
Mumbai News : आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
या वेळी श्री. सरनाईक म्हणाले, की यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा. आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी पंढरपुरात येतात.
अनेक प्रवासी स्वत:च्या खासगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीबरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.
तसेच बसचालकांना व वाहकांना कोणाची राहण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर त्यांना अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून द्यावे. बस स्थानकातून बस प्रवाशांना घेऊन जाण्याअगोदर बसची देखभाल दुरुस्ती करावी. एसटी बसच्या तत्काळ दुरुस्तीसाठी जादा तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही सरनाईक यांनी केल्या. यात्रा काळात पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात येणार आहे.
विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना लगाम
यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. अशा फुकट्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत.
चार तात्पूरर्ती बस स्थानके
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत.
जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस
- चंद्रभागा बस स्थानक येथून मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
- भीमा यात्रा देगाव -छत्रपती संभाजी नगर , नागपूर व अमरावती प्रदेश
- विठ्ठल कारखाना -नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर
- पांडुरंग बस स्थानक -सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.