Land Dispute : जमिनीत अनेक हिस्सेदार, अडथळेही अनेक

Shekhar Gaikwad : कूळ कायद्याने कुळाच्या मालकीची झालेली जमीन पुन्हा मूळ जमीन मालकांस मागण्याचा हक्क नाही.
Land
Land Agrowon

- शेखर गायकवाड

Property Dispute : एका गावात भगवान नावाचा एक धनाढ्य शेतकरी होता. भगवान सोबत त्याचे दोन भाऊ व मुले राहत होती. १९५० च्या दशकात वृद्धापकाळाने भगवानचा मृत्यू झाला. भगवान मृत्यू पावल्यानंतर त्याची सगळी प्रॉपर्टी त्याचे भाऊ व मुलांच्या नावावर झाली. १९९० च्या दशकात भगवानचे दोन्ही भाऊदेखील मयत झाले आणि त्यांची मुले, नातू आणि बहिणी अशी एकूण ३७ माणसांची नावे वारस हक्काने सातबारावर लागली.

प्रत्येक कुटुंबातील काही सदस्य नोकरी, धंद्यामुळे परदेशात व शहरात राहायला गेले. त्यांपैकी बहुतेक जण आता त्यांच्या गावीदेखील जात नाहीत. त्यामुळे त्यातील काही जणांना आता शेतजमीन विकून टाकायची आहे. गेल्या १० वर्षांत त्यांपैकी प्रत्येकाने आपल्या हिश्शाची जमीन विकण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणालाच ही जमीन विकण्यात यश आले नाही. कारण गावी जमीन कसणारे जे चारपाच जण होते, त्यांनी प्रत्येक व्यवहारात काही ना काही अडथळे आणले.

पहिले सहा महिने जमीन कोठे आहे, त्याचे चालू सातबारा उतारे, पुढच्या वेळी ८ अ उतारे, कधी जुने फेरफार अशी कागदपत्रे मिळवायला त्यांचा वेळ वाया जात होता. गावच्या चार खातेदारांनी बँकेचं कर्ज काढून ठेवल्यामुळे बँकेचे ना हरकत मिळवायला त्रास व्हायचा. शिवाय एकाने तर, जोपर्यंत जमिनीचे वाटप आपापसात सामंजस्याने होत नाही तोपर्यत कोणाची जमीन कोणती ते सांगता येत नाही, असं सांगून जमिनीचे वाटप होईपर्यंत कोणतीच जमीन विकता येणार नाही असे दिवाणी न्यायालयाकडून आदेश पण मिळविले होते.

त्यामुळे शेवटी कंटाळून प्रत्येकजण विक्री करायचा विचार मनातून सोडून द्यायचा. थोडक्यात, काय प्रत्येकाची जमीन म्हणजेच कोणाचीच नसलेली जमीन अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
सांगावयाचे तात्पर्य म्हणजे एखाद्या जमिनीत अनेक सहहिस्सेदार असले, की जमिनीत सुधारणा करणे, कर्ज काढणे, वाटप करणे, विक्री करणे या गोष्टी सहजपणे करण्यात अडथळे निर्माण होतात. शेतकरी वर्ग पिढ्यान् पिढ्या जमीन आपणाकडेच कशी राहील, यासाठी प्रयत्नशील असतो. तर बाजार व्यवस्थेशी जोडलेला माणूस जमीन विकून काय करता येईल, अशा विचारात असतो.

Land
Land Dispute : कुळांच्या जमिनीचा गुंता

कूळ कायदा अन् मूळ मालक
कसेल त्याची जमीन या तत्त्वावर आधारित कूळ कायदा आला. रामसिंग नावाचा माणूस दादासाहेब यांची जमीन सन १९४५ मध्ये कसत होता. कूळ कायद्यानुसार रामसिंग हा दादासाहेब या जहागीरदार माणसाच्या जमिनीचा कूळ ठरला व १९६२ साली ३२ ग नुसार मालक पण झाला. २० वर्षांनंतर रामसिंगने ही जमीन विकायचे ठरवले.
कूळ कायदा कलम-४३ नुसार रामसिंगने कूळ कायद्यात मिळालेली जमीन विकण्यासाठी प्रांत ऑफिसला परवानगीचे प्रकरण दाखल केले. हे समजल्यावर पूर्वीचे मालक दादासाहेब यांच्या मुलांनी परवानगी देण्यास विरोध केला.

Land
Land Dispute : दानशूर वडील

कुळाला कायद्याने जमीन मिळाली त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही. पण आता कूळ जमीन स्वतः कसणार नसेल तर ती आम्हाला घेण्याचा पहिला हक्क असता पाहिजे. कुळाला जमीन विकायची असल्यास त्यांनी ती मूळ मालकास म्हणजे दादासाहेब यांना विकावी असे त्यांचे म्हणणे होते. दादासाहेबांची हरकत फेटाळून प्रांत ऑफिसरने रामसिंगला जमीन विकण्यास परवानगी दिली.

कूळ कायद्यांच्या ३२ ग अन्वये मालकी हक्क मिळालेली व ३२ मच्या प्रमाणपत्रानुसार कुळांच्या नावे झालेल्या मिळकतीशी मूळ मालकाचा कसलाही संबंध उरत नाही. सदर मिळकत कुळ कायद्याने विहित केलेली परवानगी घेऊन विक्री करता येते. सांगावयाचे तात्पर्य म्हणजे कूळ कायद्याने कुळाच्या मालकीची झालेली जमीन पुन्हा मूळ जमीन मालकांस मागण्याचा हक्क नाही.

- शेखर गायकवाड
ई-मेल- shekharsatbara@gmail.com

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com