Shriguru Paduka Darshan Utsav : दैवी पर्वणीची सांगता !

Shri Family Guide Programme : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅमअंतर्गत आयोजित दोनदिवसीय ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता.
Shriguru Paduka Darshan Utsav
Shriguru Paduka Darshan UtsavAgrowon

New Mumbai : सद्‍गुरू वाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी... अशी भावना मनात बाळगलेल्या हजारो गुरुभक्तांना दोन दिवस संत व सद्‍गुरूंच्या पादुकांवर नतमस्तक होण्याचा योग आला. अभूतपूर्व अशा पादुका दर्शन उत्सवाला सर्व स्तरांतून भरघोस प्रतिसाद मिळाला. अलोट गर्दीमुळे फुललेला भक्तीचा मळा प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या स्वरांनी आणखीनच बहरला आणि बुधवारी (ता. २७) श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाची भक्तिमय सांगता झाली.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅमअंतर्गत आयोजित दोनदिवसीय ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या हजारो गुरुभक्तांनी या दैवी पर्वणीची ‘याचि देही याचि डोळा’ अनुभूती घेतली आणि भक्तिसोहळ्याचा एक नवा अध्याय लिहिला गेला.

‘झाले सफल जीवन, माय माउली नाम जपता। तृप्त झाला आत्मा, देवा तुझे दर्शन होता॥’ अशीच भावना नवी मुंबईत दाखल झालेल्या गुरुसेवकांच्या चेहऱ्यावर विलसत होती. डोळ्यांत होते तृप्तीचे संपन्न भाव. आपल्या लाडक्या माउलींच्या पादुकांसमोर नतमस्तक होत त्यांच्या दर्शनाचा सोहळा तना-मनात बिंबवत आणि अपार भक्तिरसात न्हाऊन निघत त्यांनी परतीची वाट धरली तेव्हा हरिनामाचा गजर आसमंतात गुंजत होता.

सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी ‘सकाळ’तर्फे नवी मुंबईत दोन दिवस ‘संकल्प ते सिद्धी सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या आशीर्वादाने झालेल्या पादुका दर्शन उत्सव सोहळ्याची ओढ दुसऱ्या दिवशीही कायम दिसली. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी गुरुसेवकांच्या रांगा लागल्या होत्या. दुसऱ्या दिवशीही हरिनामाचा जप, बाल वारकऱ्यांचे सादरीकरण, शंखनाद, दिंडी, माउलींचे रिंगण, अभंगाचे सूर, भक्तीचा ओसंडून वाहणारा निर्मळ झरा आणि डोळ्यात संत-महात्म्यांच्या पादुका दर्शनाची आस असे भावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

Shriguru Paduka Darshan Utsav
Shriguru Paduka Utsav : ।। संत दर्शनी हा लाभ । पद्मनाभ जोडीला ।।

टाळ-मृदंगांच्या गजरात गुरुसेवकांची पावले सद्‍गुरू पादुका मंदिराकडे वळत होती. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून दाखल झालेल्या गुरुसेवकांच्या चेहऱ्यावर कोणताही ताण अथवा थकवा जाणवत नव्हता. उलटपक्षी त्यांच्या आगमनाने सिडको एक्झिबिशन सेंटर अनोख्या उत्साहाने आणि नव्या ऊर्जेने भारून गेले होते. श्री गुरूंच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची रीघ लागली होती, तरीही सर्वांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून पादुकांचे दर्शन घेतले.

रांगेत तासन् तास जात होता, तरीही हिरमोड होऊ न देता त्यांच्या मुखी सुरू असलेला भक्तीचा जागर थांबत नव्हता. एक वेगळीच अनुभूती त्यातून जाणवत होती. गर्दीमुळे कुणाच्याही दर्शनात बाधा आली नाही. एकही गुरुसेवक दर्शनाशिवाय बाहेर राहिला नाही. अखेरचा गुरुसेवक नतमस्तक झाला तेव्हाच अनोख्या भक्तिसोहळ्याची सांगता झाली.

Shriguru Paduka Darshan Utsav
Shriguru Paduka Darshan : श्रीगुरु पादुका दर्शन सोहळा आजपासून

महाराष्ट्र म्हणजे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. एकाच ठिकाणी अशा १८ संत-महात्म्यांच्या पादुकांच्या माध्यमातून भगवंताच्या चरणी लीन होण्याचे भाग्य मिळाल्याने गुरुसेवकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. भक्तिपूर्ण वातावरणात अगदी शांततेत श्री गुरूंच्या चरणी मस्तक टेकवून दर्शन घेता आल्याने गुरुसेवक विशेष समाधानी होते. एकाच ठिकाणी सर्व श्री गुरूंचे दर्शन झाल्याने खऱ्या अर्थाने वारी पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दर्शन सोहळ्याचा बुधवारी शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच गुरुसेवकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात सासवड, जेजुरी, पंढरपूर, पुणे, रायगड, कोल्हापूर, मावळ इत्यादी ठिकाणांहून अनेक दिंडी दाखल झाल्या. जिकडेतिकडे टाळ-चिपळ्यांचा गजर निनादत होता. जय हरी विठ्ठल, श्री स्वामी, ग्यानबा तुकाराम, रामकृष्ण हरी...चा जप प्रत्येक गुरुसेवकाच्या ओठी होता.

सायंकाळनंतर गुरुसेवकांचा ओघ वाढत गेला. तो रात्रीपर्यंत सुरू होता. तुकाराम बीज असल्याने एकाच छताखाली एक नव्हे; तर १८ संतांच्या पादुकांचे दर्शन हजारोंहून अधिक भाविकांना घडले. आत्मिक समाधानाच्या शोधात प्रत्येक गुरुसेवक आपल्या कुटुंबासमवेत पादुका दर्शनासाठी आला होता. परत जाताना मात्र एक वेगळीच ऊर्जा, उत्साह आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ‘धन्य जाहले जीवन, देवा तुझ्या दर्शनाने’ असेच काहीसे भाव प्रत्येकाच्या डोळ्यांत तरळत होते.

प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या भक्तिगीतांनी सोहळ्याची सांगता झाली. तत्पूर्वी ‘श्री फॅमिली गाइड प्रोग्रॅम’च्या चीफ क्युरेटर स्टेफिनी फाइट यांनी गुरूंच्या विचारांचे महत्त्व विशद केले. सुनील तांबे यांनी उपस्थितांना ॐकाराची महती सांगितली. ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांचेही मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. विश्‍व फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांनी जीवनाचे सार सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निहोत्रही करण्यात आले. आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी भाविकांना आध्यात्मिक संदेश दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com