Tamarind Processing : चिंचेच्या मूल्यवर्धनास का मिळतेय चालना?

Tamarind Processing Business : महाराष्ट्रातील चिंच अन्य राज्यांच्या तुलनेत आंबट असते. साहजिकच त्यास अधिक उठाव असतो. पुणे बाजार समितीत हंगामात चिंचेची मोठी आवक होते. घरगुती ग्राहक, हॉटेल व खाद्यपदार्थ व्यावसायिकांकडून चिंचेचे विविध प्रकारांना वर्षभर मागणी असते.
Tamarind Business
Tamarind BusinessAgrowon
Published on
Updated on

चिंच हे पीक शेतकरी व्यावसायिक (Tamarind Business) म्हणून घेत नसले तरी बांधावर तसेच शेतात जुनी डेरेदार झाडे दिसून येतात. त्यापासून शेतकरी वर्षाला ठरावीक उत्पन्न घेत असतात. सोलापूर- बार्शी, नगर आदी चिंचेच्या बाजारपेठा प्रसिद्ध आहेत.

कोरोना काळापूर्वी पुणे बाजार समितीतही चिंचेचे ‘मार्केट’ चांगले होते. या कोरोना काळात आवकेत तब्बल ४० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसले. त्याची विविध कारणे होती. मजुरांद्वारे चिंच काढणी शक्य होऊ शकली नाही. चिंचेचे मुख्य ग्राहक असलेल्या भेळ, पाणीपुरी व्यावसायिकांचे स्टॉल कमी झाले.

परंतु आता चिंचेचे ‘मार्केट’ हळूहळू पूर्वपदावर येत आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत वातावरण कोरडे असल्याने मार्केटमध्ये चिंचेची आवक चांगली असते. यंदाच्या वर्षी या तीन महिन्यांच्या हंगामात पुणे बाजार समितीत २०० ते २५० टनांच्या आसपास आवक होण्याची शक्यता आहे.

आवक आणि मागणी

पुणे बाजार समितीत पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, शिरूर आदी भागांतून तसेच सातारा, सोलापूर, नगर येथूनही चिंच येते. हैदराबाद, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यात चिंच पाठवली जाते. यातील काही राज्यांत चिंचेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.

मात्र त्या तुलनेत महाराष्ट्रातील चिंचेला आंबटपणा अधिक आहे. पुण्यातील व राज्यातून जवळपास ७० ते ८० टक्के मालाची खरेदी परराज्यांत होते.

Tamarind Business
चिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधी

चिंचेची मागणी

-हॉटेल व घरगुती कारणांसाठी भाज्या, सांबर, रस्सम, पाणीपुरी, भेळनिर्मिती, चिंच गोळी, जेली, चिंचोका पावडर आदींसाठी मागणी.

-पिवळा रंग आणि गर अधिक असलेल्या चिंचेला चांगली मागणी. जेवढी पिवळी तेवढी ती जास्त आंबट असते.

-जुनी, काळसर रंगाची चिंच भेळ, पाणीपुरी, चाट यासाठी वापरण्यात येते. ही चिंच तुलनेने गोडसर असते.

चिंचेला प्रकारानुसार मिळणारे दर (प्रति किलो)

-टरफलांसहित १५ - २० रु.

-टरफले काढलेली चिंच- २५ ते ३५ रु.

-चिंच फोल (चिंचोका काढलेली) ७० ते ९० ते कमाल १०० रु.

..अशी होते काढणी

अनेक शेतकरी बांधावर झाड असावे म्हणून चिंचेला प्राधान्य देतात. पावसाळा संपल्यानंतर बहर येण्यास सुरुवात होते. जानेवारीपर्यंत चिंच पक्व होऊन फेब्रुवारीपासून काढणी सुरू होतो.

शेतकरी स्वतः काढणी करीत नसले तरी जागेवर येणाऱ्या व्यापाऱ्यांना नाममात्र दरात म्हणजेच ५०० ते २००० रुपयांच्या दरम्यान झाडाची विक्री होते. काठीच्या साह्याने झोडणी करून चिंच गोळा करून गोण्यांमधून पुढे पाठवली जाते.

अनेक वेळा शेतकऱ्यांना टरफले काढणे शक्य नसल्याने कमी दर मिळतो. त्यास हमी भाव नाही. विक्रीसाठी जवळचे ‘मार्केट’ उपलब्ध नसते. मात्र प्रक्रिया किंवा मूल्यवर्धनाद्वारे चांगले उत्पन्न मिळवण्याची शेतकऱ्यांना संधी आहे.

प्रक्रियादारांचे अनुभव चटणी, कोळ यांना मागणी

पुणे येथील अजिंक्य बांडे म्हणाले, की आमचा चिंच खरेदी-विक्रीचा जुना व्यवसाय आहे. मी चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो आहे. खरेदी केलेल्या चिंचा फोडण्यासाठी आमच्याकडे ५० ते १०० महिला काम करायच्या.

परंतु कोरोना काळानंतर त्यात घट झाली. माझे ‘फूड सायन्स’ विषयात ‘बीटेक’चे शिक्षण झाले आहे. त्यामुळे पारंपरिक खरेदी-विक्री व चिंचोका वेगळा करण्याच्या व्यवसायाच्या पुढे जात प्रक्रिया, मूल्यवर्धनाकडे वळलो आहे.

यात खट्टी मिठी चटणी, पाणीपुरी मिक्स, चिंचेचा कोळ आदींचा समावेश आहे. प्रति किलो ८० ते कमाल १५० रुपये दराने कोळची विक्री होते.

२५ किलो ड्रममध्येही त्याला मागणी आहे. पुणे शहरात या उत्पादनांना चांगले मार्केट आहे. येत्या काळात पल्पनिर्मितीकडेही वळण्याचा विचार आहे. खेड शिवापूर येथे जागा असून, तेथे प्रकल्प सुरू करणार आहे. थायलंड येथील चिंचही आपल्याकडे येते. मात्र ती खाण्यासाठी व चवीला गोड असल्याने आपल्या खाद्यपदार्थसाठी भारतीय चिंचच उपयुक्त असल्याचे अजिंक्य यांनी सांगितले.

Tamarind Business
बांधावरची गावरान चिंच झाली व्यावसायिक

चिंचोक्यालाही चांगला दर

पुण्यात चिंचोक्यालाही चांगली मागणी आहे. भाजून खाण्यासाठी त्याचा वापर होतो. कच्चा चिंचोका प्रति किलो १० ते १४ रुपये, तर भाजका चिंचोका २५ रुपये दराने विकला जातो.

वर्षभरात काही टन चिंचोका विक्री होत असावी. त्यातून मोठी उलाढाल होते. चिंचेची फोड करून गर आणि चिंचोका असे वेगळे केल्यास प्रति किलोमागे ७० ते ८० रुपयांपर्यंत अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी मिळू शकते.

अजिंक्य बांडे, ७५८८२८८७५५

महिन्याला दहा हजार पाकिटांची विक्री

पुणे येथील चिंच प्रक्रिया उद्योजक किरण ठक्कर म्हणाले, की पूर्वी चिंच खरेदी-विक्री व्यवसाय करायचो. सुमारे २२ वर्षांपासून चिंच प्रक्रिया उद्योगात कार्यरत आहे. सर्व चिंच मार्केटमधून खरेदी करतो. खट्टी मिठी चटणी, पाणीपुरी मसाला, चिचेंचा कोळ, सीडलेस चिंच आदी उत्पादनांची विक्री करतो.

सर्व उत्पादनांना शहरातून चांगली मागणी असते. बाजारपेठेतील मागणीनुसार १००, १५० ते २०० ग्रॅम पॅकिंग तयार करतो. महिन्याला एकूण १० हजार पाकिटांपर्यंत विक्री होते. त्यातील ५० टक्के वाटा पुणे शहराचा असतो. तर उर्वरित विक्री वाशी, ठाणे, नगर आदी ठिकाणी होते. महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत उलाढाल होते. परराज्यांतही या उत्पादनांना मागणी आहे.

किरण ठक्कर, ९२२५५२२७९६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com