
Pacharat Book:
पुस्तकाचे नाव : पाचरट
लेखक : अशोक नजान
प्रकाशन : समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर
पाने : १४४
किंमत : २२० रुपये
साखर गाळप हंगामात ऊसतोड मजुरांना कोणकोणत्या समस्यांना आणि आघातांना सामोरे जावे लागते, याचं नेटकं चित्रण करणारी ही कादंबरी आहे. एकंदर साखर गोड लागत असली तरी ती तयार करणाऱ्या कुटुंबांच्या कहाण्या प्रचंड कडू आहेत, याचं दर्शन ही कादंबरी घडवते. दुष्काळी भागातील अल्पभूधारक व भूमिहीन कुटुंबांनी प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी अनेक स्वप्ने उराशी बाळगलेली असतात. ती स्वप्ने जगण्याच्या सुखाची कल्पना करणारी आहेत. उदा. कोणाला घर बांधायचे आहे, कोणाला विहीर खोदायची आहे, कोणाला मुलांना शिक्षण द्यायचे आहे, कोणाला खांद्यावरील सावकारी कर्जाचा डोंगर कमी करायचा आहे, कोणाला मुलीचे लग्न करायचे आहे...
अशा अनेक आशा ऊसतोड मजुरी करण्यामागे असतात. मात्र प्रचंड कष्ट उपसले, अंगमेहनत केली तरी ही स्वप्न पूर्ण होतात का? तर `नाही` असे उत्तर कादंबरीतून पुढे येते. उलट समस्या, आघात आणि संकटे वाढत जातात. एवढेच नाही तर अपवाद वगळता ऊसतोड मजुरांची पुढील पिढी देखील याच ऊस तोडणीच्या क्षेत्रात येते. त्यामुळे आपल्या पुढील पिढीला ऊसतोडणीचे कष्ट करू द्यायची नाही, हे या मजुरांनी पाहिलेले स्वप्न त्यांच्या डोळ्यातच राहते, ते प्रत्यक्षात उतरत नाही.
कोरडवाहू भागातील शेतमजुरांना, अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना ऊस तोडायचे काम का करावे लागते? तर मुळात शेती, पाणी, शिक्षण, विकासाचा असमतोल निर्माण केला गेला आहे. राज्यात एका बाजूला सधन शेती, तर दुसऱ्याच्या बाजूला कोरडवाहू, दुष्काळी प्रदेश दिसतो. सधन परिसराला मागास प्रदेशातून शेतमजूर पुरवठा करण्यासाठी हा असमतोल निर्माण केला आहे का, असा प्रश्न पडतो. दुष्काळी आणि कोरडवाहू परिसरातून सधन परिसरात शेती कामासाठी मजूरांना करावे लागणारे हे हंगामी स्थलांतर साधेसुधे नाही, तर अनेक समस्यांनी, गरिबीने आणि दुःखाने भरलेले आहे.
कारखान्यावर गेल्यावर उघड्या जागेवर संसार उभा करणे, परतीच्या पावसाने उघड्यावरील संसाराची दैना करणे, जगण्याच्या मुलभूत सुविधा नसणे, स्थानिकांकडून बे-इज्जती (मानखंडना) होणे, पाणी-वीज-सरपण-चारा नसणे, तसेच पाळीव जनावरांना नसलेली सुरक्षितता, मुलांच्या शिक्षणाचे तीन-तेरा, आजारपण, राहत्या झोपड्यांना धोके, उसाच्या फडात जंगली प्राण्यांपासून (साप-बिबट्या व इतर) भय अशा कितीतरी समस्यांना या मजुरांना तोंड द्यावे लागते. मजुरांच्या जगण्याचा हा झगडा कादंबरी अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित करते.
या कादंबरीचे वैशिष्टय म्हणजे तिला रूढ अर्थाने कोणी नायक नाही. तर सात बैलगाड्यांचा ग्रुप असतो, त्यांचे कर्तेधर्ते हेच नायक बनतात. प्रत्येकाची गरिबीची आणि दु:खाची कहाणी वेगवेगळी आहे. मात्र दुःख, आघात आणि कष्ट हे प्राक्तन समान आहे. सर्वाना अंगमेहनत, कष्ट करणे अनिवार्य आहे. गावात जाती मानणारे कारखान्यावर गेल्यावर मात्र कोणीही जात मानत नाहीत, एका विचाराने मजुरी करतात. पण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी संकटाचा, आघाताचा बळी ठरतो. मजुरांच्या घरची परिस्थिती गरिबीची असते, त्या गरिबीने एक चक्रव्यूह तयार केला आहे. त्यातून बाहेर पडण्याची धडपड मजूर करतात. पण ते चक्रव्यूहात जास्तच अडकत जातात. हा चक्रव्यूह हळूहळू अभेद्य होत जात असल्याचे दिसून येते.
मजुरांना गरिबीतून बाहेर पडण्याचा आशावाद मात्र प्रचंड आहे. कष्ट उपसण्यात मजुरांची कुटुंबे साथ देतात. कधीही कोणाला एकटे पडू देत नाहीत. हसणे, रुसणे, भांडणे, अबोला यातून त्यांच्यातील जिव्हाळा, प्रेमभाव दिसतो. ही कुटुंबे एकमेकांच्या दुःखात सहभागी होतात. आधार देण्याची आणि साथ देण्याची भूमिका असते. माणुसकी विसरत नाहीत. ही कादंबरी म्हणजे कल्पनाविलास किंवा वरवरची निरीक्षणे नाहीत तर तिला वास्तवाचा भक्कम पाया आहे. एका अतिशय गंभीर विषयाचा आरसा समाजाला दाखवणारा हा दस्तऐवज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.