

Aalandi News :
हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मीं तुझा दास ॥१॥
पंढरीचा वारकरी । वारी चुको न दे हरी ॥२॥
अशी मनोमन पांडुरंग चरणी प्रार्थना करत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गुरुवारी (ता. १९) इंद्रायणी तीरी लाखो वैष्णवांचा मेळा जमला होता. राज्यभरातून आलेल्या छोट्या-मोठ्या साडेचारशेहून अधिक दिंड्या येथील विविध धर्मशाळा, राहुट्यांत गेल्या पाच दिवसांपासून विसावलेल्या होत्या. दिंडीतील वारकऱ्यांची इंद्रायणी घाटावरील रंगणारी भजने आणि टाळ- मृदंगाच्या निनादाने सारा परिसर भक्तिरसात आकंठ न्हाऊन निघाला.
फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने देऊळवाडा उजळून निघाला. तर मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेतही भल्या पहाटेपासून लाखो भाविकांनी तीर्थस्थानासाठी गर्दी केली होती. हवेतील गारठ्याने आणि पावसाने चिंब भिजलेल्या वारकऱ्यांची भक्ती तसूभरही न ढळता ज्ञानोबा तुकारामाचा अखंड गजर करत भक्तिरसात तल्लीन असल्याचे चित्र अलंकापुरीत पाहायला मिळाले.
कपाळी गंध, बुक्का, हाती वीणा घेऊन वारकरी येत होते. घाटावर विविध दिंड्या येऊन भजन भारूड व माउलींचा जयघोष करत होत्या. भक्तिरसात तल्लीन झालेल्या महिला व पुरुष वारकरी हरिनामाची फुगडी अत्यानंदाने खेळत होते. बहुतांश दिंड्या नगर प्रदक्षिणा करत होत्या. वारकऱ्यांच्या खांद्यावरील पताकांनी इंद्रायणी काठ, गोपाळपुरा, प्रदक्षिणा रस्ता भगवेमय झाले होते. तसेच ज्ञानोबा माउली तुकारामाच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमला होता. आळंदीत सुमारे साडेचारशेहून अधिक छोट्यामोठ्या दिंड्या दाखल झाल्या.
दिवसभरात ठिकठिकाणच्या राहुट्यांमधून धर्मशाळामधून माउलीनामाचा गजर होत होता. पहाटे मंदिरात घंटनाद झाल्यानंतर माउलींना पवमान अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महापूजा आणि दर्शनासाठी भाविक वारकऱ्यांची गर्दी होती. दर्शनासाठीची रांग भक्तीसोपान पुलावरून नदीपलीकडे गेली होती. दर्शनानंतर भाविकांना देवस्थानच्या वतीने मोफत खिचडी प्रसाद देण्यात येत होता.
देऊळवाड्यात शंभर कॅमेऱ्यांचा वॉच तसेच शहरातही दोनशे ठिकाणी कॅमेरे भाविकांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले होते. मंदिर आणि मंदिरात पोलिसांचा विषेश बंदोबस्त होता. महिला भाविकांसाठी इंद्रायणीकाठी नगर परिषदेकडून कपडे बदलण्यासाठी खोल्या तयार केल्या होत्या. जीवरक्षक रबर बोटही ठेवण्यात आली होती. वारकऱ्यांना धर्मशाळेत टॅंकरने पाणी पोहोचवले जात होते. मागील दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. बुधवारी पहाटेपासून पाऊस सुरू होता. दरम्यान, राज्य सरकारने आळंदीत तीन लाख रेनकोट वाटपासाठी दिले होते. आळंदीतील भाजपचे कार्यकर्ते किरण येळवंडे आणि गणेश गरुड यांनी नियोजन करून रेनकोट वाटप केल्याने मागील दोन दिवसांपासून वारकऱ्यांना पावसापासून संरक्षणाकामी आले.
रात्रीतून उजळले मंदिराचे रुपडे
बुधवारी (ता. १८) दुपारपासून देऊळवाड्यात फुलांची आरास करण्यात येत होती. देऊळवाड्यात विविध ठिकाणी विविध रंगीत फुलांचा वापर करून आरास केली. महाद्वारात विठ्ठल-रुक्मिणीची फुलाद्वारे सजावट केलेली होती. तर मंदिराच्या अवतीभवती आणि कळसावर विद्युत रोषणाई केल्याने देऊळवाडा रात्रीतून उजळून निघाला. अनेक भाविक छायाचित्र आणि रिल्स बनविण्यासाठी उत्साह दाखवत असल्याचे चित्र होते. दरम्यान, गुरुवारी (ता. १९) रात्री उशिराने प्रस्थान होणार असल्याने प्रखर प्रकाशाच्या दिव्यांचे व्यवस्थापन देवस्थानकडून करण्यात आले होते.
आळंदी मार्ग वाहतुकीस बंद
पुणे-आळंदी रस्त्याने पालखी जाणार असल्याने चारचाकी तसेच अवजड वाहनांना संपूर्ण पालखी मार्गावर बंदी असणार आहे. दिंडीकऱ्यांची वाहने मरकळ लोणीकंद मार्गे पुण्याच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत. लोहगावमार्गे पुन्हा कळस येथे दिंडीकऱ्यांची काही जेवणाची वाहने पास पाहून सोडली जातील. पुण्याहून आळंदीकडे येणारा मार्ग पूर्णपणे वाहतुकीस बंद असणार आहे, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.