Sharad Pawar : सेंद्रिय शेतीच्या मंथनात रमले शरद पवार

Organic Farming : सेंद्रिय उत्पादक शेतकरी गावपातळीपासून ते जगाच्या बाजारपेठेपर्यंतच्या अडचणींचा पाढा वाचतोय. शेतकऱ्यांच्या व्यथा तन्मयतेने सारे व्यासपीठ ऐकते आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Pune News : सेंद्रिय उत्पादक शेतकरी गावपातळीपासून ते जगाच्या बाजारपेठेपर्यंतच्या अडचणींचा पाढा वाचतोय. शेतकऱ्यांच्या व्यथा तन्मयतेने सारे व्यासपीठ ऐकते आहेत. त्यानंतर लाडक्या ज्येष्ठ मार्गदर्शकाला स्वतःची सेंद्रिय उत्पादने भेट देण्यासाठी व्यासपीठावर झुंबड उडतेय...ही सारी दृश्‍ये आहेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘मोर्फा’च्या राज्यव्यापी बैठकीची.

महाऑरगॅनिक अॅण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनकडून (मोर्फा) पुणे कृषी महाविद्यालयाच्या शिरनामे सभागृहात शनिवारी (ता. २२) सभा झाली. ‘मोर्फा’चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, उपाध्यक्षा स्वाती शिंगाडे, सरचिटणीस प्रल्हाद वरे व कृषी सहसंचालक सुनील बोरकर यांनी त्यानिमित्ताने राज्यातील सेंद्रिय शेतीमाल उत्पादकांच्या प्रतिनिधींना एकत्र आणून चांगले मंथन घडवून आणले. स्वतः श्री. पवार एक तासाहून अधिक या सभेत रमले. त्यांनी शेतकऱ्यांना थेट प्रश्‍न विचारीत विविध समस्या, घडामोडी बारकाईने जाणून घेतल्या.

Sharad Pawar
Sharad Pawar : शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; आरक्षण, दूध दराच्या बैठकीसाठी आग्रही

विशेष म्हणजे ‘मोर्फा’ला पुढे नेण्याचा निर्धार युगेंद्र पवार यांनी बोलून दाखविला. ते म्हणाले, ‘‘पाच वर्षांपूर्वी शरद पवार यांनी आम्हां सेंद्रिय शेतीमाल उत्पादकांना बोलावून घेतले व ‘मोर्फा’ची स्थापना करण्यास सांगितले.

सेंद्रिय शेतीमाल उत्पादकांची ‘अमूल’प्रमाणे मोठी संस्था तयार व्हावी, असे स्वप्न त्यांनी आमच्यासमोर ठेवले आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादन, ब्रॅण्डिंग, निर्यात, प्रक्रिया या सर्व क्षेत्रांत सेंद्रिय शेतीमालाच्या उत्पादकांना समूह पद्धतीने पुढे नेण्याचे ध्येय आता आपण बाळगले पाहिजे. त्यासाठी आपण ‘मोर्फा’ला बळकट करू.’’

शरद पवार म्हणाले, ‘‘द्राक्ष उत्पादकांसाठी बागाईतदार संघ काम करतो. त्याद्वारे आम्ही अनेक प्रश्‍न सोडवले. गेली ४० वर्षे मी संघाचे एकही अधिवेशन चुकवले नाही. द्राक्ष संघानंतर आता ‘मोर्फा’ही शक्तिशाली संघटना होईल. लवकरच सेंद्रिय शेतीशी संबंधित सरकारमधील खात्यांच्या प्रमुखांसोबत आपण बैठक घेऊ.

सेंद्रिय शेती व या संघटनेला निश्‍चित भवितव्य आहे. विषमुक्त शेतीत कष्टाने काम करणाऱ्या तुम्हा शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्यात. समस्या किती मोठी आहे, सरकार कोणाचे आहे याची चिंता तुम्ही अजिबात करू नका. समस्या कशा सोडवायच्या ते मी बघतो.’’

Sharad Pawar
Organic Farming : सोलापुरातील शेतकऱ्यांना हैदराबादच्या संस्थेत सेंद्रिय शेतीवर प्रशिक्षण

‘‘आरोग्यदायी स्थितीसाठी विषमुक्त शेती हे आता सूत्र बनले आहे. जगभर सेंद्रिय उत्पादनाला मागणी वाढते आहे. अशा स्थितीत देशात सेंद्रिय शेतीमाल उत्पादन व विपणनाच्या साखळीवर हवे तसे काम झालेले नाही,’’ असे निरीक्षण श्री. पवार यांनी नोंदविले. या बैठकीनंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीमालाची उत्पादने भेट देण्यासाठी श्री. पवार यांच्याभोवती गर्दी केली. प्रत्येकाच्या उत्पादनाची चौकशी करीत, प्रोत्साहन देत श्री. पवार यांनी ही गोड भेट स्वीकारली.

‘चार महिन्यांनंतरचे सरकार आपले असेल’

युगेंद्र पवार यांनी या वेळी केलेले बेधडक भाषण शेतकऱ्यांमध्ये चर्चेचे ठरले. ते म्हणाले, ‘‘राज्यातील शेतकऱ्यांच्या खूप समस्या आहेत. त्या पूर्ण होतील, अशी आताच्या सरकारकडून अपेक्षा धरता येत नाही. मात्र चार महिन्यांनंतर राज्यात साहेब (शरद पवार) नवे सरकार स्थापन करणार आहेत. ते सरकार आपले शेतकऱ्यांचे असेल आणि त्या वेळी आपण सारे जण जोमाने काम करू.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com