Nana Patole : संकटातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदत नाही

Drought Crisis : शेतकऱ्यांनी अनेक वर्षे मुलाबाळाप्रमाणे सांभाळ केलेल्या शेकडो हेक्टरवरील मोसंबी व डाळिंब बागा दुष्काळात होरपळत आहेत.
Nana Patole
Nana Patole Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : शेतकऱ्यांनी अनेक वर्षे मुलाबाळाप्रमाणे सांभाळ केलेल्या शेकडो हेक्टरवरील मोसंबी व डाळिंब बागा दुष्काळात होरपळत आहेत. दुसरीकडे पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांना वणवण भटकावे लागत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरी व नागरिकांना कोणत्याच प्रकारचा दिलासा दिला नाही.

राज्याचे कृषिमंत्री अभ्यास दौऱ्याच्या नावावर विदेशवारी करीत आहेत. मुख्यमंञी त्यांच्या मूळगावी आराम करीत आहेत, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

Nana Patole
Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

काँग्रेसच्या वतीने आयोजित दुष्काळ पाहणी दौरा दरम्यान आडुळ (ता. पैठण) येथे शुक्रवारी (ता. ३१) नाना पटोले यांनी पाण्याअभावी वाळून गेलेल्या बागांची पाहणी केली, त्या वेळी ते बोलत होते. आडुळ येथील अप्पासाहेब कोल्हे, नंदू जारे यांच्या मोसंबी बाग व रोपवाटिकांची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. या वेळी कल्याण काळे, वजाहत मिर्झा, नामदेवराव पवार, किरण पाटील डोणगावकर, विलास औताडे, माजी मंत्री अनिल पटेल, विनोद तांबे, रवींद्र काळे आदी उपस्थित होते.

श्री. पटोले म्हणाले, की दुष्काळाच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही मदत सरकारकडून करण्यात आली नाही. उलट बँका वसुलीसाठी तगादा लावीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊनही राज्याचे मस्तवाल मंत्री अभ्यास दौऱ्याच्या नावावर जनतेच्या पैशांवर मस्ती करीत आहेत.

Nana Patole
Drought Crisis : फळबागांसाठी हेक्टरी एक लाखाची मदत द्या

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच काँग्रेसने हा दुष्काळ पाहणी दौरा काढला आहे. विधानसभेत याबाबत प्रश्न विचारणार आहे. पैठण तालुक्यात आशियातील सर्वांत मोठे मातीचे धरण असूनदेखील शेतकरी व नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो हे दुर्दैव आहे. ‘हर घर नल से जल’ ही योजना अद्यापही कागदावरच आहे. केंद्र व राज्य सरकारचे दिवस भरले असून जनतेत या सरकारविरुद्ध रोष आहे.

मविआच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळवून देणार

येथील अनेक शेतकरी व ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचत कैफियत मांडली. आम्ही खरीप व रब्बीचा विमा भरला. त्याचा परतावा अद्याप मिळाला नाही. दुष्काळात आमच्या बागा वाळल्या तर अवकाळीने दोन्ही हंगामांतील पिकांचे नुकसान केले.

यातून लागवड खर्चही निघाला नाही. वसुलीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांचे खाते होल्ड (बंद) केल्याने इतर अनुदानाचे पैसेही काढता येत नसल्याने जीव देण्याची वेळ आली आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. या वेळी पटोले यांनी, कोणीही खचून न जाता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहोत, असे सांगत धीर दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com