Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

Drought Update : जगणं मुश्किल झालं आहे गावात पाणी नसल्यामुळं. एकवेळ जनावरांना चारा उसना आणता येईल. परंतु पिण्याचे पाणी आणायचे कुठून.
Drought Crisis
Drought Crisis Agrowon

Parbhani News : जगणं मुश्किल झालं आहे गावात पाणी नसल्यामुळं. एकवेळ जनावरांना चारा उसना आणता येईल. परंतु पिण्याचे पाणी आणायचे कुठून. गावात सरकारी टँकर सुरू झालाय, पण पिण्यासाठी शेतातील विहिरीहून गाड्यावर, डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. विहिरी आटल्यावर येलदरीच्या तळ्याकाठी राहायला जावे लागते की काय, अशी भीती कोरवाडी (ता. जिंतूर) येथील अल्पभूधारक शेतकरी ग्यानदेव कोंडाळ यांनी व्यक्त केली.

जिंतूर तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७३३.४० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना २०२३ मध्ये ४९९.७० मिलिमीटर (६८.१० टक्के) पाऊस झाला. जमिनीतील अपुऱ्या ओलाव्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाली. डोंगराळ भागातील गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे.

Drought Crisis
Drought Crisis : दुष्काळाच्या दाहकतेने अंजीर बागा धोक्यात

देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, केहाळ, दहेगाव हे लघू तलाव कोरडे पडले आहेत. भोसी, आडगाव, पाडाळी या तलावांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. परिणामी, या भागातील शेतकरी, ग्रामस्थासह जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कोरवाडी, ब्राह्मणगाव, मोहाडी, वाघी धानोरा या चार गावांना, तसेच शिवाचीवाडी येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

तसेच १० विहिंरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. शेवडी, भोसी, पिंपळगाव काजळे, कुऱ्हाडी, दहेगाव, दहेगाव तांडा, कावी, कोरवाडी, कोरवाडी तांडा आदी गावातील उन्हाचा पारा वाढत आहे. तसेच पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक बिकट होत आहे. माळरानाच्या दगडगोट्यांच्या हलक्या, मुरमाड जमिनी असलेल्या या भागातील शेतकऱ्यांची दारोमदार खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांवर असते.

Drought Crisis
Drought Crisis : उन्हाच्या तीव्र झळांनी केळी बागा होरपळल्या

रब्बीचे क्षेत्र खूप कमी असते. नोव्हेंबर अखेरीस झालेल्या पावसामुळे रब्बीची पेरणी झाली. परंतु त्यानंतर ओलावा नष्ट झाल्यामुळे रब्बी पिकांची वाढ खुंटली. या भागात खरिपाची सुगी आटोपली की गावात कामे राहात नाहीत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी, मजुरांचा ऊसतोड तसेच अन्य कामांसाठी शहराकडे स्थलांतर हे दरवर्षी ठरलेलच आहे. यंदा दुष्काळामुळे स्थलांतर वाढले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची २३ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असती, तर आमच्या गावाचा पाणीप्रश्‍न निकाली निघाला असता. ही योजना चालूच झाली नाही. मागील दोन आठवड्यांपासून गाव तसेच तांड्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसाच्या तीन खेपा आहेत. परंतु खंडित वीज पुरवठ्यामुळे दोन खेपा होत आहेत.
- गोविंद धांगड, उपसरपंच, कोरवाडी, ता. जिंतूर, जि. परभणी
चार एकर शेती आहे. सोयबीनचा एकरी दोन क्विंटलाचा उतारा आला. जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी ज्वारी बांड झालीय. शेतातील कामे ओटपल्यानंतर विहिरी खोदण्यीची कामे करत असतो. परंतु यंत्राद्वारे विहिरी खोदल्या जात असल्याने कामे मिळना झालीत. गावातील पाण्याची समस्या लई अवघड झालीय.
- माणिक बनसोडे, कोरवाडी, ता. जिंतूर, जि. परभणी
कमी पावसामुळे यंदा सर्वच पिकांच्या उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली. खात्रीशीर पाणी असलेले गावातील आड यंदा मार्च महिन्यातच आटले आहेत. तळ्यात सुद्धा पाणी राहिले नाही.
- गुलाबराव ठोंबरे, शेतकरी, भोसी, ता. जिंतूर, जि. परभणी
ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या आटलेल्या विहिरीत कुऱ्हाडी शिवारात अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणी आणून सोडले आहे. पावसाळ्यापर्यंत गाव तसेच तांड्यावरील पाणीटंचाई अधिक बिकट होऊ शकते.
- संतोष पवार, पिंपळगाव काजळे, ता. जिंतूर, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com