Youth Empowering: कौशल्यसंपादन, स्वयंरोजगार व उद्योजकता 

Youth Skill Development: सध्याच्या काळात कौशल्यशिक्षणास पर्याय नाही. ‘लर्निंग टू लर्न’ आणि ‘लर्निंग टू अनलर्न’ हा या पुढील काळाचा मंत्र आहे.  नोकरी, स्वयंरोजगार अथवा उद्योजकता, या सर्वच ठिकाणी सतत शिकत राहणे याला पर्याय नाही.
Youth Empowerment
Youth EmpowermentAgrowon
Published on
Updated on

डॉ. अजित कानिटकर

Learning to Learn: ‘नोकरी द्या हो नोकरी’ अशी वणवण करत भटकणाऱ्या शेकडो युवकांसाठी खरोखरी काही दुसरे पर्याय आहेत का? या प्रश्नाचे सरळ सोपे उत्तर अवघड आहे.  पण यापुढील काळात नोकऱ्या सहजासहजी उपलब्ध असणार नाहीत.  त्यामुळे नोकरी शिवायचे तीन तरी पर्याय युवक- युवतींनी शाळेत असल्यापासूनच डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत. 

पहिला पर्याय म्हणजे कोणतेतरी उपयुक्त कौशल्य शिकण्याचा.  ही कौशल्ये कोणत्याही प्रकारची असू शकतील. कौशल्य म्हणजे हाताने करण्याचे काम. असे काम कमी महत्त्वाचे अथवा कमी प्रतिष्ठेचे आहे, ही मुळातील चुकीची समज सोडून देऊन हाताने काम करणाऱ्याला यापुढील काळात तितकेच महत्त्व आहे; किंबहुना ज्याच्या हातामध्ये काहीतरी हुन्नर आहे तो या पुढील काळाच्या अस्थिर वातावरणातही उत्पन्न कमावून सुस्थिरतेने राहू शकेल अशी शक्यता आहे. 

थोडेसे आठवून बघा. ३०- ४० वर्षांपूर्वी मध्यमवर्गात महाविद्यालय शिक्षण घेताना  टायपिंगचा क्लास लावण्याची पद्धत होती. त्यातील  साधा हिशोब असा की महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी निदान टाईपराईटर तरी वापरता आला पाहिजे.  आणखी एक प्रकारचा क्लास लोकप्रिय होता तो शॉर्टहँडचा!  म्हणजे तुमचा अधिकारी वेगाने जे बोलतो ते छोट्या लिपीमध्ये तुम्हाला लिहून घेता आले पाहिजे आणि त्यावरून नंतर सविस्तर वृत्त तयार करता आले पाहिजे. संगणक आल्यावर शॉर्टहॅन्ड व टाईपरायटिंगचे काम मागे पडले. संगणकाने ती जागा घेतली. पण इतर अनेक कौशल्यवाढीची क्षेत्रे उपलब्ध झाली आहेत. 

Youth Empowerment
Rural Youth Story : दुर्गम भागातील युवक होतोय तंत्रज्ञानात कुशल

कोपऱ्या कोपऱ्यावर दुचाकी दुरुस्त करणारी दुकाने हे त्यातले ठळक उदाहरण.  अनेक वर्षे महिलांना सोपे वाटणारे व घरबसल्या जमू शकणारे काम म्हणजे शिवणकाम.  त्या शिवणकामाची जागा आता ब्युटी पार्लर,  खाद्यपदार्थनिर्मिती व पुढे विविध उद्योगांनी घेतली आहे.  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे महिन्यापूर्वीच निधन झाले.  त्यांच्या कारकीर्दीत राष्ट्रीय पातळीवर कौशल्य प्रशिक्षणाची एक मोठी योजना केंद्र सरकारने आखली होती. ‘राष्ट्रीय  स्किलिंग कौन्सिल’ असे त्याचे नाव होते.

अनेक प्रकारच्या कुशल कामांसाठी त्या त्या विषयात प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती.  बांधकाम क्षेत्र हे त्यातील एक.  हिरे, सोन्याचे दागिने याची जडणघडण करणारे हे दुसरे.  अगदी शेतीतही आवश्यक अशा ७०-८० कौशल्यांची यादी व त्यासाठीची प्रशिक्षणव्यवस्था केली होती. नंतरच्या सरकारने ही योजना वेगळ्या नावाने चालू ठेवली आहे.  या दोन्ही योजनांचा अर्थ असा आहे की, आजच्या तरुणाला स्वतःची बुद्धी व हात वापरून काहीतरी कौशल्य शिकले पाहिजे; ज्यातून रोजगाराचे काही साधन उपलब्ध होईल.

केवळ बीए, बीकॉम पदवी घेऊन  सध्याच्या महाविद्यालय पाठ्यपुस्तकी शिक्षणामध्ये असे कौशल्य मिळण्याची शक्यता कमी असते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची योग्य अंमलबजावणी झाली तर त्यातही कौशल्य संपादनावर  भर आहे. त्यामुळे नोकरीच्या मृगजळामागे न धावत व कधीतरी अशी स्वप्नवत नोकरी मिळेल, अशा आशेवर न राहता अनेक तरुण-तरुणींनी आपल्याकडे स्वतःचे असे कोणते कौशल्य आहे, जे पुढे कामासाठी उपयोगी पडेल, स्वतःचे व कुटुंबाचे अर्थार्जन त्यातून होईल, असा विचार करणे आवश्यक आहे. 

‘योग्य माणसे मिळत नाहीत’ अशी एकीकडे तक्रार आहे. ती सर्व क्षेत्रांतच आहे.  अगदी चारचाकी गाड्यांचे कुशल, चांगले चालक मिळत नाहीत. म्हणजे योग्य सवयीचे, नियम पाळणारे सुरक्षितता व वेळ पाळणारे अशीही सर्व कौशल्ये वाहनचालकाकडे आवश्यक आहेत.  हे शिकवणारे ड्रायव्हिंग स्कूल आपल्याकडे नाहीत.  पण असे ‘चांगले विश्वासू चालक’  मोठ्या संख्येने पुढील काळात लागणार आहेत. वाहनचालक हे एक उदाहरण झाले. त्यामुळे नवीन कौशल्य शिकणे, आहे ते वाढवणे याला पर्याय नाही. 

पुढची पायरी म्हणजे स्वयंरोजगाराच्या संधी शोधत राहणे व त्या हेरून त्याला प्रतिसाद देणे. संधी कुठे कशा मिळतील हे परिस्थितीसापेक्ष आहे.  मोठ्या शहरांतील संधी, मध्यम व छोट्या आकाराच्या शहरात असतीलच अशा नाहीत.  पण तरीही त्या शहरांमध्ये वेगळ्या प्रकारच्या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असतील, अशा संधी घेता येणे त्या संधीसाठी स्वतः आवश्यक पुढाकार घेणे, धडाडी दाखवणे व स्वयंरोजगाराचा मार्ग पत्करणे हा नोकरीला एक सक्षम पर्याय आहे.  तोही तरुणांनी हाताळला पाहिजे. 

तिसरा व याहून थोडा अवघड मार्ग म्हणजे स्वतःच लघुउद्योग अथवा मध्यम उद्योग सुरू करणे.  उद्योजक होण्यासाठी उद्योजकीय मानसिकता अत्यावश्यक आहे.  कोणतीही अवघड परिस्थिती आली तरी त्याला सामोरे जाऊन, काहीसा धोका पत्करून, योग्य पैशाची जुळवाजुळव करत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारपेठेला आवश्यक असेल उत्पादन अथवा सेवा पुरवणे हे उद्योजकाचे काम आहे. 

Youth Empowerment
Indian Empowerment : स्वावलंबनाच्या दृष्टिने भारताचे पाऊल

प्रत्येकाला या सर्व गुणांसकट उद्योजक होता येईल असे नाही. पहिल्या पिढीतील उद्योजकांना भांडवलाची ही चणचण नक्कीच असते.  जोपर्यंत उद्योजक यशस्वी होत नाही तोपर्यंत बँका व शासकीय संस्था त्यांच्याकडे पुरेशा विश्वासाने बघत नाहीत. त्यामुळेच स्वतःच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची हिंमत, अनेक अडथळ्यांना पार करून जाण्यासाठीची सहनशक्ती, यशासाठी  वाट पाहण्याची व कष्ट करण्याची तयारी असेल तर उद्योजकतेचा मार्ग जमू शकेल. देशात उद्योजकतेला अनुकूल वातावरण आहे.

अनेक संधी उपलभ आहेत. नोकरीच्याऐवजी हे तीन पर्याय अनेक युवक युवती आयुष्यभरासाठी पुरेसे उत्पन्न देऊ शकतात. त्यासाठी नोकरीपलीकडचे जग पाहायला हवे.  हाताने काम करण्याची तयारी लहानपणापासून करायला हवी.  अप्रेंटिस किंवा आंतरवासिता हा एक महत्त्वाचा शब्द आहे. अनेक कामे दुसऱ्या कोणाचे बघत बघत, अनुसरण करत, कोणाच्या  हाताखाली काम करत,

प्रसंगी कमी पैशावरही काम करत शिकत शिकत,  मग प्रावीण्य मिळाल्यानंतर त्या क्षेत्रात शिरकाव करता येतो.  उमेदवारीची वर्षे आपण कशी घालवतो, हे महत्त्वाचे असते. पहिल्याच वर्षी सहाआकडी पॅकेज मिळेल अशा खोट्या समजुतीत व आशेमागे तरुणाई जर धावत राहिली तर हाताने काम करण्याचा आनंद, त्यातून  मिळणारा अनुभव व काही वेळ गेल्यानंतर मिळणारा पैसा असाच लांबचा मार्ग असणार आहे. 

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सतत शिकत राहणे.  गेले पाच दहा वर्षे सर्वत्र सांगितले जात आहे की दर तीन ते पाच वर्षांनी तुम्ही आज जे शिक्षण घेतले आहे ते पुढे उपयोगाचे ठरणार नाही.  वेगळ्या प्रकारची कौशल्ये लागतील. ‘लर्निंग टू लर्न’ आणि ‘लर्निंग टू अनलर्न’ हा या पुढील काळाचा मंत्र आहे.  त्यामुळे भले नोकरीत असो अथवा नोकरीव्यतिरिक्त कौशल्यावर आधारित स्वयंरोजगार अथवा उद्योजकतेचा मार्ग असो, सतत शिकत राहणे याला पर्याय नाही.

साध्या फोनच्या वापरापासून ते स्मार्टफोनच्या वापरामध्ये सुद्धा अनेकांचे मोठे शिक्षण झाले.  असे शिक्षण वेगवेगळ्या क्षेत्रांत घेण्याची मानसिकता जर असेल तर इतरांपेक्षा वेगाने त्यांचा प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो.  त्यामुळेच कौशल्याचे शिक्षण, स्वयंरोजगार, उद्योजकता आणि सतत स्वशिक्षण या चतुःसूत्रीवरच नोकऱ्यांचा दुष्काळ आपण काही प्रमाणात संपवू शकतो.

(लेखक आर्थिक-सामाजिक विकास या विषयाचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com