Pune News : राज्यात गेल्या वर्षी पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे यंदा राज्यावर पाणीटंचाईचे सावट घोंगावत आहे. राज्यातील अनेक धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची घट झाली असून नद्या कोरड्या पडल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याने प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतली आहे. यामुळे राज्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे.
३९.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक
राज्यात लहान मोठी असे मिळून एकूण धरणे २,९९४ आहेत. तर राज्यातील सहा महसूल विभागांतील धरणांची स्थिती पाहता धरणांमध्ये मार्च महिन्याच्या शेवटी ३९.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर गेल्यावर्षी हाच साठा ५५.८५ टक्के होता. यामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये टँकरेने पाणी पुरवठा करावा लागत आहे. मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी धरणात २२.७६ टक्केच पाणीसाठा असून १७.४ टीएमसी मृतसाठाच वापरता येणार आहे.
पाणीसाठा शिल्लक
राज्यातील औरंगाबाद विभाग २०.५५ टक्के, नाशिक विभाग ३९.९९ आणि पुणे विभागात ३९.८१ पाणीसाठा धरणातून शिल्लक आहे. तर विदर्भातील नागपूर विभागात सरासरी ५०.१७ टक्के, अमरावती ५१.१९ टक्के आणि कोकणात ५२.२३ टक्के पाणीसाठा आहे.
९४० टँकरद्वारे पाणीपुरवठा
गेल्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने धरणातील पाण्याच्या साठ्यात म्हणावी तसी वाढ झालेली नाही. उलट तापमान वाढ झाल्याने धरणातील पाणीसाठा तळ गाठत आहे. यामुळे राज्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सध्या राज्यात ३ हजार गावांना ९४० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून गेल्या वर्षी मार्च महिन्यात फक्त २१ गावे आणि ७३ वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा केला जात होता. त्यावेळी २९ टँकर पाणीपुरवठ्यासाठी फिरत होते. मात्र यंदा हा आकडा ९४० टँकरवर गेला आहे. तर यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून एकट्या बीडमध्ये १५० टँकरची मागणी करण्यात आली आहे.
सर्वाधिक टँकर मराठवाड्यात
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून सर्वाधिक टँकर हे मराठवाड्यात फिरत आहेत. येथे ३०० गावांना ३८१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर नाशिक विभागातील १०० गाव-पाड्यांमध्ये २७१ टँकरने सध्या धावत आहेत. पुणे विभागात देखील सध्या पाणीबाणी पाहायला मिळत आहे. २६५ गावं आणि १ हजार ५८७ वाड्यांमध्ये ३१० टँकर फिरवले जात आहेत. पुणे जिल्ह्यातील ३४ गावं आणि ३१४ वाड्यांमध्ये सध्या पाणीटंचाई दिसत आहे. येथे ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील १३२ गावे व ५४० वाड्यांसाठी १४३ टँकर फिरत आहेत.
जिल्हा आणि धरणातील पाणीसाठा
बीड जिल्हा
माजलगाव धरण - शुन्य टक्के
मांजरा धरण - ०. ५ टीएमसी
हिंगोली जिल्हा
सिद्धेश्वर धरण - ६.५१ टीएमसी
येलदरी धरण- १५ टीएमसी
नांदेड जिल्हा
निम्न मानार धरण - १.५ टीएमसी
जिल्हा आणि धरणातील पाणीसाठा
धाराशिव जिल्हा
तेरणा धरण- १.१९ टीएमसी
परभणी जिल्हा
दुधना धरण - शुन्य टीएमसी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.