Pune News : ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन राज्य शासनाच्या वतीने सकारात्मक पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सोमेश्वरनगर येथे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगाम प्रारंभ प्रंसगी बुधवारी (ता. २५) अजित पवार बोलत होते. कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मोळीपूजन करून मोळी गव्हाणीमध्ये सोडून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.
आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, नीरा बाजार समितीचे सभापती शरद जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की राज्याचा यंदाचा ऊसगाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. श्री सोमेश्वर कारखान्याची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. २०२२-२३ या गाळप हंगामाकरिता राज्यात सर्वाधिक असा प्रतिटन ३३५० रुपये ऊसदर जाहीर केला आहे.
आगामी काळातही आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी संचालक मंडळांने प्रयत्न करावेत. यंदाचे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे उसाच्या क्षेत्रात व साखर उत्पादनात होणारी घट याचाही विचार करावा.
राज्यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून ऊसतोड कामगारांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सकारात्मक मार्ग काढून न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्न करण्यात येईल.कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी प्रास्ताविक व आभार मानले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने लेखापरीक्षण केल्यानंतर पर्यावरणबाबत निष्काळजी केल्याबद्दल राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याबाबत केंद्रीय पर्यावरण विभागाने कळविले आहे.
याचा विचार करता संचालक मंडळाने बदलत्या काळानुसार नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. साखर उद्योगाबाबत कारखान्यांचे संचालक मंडळ, अधिकारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अभ्यास करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.