बांधावरची गावरान चिंच झाली व्यावसायिक

औरंगाबाद जिल्ह्यात कसाबखेडा (ता. खुलताबाद) गाव गावरान चिंचेसाठी प्रसिद्ध आहे. गावातील काही शेतकऱ्यांकडे ८० ते १०० वर्षे वयाची झाडेही पाहण्यास मिळतात. व्यापारी उक्त्याने झाडेच खरेदी करतात. पाणी, खते व अन्य निविष्ठांचा वापर शक्यतो नसलेली बांधावरच्या या झाडांनी शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला मोठा हातभार लावला आहे.
Shankar Jadhav and their family members while showing tamarins of their trees
Shankar Jadhav and their family members while showing tamarins of their trees
Published on
Updated on

औरंगाबाद जिल्ह्यात कसाबखेडा (ता. खुलताबाद) गाव गावरान चिंचेसाठी प्रसिद्ध आहे.  गावातील काही शेतकऱ्यांकडे ८० ते १०० वर्षे वयाची झाडेही पाहण्यास मिळतात. व्यापारी उक्त्याने झाडेच खरेदी करतात. पाणी, खते व अन्य निविष्ठांचा वापर शक्यतो नसलेली बांधावरच्या या झाडांनी शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला मोठा हातभार लावला आहे.    ग्रामीण भागात चिंचेची अनेक झाडे दिसून येतात. सावलीपलीकडे त्याची उपयोगिता नाही असे काहींना वाटते. मात्र व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून चिंचेची शेती करणारे शेतकरीही कमी नाहीत.  औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात कसाबखेडा गाव चिंचेसाठी प्रसिद्ध आहे. गावातील अनेकांकडे चिंचा आहेत. बहुतांश झाडे बांधावर, नाल्या-रस्त्यांच्या कडेला आणि वस्तीवर आहेत. येथील अनुभवी शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावशिवारात एक हजार ते बाराशेपर्यंत झाडे असावीत.   जाधव यांचा अनुभव  गावातील सेवानिवृत्त मंडल कृषी अधिकारी शंकर जाधव यांची सुमारे ८५ झाडे आहेत. सुमारे ५०, ६० वर्षे वयापासून ते काही झाडे शंभर वर्षे वयाची आहेत. प्रति झाड सुमारे ७ ते ८ क्विंटल (चिंचोकासहित), तर काही झाडे १० ते १५ क्विंटलपर्यंतही उत्पादन क्षमतेची असल्याचे ते सांगतात. यंदा आपली ८० झाडे त्यांनी तीन लाख ११ हजार रुपयांना व्यापाऱ्याला दिली.  ४०० झाडे असलेले ठोले  गावातील चेतन ठोले यांची सुमारे शंभर एकरांच्या आसपास शेती आहे. हंगमी पिके व फळपिके अशी त्यांच्याकडे विविधता आहे. त्यांची बांधाकडेला तब्बल चारशेपर्यंत चिंचेची झाडे आहेत. बहुतांश १०० वर्षे वयाची आहेत. त्यांच्या अनुभवानुसार प्रति झाड ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळते. यंदा त्यांनी ही सर्व झाडे उक्त्याने साडेआठ लाख रुपयांना दिली. मागील वर्षी उत्पादन कमी होते. त्यामुळे त्यातून ५० हजार रुपयेच उत्पन्न मिळाले. त्या मागील वर्षी साडेसहा लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे ठोले म्हणाले. सौदा ठरतो त्या वेळी २५ टक्के रक्कम मिळते. पहिल्या काढणीस अर्धी रक्कम, तर सर्व तोडणी संपल्यानंतर पूर्ण रक्कम दिली जाते. गावरान जात असून चव आंबट-गोड आहे.  विक्री व्यवस्था  चेतन म्हणाले, की आमच्या गावातच सुमारे १५ व्यापारी आहेत. आमच्याकडे कोपरगाव, नगर भागांतील व्यापारीदेखील येतात. बाजार समितीत चिंच विकल्यास किलोला २० ते २६ रुपये, तर चिंचोक्याला ६ ते ८ रुपये दर मिळतो. पुढे वाहतूक, पॅकिंग करून चिंचेचा दुकानातील दर वाढतो.  भरघोस उत्पन्नासह रोजगारही कसाबखेडा भागातील अनेक झाडे आजोबा-पणजोबांपासून लावलेली दिसतात. त्यांनी आपल्या पुढील पिढीसाठी उत्पन्नाचा ठेवा राखून ठेवला आहे. या झाडांना पाणी, खते, फवारण्या या पैकी काहीच फारसे करावे लागत नाही. नुसत्या चिंचेपासून गावात दरवर्षी एकूण मिळून २५ ते ३० लाख रुपये उत्पन्न येत असावे. शिवाय निर्माण होणारे रोजगार निर्मितीचे मोल वेगळे. सुमारे पाचशेहून अधिक लोकांना चिंचेच्या चार महिने हंगामात रोजगार मिळतो. चिंचेचे उगवलेले रोप उपटायचे नाही हा या गावचा शिरस्ता झाला आहे. त्यामुळे जुन्या झाडांच्या आजूबाजूला नवी झाडे नैसर्गिकरीत्या उगवत राहतात व शाश्‍वत उत्पन्नाचे साधन निर्माण होत जाते. अनेकांकडे बांधावर, कोणी मुद्दाम लावलेली तर कोणाकडे नैसर्गिकरीत्या उगवलेली झाडे आहेत. अगदी १० पेक्षाही झाडांची कमी संख्या असलेले शेतकरी बहुतांश आहेत. मात्र गौतमचंद खुशालचंद ठोले, शंकर रामभाऊ जाधव, पांडुरंग राजाराम वेताळ आदींकडे मोठ्या संख्येने झाडे पाहण्यास मिळतात. वेताळ यांच्याकडे शंभरच्या आसपास झाडे असून, साधारण तीन ते सव्वा लाख रूपये किमतीला त्यांनी ती व्यापाऱ्यांना दिली आहेत. कसाबखेडा पलीकडेही गावे  औरंगाबाद जिल्ह्यात केवळ कसाबखेड्यातच नव्हेत तर सिल्लेगाव, आंबेलोहोळ, वाळूज, वेरुळ, माळीवाडा, दौलताबाद आदी गावांतही मोठ्या प्रमाणात झाडे दिसून येतात. साधारणतः पंधरा वर्षे वयाचे झाड झाले की ते उत्पादन द्यायला सुरुवात करते. सुरुवातीला उत्पादन कमी मिळत असले तरी वय वाढेल तशी उत्पादनात वाढ होत जाते. शंकर जाधव सांगतात, की साधारणतः शंभर वर्षे वयाच्या झाडांपेक्षाही ४० ते ५० वर्षे वयाची झाडे सर्वाधिक उत्पादन देतात. झाडाचा विस्तार (कॅनॉपी) किती आहे त्यावर उत्पादन ठरते. चिंचेचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षाआड चांगले उत्पादन मिळते. म्हणजेच यंदा चांगले तर पुढील वर्षी ते कमी असे चित्र दिसत असल्याने दरांमध्ये नेहमी चढ-उतार दिसून येतो.  माल पाहून झाडाची किंमत  चिंच खरेदी करणाऱ्यांत लहान व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. दोन-चार झाडे घेणारे व्यापारी चिंचा फोडून गावातील मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. मोठे व्यापारी नगर येथे फोडलेल्या चिंचा व बार्शी येथे चिंचोके विकतात. झाडाचा विस्तार, लागलेली फळे-फुले, बहराचे प्रमाण पाहून व्यापारी दर ठरवतात. उत्पादनाचे चांगले वर्ष असेल तर चांगल्या झाडाला साधारणतः चार हजार रुपयांचा दर ठरतो. फेब्रुवारी ते एप्रिल हा विक्री हंगाम असतो. जूनमध्ये फुले चांगली फुललेली असतात. चिंचा किती लगडणार याचा अंदाज येतो. काही व्यापारी फुले असताना तर काही व्यापारी वाद्या (लहान फळे) लागल्यानंतर सौदा ठरवतात. ज्या शेतकऱ्यांना आर्थिक नड आहे ते पुढील दोन-तीन वर्षांचाही सौदा निश्‍चित करतात. मात्र यात कमी पैसे मिळतात. चार महिने रोजगार  चिंचा झोडण्याचे काम फेब्रुवारीमध्ये सुरू होते. ते मेमध्ये संपते. या चार महिन्यांत गावात मोठी रोजगारनिर्मिती होते. शेतीच्या कामांनाही मजुरांची टंचाई भासते. झाडावर चढून बांबूने झोडपून चिंचा खाली पाडणे, जमिनीवर पडलेल्या चिंचा वेचणे, त्यांच्यावरील टरफल बाजूला करणे, चिंचा फोडून गर व चिंचोके वेगळे करणे यासाठी मजूर मोठ्या प्रमाणात लागतात. चिंचा झोडपण्यासाठीच जवळपास पाचशे मजूर लागतात. त्यांना प्रति दिन ५०० रुपये मिळतात. चिंचा वेचणाऱ्या महिलांना २०० रुपये प्रति दिन मजुरी मिळते. टरफल बाजूला केल्यानंतर फोडण्यासाठी महिलांना त्यांच्या घरी दिल्या जातात. त्यासाठी सात रुपये प्रति किलो मजुरी दिली जाते. दिवसभरात घरचे काम करत प्रति महिला २५ ते ३० किलो चिंचा फोडू शकते. चिंचेपासून साधारणतः ५५ टक्के गर, १४ टक्के चिंचोके व ११ टक्के टरफल व शिरांचे उत्पादन मिळते. चिंचेचे विद्यापीठाचे वाण  फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद येथील शास्त्रज्ञ डॉ .एम.बी. पाटील म्हणाले की चिंचेचे झाड टिकाऊ, चिवट, दणकट, किडी- रोगांना फारसे बळी न पडणारे, बहुवर्षीय  आहे. हिमायतबाग येथील प्रक्षेत्रात चिंचेची सुमारे एकहजार झाडे आहेत. यातील अनेक झाडे ८० ते १०० वर्षांपूर्वीची आहेत. गावरान झाडे उशिरा उत्पादन देतात. कलमे केलेली झाडे सुमारे सात ते आठ वर्षांपासून उत्पादन देण्यास सुरवात करतात. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने चिंचेचे काही वाण विकसित केले आहेत. यात प्रतिष्ठान, नंबर २६३, योगेश्‍वरी, अजिंठा असे वाण आहेत. यातील काही वाण गोड्या चिंचेचे आहेत. या वाणांची कलमेही उपलब्ध आहेत. बाजारपेठा नगर ही फोडलेल्या चिंचांसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. अनेक जिल्ह्यांबरोबर औरंगाबादची चिंचही येथे येते. नगरच्या खालोखाल बार्शी व लातूरची बाजारपेठ आहे. चिंचोक्यांसाठी मात्र बार्शीची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. लाल रंगाच्या गरापेक्षा पिवळ्या रंगाच्या गराला चांगला दर मिळतो. सुपर पिवळा ही सर्वोत्तम ‘ग्रेड’ समजली जातो. नगर जिल्ह्यातून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात चिंच पाठवली जाते. येथून निर्यातही होते. चिंचोक्याचा उपयोग कापड उद्योग, कुंकू, बुक्का तयार करणे, स्टार्च, पेक्टीन व टॅनीनसाठी केला जातो. टरफल, शिरा वीटभट्टीवाले विकत घेऊन जातात.  - शंकर जाधव  ९४२३१५११५८ चेतन ठोले  ८०८७८०१००८ 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com