
- शेखर गायकवाड
Shekhar Gaikwad Article : एका गावात हनुमंतराव नावाचा एक शेतकरी राहत होता. हनुमंतरावची जमीन शहराला लागून होती. १९७० मध्ये हनुमंतरावने आपली स्वतःची जमीन एका स्वामींच्या मठाला दान देण्याचे जाहीर केले. त्यानुसार हनुमंतरावने स्वामींच्या नावाने जमीन दान देताना केवळ एका स्टॅम्पपेपरवर दानपत्र तयार केले. १५-३० हजार लोकांसमोर सार्वजनिकरीत्या महाराजांना दानपत्र अर्पण करण्याचा सोहळा गावात आयोजित करण्यात आला. स्वामींच्या मठाचे नाव सातबाराला लावण्यासाठी तलाठ्याकडे रीतसर अर्ज केला गेला. काही दिवसांनंतर स्वामींचे नाव सातबारावर लागले. स्वामींनी त्या जागेवर एक छोटा आश्रम तयार केला व काही उर्वरित जागेवर फळझाडे लावली. हनुमंतरावला गावातील सर्व जण दानशूर म्हणून ओळखत असत. ते जिवंत असेपर्यंत स्वामींना कसलीच अडचण नव्हती व मठाचे कामकाज सुरळीत सुरू होते. २५ वर्षांनंतर ही जमीन शहराच्या जवळ आल्याने स्वामींच्या मठाच्या जमिनीचा व आजूबाजूच्या जमिनीचा बाजारभाव प्रचंड वाढला.
शहरातल्या एका बिल्डरची या जागेवर अनेक वर्षांपासून नजर होतीच. आता हनुमंतराव वयाने थकले होते. जमिनीचा बाजारभाव प्रचंड वाढल्यामुळे बिल्डरने स्वतःच्या स्वार्थासाठी हनुमंतरावच्या मुलाला देवदत्तला गाठले व त्याला सांगितले, की तुमच्या वडिलांनी स्वामींच्या मठाला जमीन देताना रजिस्टर दानपत्र केलेले नसल्यामुळे ही जमीन तुम्हाला परत मिळू शकते. या जमिनीची केस नव्याने तुम्ही सुरू केल्यास मी तुम्हाला २५ लाख रुपये देतो. देवदत्तने त्याचे वडील हनुमंतराव जिवंत असेपर्यंत या जमिनीबाबत काहीही केले नाही किंवा कुठलीही केस केली नाही.
हनुमंतराव काही दिवसांनंतर मरण पावल्यानंतर देवदत्तने पुढच्याच वर्षी जमिनीच्या जुन्या नोंदीविरुद्ध कोर्टात केस दाखल केली. एवढ्या वर्षांनंतर केलेल्या अपील अर्जात हनुमंतरावच्या मुलाने देवदत्तने ‘‘आमचे वडील नादान होते. त्यांना महाराजाने फसवून व दारू पाजून एक खोटे दानपत्र केले आहे,’’ असे लिहिले होते. कोर्टात सुनावणीदरम्यान देवदत्तने सांगितले, की माझ्या वडिलांना वेड लागले होते व स्वामींनी नादी लावून व माझ्या वडिलांना फसवून या जमिनीचा व्यवहार केल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. त्या शिवाय या जमिनीचा व्यवहार मठाच्या स्वामींनी संगनमत करून व गैरव्यवहार करून केल्याचे म्हटले. जमीन दान देताना हनुमंतराव दानशूर, उदार, निरपेक्ष असल्याचे वृत्तपत्रात छापून आले होते. तेच वडील मेल्यानंतर पुढच्याच वर्षी आता नादी लागलेले व व्यसनी ठरले होते. विशेष म्हणजे या प्रकरणाचा निकाल देताना अप्पर जिल्हाधिकारी यांनी, ‘‘सदर प्रकरणात दानपत्र करून दिलेल्या हनुमंतरावची ते जिवंत असेपर्यंत म्हणजे २५ वर्षे कसलीही हरकत नव्हती. त्यांनी कधीही दानपत्र फसवून केल्याचे म्हटले नव्हते. ते मयत झाल्यावर मुलगा देवदत्तने अपील केले आहे. त्याची तक्रार मठाच्या स्वामींविरुद्ध नसून वर गेलेल्या त्याच्या वडिलांच्या विरोधात आहे. त्याने ताबडतोब वर गेलेल्या वडिलांविरुद्ध दावा लावला पाहिजे!’’ असा निकाल दिला.
सांगायचे तात्पर्य म्हणजे वडिलांनी धार्मिक कारणांसाठी स्वामींच्या मठाला जमीन दान दिली होती. असे दानशूर वडील मेल्यावर दोन वर्षांत मूर्ख ठरू शकतात व ते देखील स्वतःच्या मुलाकडून! हे सगळे कलियुगातच शक्य आहे.
शेतकऱ्यांनो, सावध राहा!
एका शहरात मनोहर नावाचा एक व्यापारी राहत होता. मनोहरने शहराजवळच्या एका गावात १० एकर जमीन खरेदी केली. मनोहरने जमीन केवळ एक गुंतवणूक म्हणून खरेदी केली होती. जमिनीचे बाजारभाव वाढतील या हिशेबाने मनोहरने त्या जागेची खरेदी करून सातबारावर
स्वतःचे नाव सुद्धा लावून घेतले होते. मनोहर स्वतःच्या जमिनीवर फारसा लक्ष देत नव्हता. तो फक्त वर्षातून एकदा गावात जाऊन तलाठ्याकडे जमीन महसूल भरून सातबारा उतारे आणायचा. मनोहर त्याची जमीन स्वतः पण कसत नव्हता आणि इतरांना पण ती जमीन कसायला देत नव्हता. दोन-तीन वर्षे उलटल्यानंतर आजारपणामुळे आणि व्यापाराच्या कटकटीमुळे मनोहरचे स्वतःच्या शेतजमिनीकडे दुर्लक्ष झाले.
तीन वर्षांनंतर जेव्हा मनोहर स्वतःची जमीन पाहायला गावात गेला तेव्हा मनोहरला आश्चर्याचा धक्का बसला. मनोहरच्या जमिनीतून एक डांबरी रस्ता काढल्याचे त्याला दिसून आले. गावातील सरपंच आणि गावकऱ्यांनी मिळून मनोहरला न विचारता त्याच्या जमिनीतून रस्ता काढला होता आणि स्थानिक विकास निधीतून त्या रस्त्याचे डांबरीकरण सुद्धा करून घेतले होते. मनोहरच्या जमिनीतून तब्बल चार एकर क्षेत्र रस्त्यासाठी गेले होते. एवढेच नाही, तर तिरक्या गेलेल्या रस्त्यामुळे मनोहरच्या जमिनीचे राहिलेले क्षेत्र सुद्धा तुकड्यांमध्ये विभागले गेले होते.
मनोहरने गुंतवणूक म्हणून घेतलेल्या या जमिनीचा आता मनोहरला कोणताच उपयोग करता येत नव्हता. एवढे नुकसान होऊन मनोहरला जमिनीचा कायदेशीर मोबदला मिळावा यासाठी कोर्टात दावा दाखल करावा लागला. कोर्टामध्ये मनोहरला वकिलांवर लाखो रुपये खर्च सुद्धा करावे लागले. मनोहरच्या गैरहजेरीचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांनी आपला स्वार्थ साधून घेतला होता. सांगायचे तात्पर्य म्हणजे जमीन किंवा मालमत्तेच्या व तिच्या ताब्याबद्दल प्रत्येक शेतकऱ्याने अतिशय सावध असले पाहिजे. गैरहजर मालकाचा गावात असलेले लोक कसा उपयोग करून घेतील, हे सांगणे अवघड आहे.
ई-मेल- shekharsatbara@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.