Sant Kabir Book Review: कबीर काव्य आणले मायबोलीत...

Marathi Literature: संत कबीराच्या निर्गुण भक्ती आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदेशांना मराठी भाषेत नव्याने अनुभवण्याची संधी! इंद्रजित भालेराव यांनी कबीर दोह्यांचा मराठीत अनुवाद करताना त्यांना अधिक सुलभ आणि समजण्याजोगे केले आहे. हे पुस्तक कबीराच्या गूढ, गहन विचारसरणीला आपल्या भाषेत सजीव करते.
Kabir Book
Kabir BookAgrowon
Published on
Updated on

Marathi Literature:

कबीर : संत, सुधारक आणि कवी

काव्यानुवाद : इंद्रजित भालेराव

प्रकाशन : सॅम पब्लिकेशन्स, पुणे

पाने : २२४

मूल्य : ४०० रुपये

ओशोंना महाकवी सुमित्रानंदन पंत यांनी एकदा प्रश्‍न विचारला, ‘‘तुमच्या दृष्टीने भारतीय धर्मावकाशामधील सर्वांत चमकते बारा सितारे कोणते?’’ त्यांनी नावे सांगितली - कृष्ण, पतंजली, बुद्ध, महावीर, नागार्जून, शंकर, गोरख, कबीर, नानक, मीरा, रामकृष्ण, कृष्णमूर्ती. त्यात कबीराचे नाव होते, पण तितक्याच प्रमाणात जनमानसात प्रभावी असलेल्या रामाचे नाव नसल्याबद्दल सुमित्रानंदन आश्चश्‍चर्यचकित झाले होते. त्यांनी कोणते निकष लावले असे विचारले. त्यात ‘‘भारतीय अध्यात्मामध्ये मौल्यवान असे काही योगदान दिले आहे का?’’ हा निकष महत्त्वाचा होता.

Kabir Book
Book Review: देशातल्या हिंदुत्ववादी शक्तींचा वेध...

पुन्हा महत्त्वाची सातच नावे सांगा, असे म्हटल्यावर त्यांनी सांगितले, की कृष्ण, पतंजली, बुद्ध, महावीर, शंकर, गोरख, कबीर. आता सोडलेली पाच नावे का वगळली असे विचारल्यावर ते सांगतात, बुद्ध बीज आहे, तर नागार्जून त्याचे प्रकट रूप आहे. कृष्णमूर्तीही बुद्धामध्ये समाविष्ट होतात. रामकृष्ण हे कृष्णामध्ये सरळ मिसळून जातात. मीरा, नानक हे कबीरात फांदी स्वरूपात लीन होऊन जातात. कबीराचे नानकमध्ये पुरुष रूप, तर मीरेमध्ये स्त्रैण रूप दिसते. पुढे कमी करत जाताना यादीतील आणखी काही नावे वगळली जातात. शेवटी ते कृष्ण, पतंजली, बुद्ध आणि गोरखनाथ यांना भारतीय अध्यात्मांचे चार स्तंभ म्हणतात. त्यातून आता कुणालाही गाळता येणार नाही, हे ते स्पष्ट करतात. (संदर्भ ः ओशो रजनीशांचे गोरखनाथावरील पहिले व्याख्यान)

पण ओशो सारख्या पूर्वाश्रमीच्या तत्त्वज्ञानाच्या प्रोफेसरने आणि स्वतःचा मार्ग निवडणाऱ्या अध्यात्ममार्गीने भारतीय अध्यात्म विचारामध्ये मौल्यवान व्यक्तींमध्ये पहिल्या काही व्यक्तीत कबीरांचा समावेश करावा, इतक्या तोलामोलाचे कबीर होते. कबीराचा दोहा किंवा पद कानावरच पडलेले नाही, असा माणूस भारतामध्ये तरी सापडणे अवघडच. कबीराला कुणी साधक म्हणते, कुणी केवळ कवी मानते तर कुणाला ते समाजसुधारक वाटतात. वाराणसीसारख्या तत्कालीन सांस्कृतिक केंद्रामध्ये राहूनही त्यांनी धर्ममार्गात शिरलेल्या अपप्रवृत्तीवर टीका केली.

सत्तास्थानी बसलेल्या मुस्लिमांनाही त्यांनी अनेक वेळा आरसा दाखवला. प्रस्थापितांच्या जंजाळामध्ये विद्रोहीपणाचे आणि पुस्तक पांडित्याने जड, स्थिर किंबहुना प्रतिगाम्यांना पुरोगामीपणाचे धडे देणारा कबीर विविध दोह्यातून समोर येतो. अनेक पदे आजही तितकीच अर्थपूर्ण आहेत. त्यांचे गुरुबंधू सेना, धना, भवानंद, पीपा, रविदार यांच्या प्रमाणे कबीरांचा प्रभाव केवळ हिंदीपट्ट्यातच अडकून राहिला नाही, तर तो भाषांचे अडथळे ओलांडत भारतातील बहुतांश सर्वांच्या मनापर्यंत पोहोचला. केवळ धार्मिकच नव्हे धर्म न मानणारी माणसेही अनेक वेळा कबीराच्या विचारांचा आश्रय घेतात. एका अर्थाने कबीराने अध्यात्माचे लोकशाहीकरण केले असेही म्हणता येईल.

Kabir Book
Book Review: बांधावरच्या झाडांची सर्वांगसुंदर माहिती

कोणत्याही गद्य मजकुराचा सामान्यतः एकच अर्थ होतो. क्वचितच दोन अर्थ निघू शकतात. पण काव्यामध्ये असलेल्या अलंकार, प्रतीके, संस्कृती आणि अल्पाक्षरांमुळे एकाच वेळी अनेक अर्थ निघू शकतात. त्यामुळेच काव्याचा अनुवाद हा सर्वांत अवघड मानला जातो. कबीरासारख्या समाजमानसावर राज्य करणाऱ्या निर्गुणी कवीचे दोहे, पदांचा अनुवाद करणे हे खरे शिवधनुष्य उचलण्याचाच प्रयत्न होय. या आधीही कविवर्य मंगेश पाडगांवकरांनी केला होता, आता कवी इंद्रजित भालेराव यांनीही तो केला आहे.

मुळात कबीराची भाषा सहाशे वर्षांपूर्वीची तत्कालीन, त्यातच त्यांच्या कविता जपताना शिष्यांनी त्यांच्या प्रांताचा लहेजा चढवलेला, त्यामुळे मूळ पदे आणखीन वेगळी रूपे धारण करतात. त्यांच्यामध्ये तफावत दिसते. या पुस्तकामध्ये मुळातील दोहे किंवा पदे देण्याचे टाळले आहे. जनसामान्यांच्या सोयीसाठी इंद्रजित भालेराव यांनी एकाच विषयावरील दोहे एकत्र करत स्वतंत्र मराठी कवितेचे स्वरूप दिलेले आहे. अशाच अनुवादाच्या प्रयत्नातून आपली मायबोली अधिक समृद्ध होत जाणार आहे, यात शंका नाही.

त्यांच्या प्रस्तावनेतून कबीर आपल्याला कळतोच, पण परिशिष्टांमधील विविध माहितीने आपण कबीराबाबत अधिक समृद्ध होतो. हजारीप्रसाद द्विवेदी कबीराचे वैशिष्ट्य सांगताना म्हणतात. संस्काराच्या जेवढ्या म्हणून वाटा असतात, त्या सगळ्या कबीरासाठी बंद होत्या. मुसलमान असून घरात ते रितिरिवाज नव्हते. हिंदू असून हिंदू राहिलेले नव्हते. साधू असून संन्यासी नव्हते, कारण त्यांचा संसार होता. वैष्णव किंवा योगी असूनही तसे वागत नव्हते.

जणू ईश्‍वराकडूनच त्यांना इतकं वेगळं करून पाठवलेलं होतं, जणू ते नृसिंह अवताराचे मानवी प्रतिमूर्तीच होते. हिरण्यकश्यपूने अमरतेच्या अपेक्षेने असंभव स्थिती मागितल्यानंतर त्या सर्वाच्या मिलनबिंदूवर अवतीर्ण झालेल्या नृसिंहाप्रमाणेच कबीर असंभवाच्या मिलन बिंदूवर अवतीर्ण झाले होते. जिथून हिंदूत्व एका दिशेने, तर इस्लामियत दुसऱ्या दिशेने जात होती. एक ज्ञानाचा मार्ग होता, तर दुसरा निरक्षरांच्या शहाणपणाचा, एकीकडे ज्ञानमार्ग दुसरीकडे भक्तिमार्ग, एकीकडे निर्गुणाची वाट, दुसरीकडे सगुणाचा राजरस्ता अशा परस्परविरुद्ध वाहणाऱ्या रस्त्यावरील प्रशस्त चौकात कबीर उभे होते. त्यामुळे ते सगळ्यांचे गुणदोष पाहू शकत होते. इतकेच नव्हे तर आपल्या काव्यांमध्ये त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोगही करून घेतला. म्हणूनच त्यांचे अनेक दोहे समाजमनामध्ये रूजून बसले आहेत. ते आपल्या मायबोली मराठीत येत आहेत, याचाच विशेष आनंद आहे.

पोथी वाचून जगात सारे, असे कसे अज्ञानी

अडीच अक्षरे प्रेमाची जे, शिकले झाले ज्ञानी ।।

प्रेम कसे ते सांगता न ये, शब्दांतून जराही

दिली मुक्याला साखर तर तो, गोड हसुनिया खाई ।।

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com