Pola Tradition : पोळा: बैलांच्या ऋणाची परतफेड करणारा सण

Pola Festival : सर्वांगाला गेरूचे लाल, पिवळे, निळे, हिरवे ठिपके देऊन झाले की मस्त पिवळ्या धमक रंगातल्या बैलांच्या अंगावरचे ठिपके अगदी झकास दिसतात. पायलीभर डाळ-गूळ शिजायला टाकायचा. मग पोटोबा फत्ते.
Pola Tradition
Pola FestivalAgrowon
Published on
Updated on

समीर गायकवाड

‘पोळ’ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा जुन्या काळात होती. आता शेतकऱ्याकडेच बैल नाहीत तर गावावर बैल सोडणार कोठून? गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी त्याला सोडत असत. या बैलाला काही ठिकाणी ‘पोळ’ म्हणतात, तर काही ठिकाणी ‘पोळ्याचा वळू’ तर काही गावात या बैलालाच पोळा म्हणतात.

या बैलास गावावर सोडण्यापूर्वी त्याला धुऊन, रंगवून सजवीत आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गाई आणून उभ्या करीत. मग त्याच्या कानात ‘तू वासरांचा पिता’ अशा अर्थाचा मंत्र म्हणत. ‘हा तुमचा पती आहे’ अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत.

पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वशिंड मोठे असे. शेपटी मऊ व लांब केसांची तर गाल कोवळे, पृष्ठभाग रुंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकेदार, बांधा डौलदार असे. मोठ्याने डिरक्या देणारा बैलच निवडला जायचा. असा बैल आढळला नाही तर त्या वर्षीचा ‘पोळ’ सोडायचा कार्यक्रम रद्द व्हायचा. जुन्या काळी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असायचा. आता तसं नाही. शेतकरीच नडला गेला आहे, तरीही बैलाचे आपल्यावरचे ऋण व्यक्त करण्यासाठी कसं का होईना तो हा सण साजरा करतोच.

पूर्वी पाऊसपाणी ठीकठाक वकुबावर अन् वक्तशीर असायचं. त्यामुळे पोळा कुठल्या का महिन्यात येईना शेतशिवार सगळं कसं हिरवंगार असायचं. सगळ्यांकडं बैलजोडी ही असायचीच. आता चित्र बदललंय. निम्मी अधिक शेतीची कामं यांत्रिक पद्धतीने होतात आणि चारा-पाणी वेळेवर मिळत नाही. वर त्याचे दामही वाढलेले. त्यामुळे लोकं बैल एकमेकांचेच वापरतात. पावसाळ्यात रान चिखलानं गच्च भरलं अन् ट्रॅक्टरची चाकं रुतून बसू लागली की मग मात्र सगळ्या गावाला बैलांची आठवण जरा जास्त येऊ लागते.

Pola Tradition
Animal Care : कडक उन्हामुळे होणारे जनावरांतील आजार कसे टाळाल?

या सणासाठी आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार आधी शहरातून विकत आणायचे. आता तालुक्याच्या गावात किंवा खेडेगावातही या वस्तू कमी अधिक प्रमाणात मिळतात. शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैल सजवतात व पोळ्यात भाग घेतात. यंदाचं पोळ्याचं आवतण बैलाना आधीच दिलं होतं. खांदेमळणीही अगदी दमात केली होती.

पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांद्यावर लावली आणि हळद, तेल-तुपाने त्यांचे दमलेले खांदे मस्तपैकी मळले. सगळ्यांची शिंगे साळून घेतली. त्याला केशरी लाल हुंगुळ लावला की शिंगे चमकदार होतात अन् बैल उठून दिसतात. आंबाडीचे सूत काढून तयार केलेली नवी वेसण दुरडीत तयार असते.

नवा कोरा पांढरा शुभ्र कासरा अडकवून जोडीला लाल लोकरीचे गोंडे, नवीन घुंगरमाळा, कवड्यांचे हार, नवीन रंगीबेरंगी चित्रांच्या झुली दुपारी यांच्या अंगावर चढतात. पैंजण, पट्टे, झेंडूचे हार अशी सामग्री वाट पाहत राहते.

सर्वांगाला गेरूचे लाल, पिवळे, निळे, हिरवे ठिपके देऊन झाले की मस्त पिवळ्या धमक रंगातल्या बैलांच्या अंगावरचे ठिपके अगदी झकास दिसतात. हुंगुळ लावलेल्या शिंगांना चमकीच्या कागदाचे बेगड चिटकवायचे. डोक्याला बाशिंग बांधून माठोटे टांगले की शिंगे कशी उठून दिसतात. शिंगाळी असतील तर ती बदलून टाकायची नाही तर काढून टाकायची.

त्यातल्याच एकाच्या पायात पूर्वी तोडे देखील असायचे, आता नाहीत. त्याच्या जागी कटदोऱ्याचे मऊ दोरे बांधतात. पायलीभर डाळ-गूळ शिजायला टाकायचा. मग पोटोबा फत्ते. मस्त घमघमत्या वासाची पुरणपोळी आणि जोडीला गुळवणी.

बैलाला ढुसण्या देणारी तारी आणि अंगावर उठणारा चाबूक आता दोन-तीन दिवस तरी सुट्टीवर जातो. वर्षभर नव्हे तर आयुष्यभर आपल्यासाठी राबणारे बैल हेच आपले खरे पोशिंदे होत. पोळ्याच्या दिवशी बैल हा जणू ‘नवरदेव’ असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. बैलाने हा मानाचा घास खाल्ल्याशिवाय बळीराजादेखील जेवत नाही.

Pola Tradition
Animal Care : जनावरांच्या सुदृढतेसाठी ‘पशुसखीं’चा सल्ला

गावाच्या आखरीजवळ (वेस) मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून गावकरीच बांधतात. दिवस डोक्यावर आल्यावर त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. काही गावांमध्ये हा कार्यक्रम दिवस उतरतीला लागल्यावर होतो. या वेळेस झडत्या (पोळ्याची गीते) म्हणल्या जात असत.

आता जुनी माणसं कुणी उरली नाहीत, त्यामुळे हा साग्रसंगीत होणारा कार्यक्रम बदलला गेला आहे. त्याला छोटेखानी स्वरूप आलं आहे. गावाचे म्होरके किंवा मानकरी हे तोरण तोडायचे आणि पोळा फुटल्याचे गावात आपसूक जाहीर व्हायचे. त्याला दवंडीची गरज नसे. आता प्रत्येक आळीला पुढारी झाल्याने या तोरणावरुन वाद होऊ लागल्याने ही पद्धतच बंद पडली आहे.

एका अर्थाने बरेच आहे. वादविवाद होण्यासाठी काही गोष्टी टाळलेल्या बऱ्या. नंतर तिथे आणलेले बैल मारुतीच्या देवळासमोर आणले जातात. मग त्यांना घरी नेउन ओवाळण्यात येते.बैल नेणाऱ्यास पूर्वी बोजारा (खुशीची रक्कम) देण्यात येत असे. आता सगळा संकटांचा धुरळा उडाला आहे. कोण कुणाला बोजारा देणार?

फक्त पोळ्याच्या दिवशी विश्रांती दिली जाणाऱ्या या बैलांनाही मन असते, त्याचे सुद्धा काळीज असते. तो सुद्धा हितगुज करतो, फक्त त्याची बोली आपल्याला कळायला पाहिजे. परवा मी बळी अण्णांना भाकड बैलांबद्दल बोलताना शहरात बैल कत्तलखान्याकडे न्यायला आता काटेकोर बंदी घातलीय आणि शहरातले लोक यावर फार तावातावाने बोलतात असं सांगताच त्यांचा पारा एकदम चढला.

ते म्हणाले, ‘‘ग्यान गेलेले आहेत ते! आपल्या आई-बापांशी नीट बोलत नाहीत, त्यांच्या पायापुढं वाकत नाहीत. ही शाणी गाबडी लगीन लावून झालं म्होतूर झाला की आई-बापापासून वायलं राहत्येत आन मंग त्येस्नी आश्रम दाखवत्येत. एकेकाला चाबकाच्या वादीने अंगभर फोडून काढला ना मग कळंल. आमाला शाणपणा शिकवत्येत. हुकलेले... पहिले आप्ले आईबा सांभाळा म्हणावं मग तोंड इचका म्हणावं...!’’ त्यांच्या या फटक्यापुढे बोलण्याची माझी टाप नव्हती.

असा हा अद्वितीय सण अन् अशी ही अनमोल माणसं. कितीही अडचण असली, तरी हा सण साजरा केला नाही तर आपण कृतघ्न असल्याची टाचणी जिवाला लागून राहते. पोळा केला की मुक्या जनावराच्या पिळवणुकीची थोडी का होईना जाण राखल्यासारखे वाटते. पोळा झाला की शेतशिवाराला उधाण येते अन् चराचर प्रसन्न होऊन जाते. श्रावणाचे गारुड संपून गेलेले असते अन् पीकपाणी उफाणून येण्याची सुरुवात झालेली असते. माणसाला आपल्या खऱ्या दौलतीची जाणीव करून देणारा हा सण खरोखरच एक अपूर्वाई आहे.

पोळ्याच्या दिवशी सगळं शिवार, वाड्यावस्त्या, कुळा-कुळातले बापजादे सगळे मिळून या बळीराजाच्या पोशिंद्याच्या पायी नतमस्तक होऊन त्याची पूजा करतात. बैलजोडी हीच बळीराजाची खरी दौलत आहे. खरं तर शेती हे या मुक्या जीवाचं समर्पण आहे अन् पोळा हा त्या ऋणातून उतराई होण्याचा मनुष्यप्राण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com