्या ज्या शिकवणी आहेत. त्या आत्मसात करून घेऊन बाहेर जाणार आहोत. त्यांचे विचार त्यांची शिकवण ही कायम आठवणीत राहावी, यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाचा‘श्री फॅमिली गाईड’ हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे डॉ. राजिमवाले यांनी यावेळी सांगितले.

मुंबई ही अध्यात्मनगरी

मुंबई ही मायानगरी मानली जाते. मात्र, मुंबईतील या कार्यक्रमापासून बहुतेक मुंबई ही आध्यात्मिक नगरी होईल. या कार्यक्रमाची सुरुवात मुंबईतून व्हावी, ही जणू ईश्‍वराने निवड केली असल्याचे डॉ. राजिमवाले यांनी या वेळी सांगितले.

ॐकार ही ‘ऑल इज वेल’ संकल्पना

ॐकार एक स्पंदन आहे, त्यापासून ब्रह्मांडाची सुरुवात झाली आहे. मला जेव्हा मन शांत वाटत नाही, मी तणावात असतो, तेव्हा मी ॐकार करतो. ॐकार ही ‘ऑल इज वेल’ संकल्पना आहे, असे ‘संतुलन आयुर्वेद’चे एमडी सुनील तांबे यांनी सांगितले. त्यांनी या वेळी ॐकाराची महती सांगितली.

या वेळी सुनील तांबे म्हणाले की, आपले शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. ॐकार म्हणण्याने पूर्ण शरीरातील पंचमहाभूतांचे संतुलन करता येते. आपले स्वास्थ्य चांगले राहते. ॐकार आपला मित्र होऊ शकतो. ॐकाराचे तीन प्रकार आहेत. त्यांचे उच्चारण कसे करावे, याचेही मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. ॐकार तीन प्रकारे म्हणता येतो. ऱ्हस्व म्हणजे अत्यंत कमी वेळात म्हटलेला.

जलद ॐकार म्हणताना पोटाची हालचाल लोहाराच्या भात्यासारखी होते. ऱ्हस्व ॐकार म्हटल्याने भस्त्रिका, कपालभाती केल्याचा लाभ होतो आणि तो शरीराच्या खालच्या भागावर अधिक कार्य करतो. दीर्घ पद्धतीने ॐकार म्हटला तर छाती व फुप्फुसांवर कार्य करतो आणि लोम-अनुलोमचा लाभ देतो. अनुनासिकयुक्त प्लुत पद्धतीने म्हणजेच अतिशय लांबवून ॐकार म्हटला तर मस्तकावर काम करतो. ॐकार गुंजनातून ऐकू येणारी आस किंवा वातावरणाने दिलेल्या प्रतिध्वनीकडे लक्ष ठेवावे. म्हणजे ऱ्हस्व ॐ म्हणताना ‘अ’काराला, दीर्घ ॐ म्हणताना ‘उ’ काराला, प्लुत ॐ म्हणताना ‘म’काराला महत्त्व दिल्यासारखे आहे, असेही तांबे यांनी यावेळी सांगितले.

ShriGuru Paduka Darshan
Shriguru Paduka Darshan Utsav : दैवी पर्वणीची सांगता !

हरी का ध्यान लगा मन मेरे...

प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या अद्‍भुत सुरांनी आज हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले. ‘सांवरो मंगल रूप निधान, जा दिन तें हरि गोकुल प्रगटे दिन दिन होत कल्याण...’ या भक्तिगीताने सूरमयी सोहळ्याची सुरुवात केली. त्यांनी सादर केलेल्या भावभक्तीच्या सांगीतिक कार्यक्रमाला गुरुसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘सकाळ’तर्फे श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅमअंतर्गत श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ गायक हरिहरन यांचा सांगीतिक कार्यक्रमाची पर्वणी उपस्थित गुरूसेवकांना अनुभवायला मिळाली. या कार्यक्रमात सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांची भक्तिगीते ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नवी मुंबईकरांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘सकाळ’ माध्यम समूहाचे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांनी शाल, श्रीफळ आणि बुके देऊन त्यांचे स्वागत केले.

श्री गुरूंच्या पादुकांचा दर्शन सोहळा अशा पद्धतीने भारतात प्रथमच होत आहे. हा माझ्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहे. एवढ्या मोठमोठ्या गुरूंचे आज मी दर्शन घेतले आहे. मला या ठिकाणी निमंत्रित केले, या दर्शन सोहळ्याचा छोटासा भाग होता आले, त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो.
हरिहरन, ज्येष्ठ गायक

भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव

‘हरी का ध्यान लगा मन मेरे, मीट जाये सब दु:ख तेरे’ या भक्तिगीताने भाविकांना खिळवून ठेवले. ‘राम कृष्ण हरी, गोपाल कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, गोपाल कृष्ण हरी’च्या तालात भाविक तल्लीन झाले. ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल..’, ‘हरी का ध्यान लगा मन मेरे’, ‘सुबह सुबह कर ले शिव का नाम, करले बंदे ये शुभ काम’, ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..’ अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांच्या रचना त्यांनी सादर केल्या. त्यामुळे भाविकांसाठी हा अविस्मरणीय असा अनुभव होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com