
Mumbai News : छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला नवीन शक्ती आणि नवीन दृष्टी दिली. आज, त्यांच्या पवित्र भूमीवर २१ व्या शतकातील नौदलाला बळकट करण्यासाठी एकाच वेळी विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुडी केल्या आहेत. संकटाच्या काळात भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टिने टाकलेले हे पाऊल आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता. १५) मुंबईत केले.
आयएनएस सूरत आणि आयएनएस नीलगिरी या दोन युद्धनौका, तर आयएनएस वाघशीर पाणबुडीचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. माझगाव डॉक शिपबिर्ल्डस् लिमिटेड कंपनीच्या गोदीत प्रकल्प १५ ब मध्ये तयार करण्यात आलेली विनाशिका, प्रकल्प १७ अ मधील पहिली फ्रिगेट व प्रकल्प ७५ मध्ये तयार केलेली ही पाणबुडी आहे.
या वेळी झालेल्या दिमाखदार सोहळ्याला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यसह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘आजचा दिवस भारताच्या सागरी वारशासाठी, नौदलाच्या गौरवशाली इतिहासासाठी आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी मोठा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील नौदलाला नवीन शक्ती आणि नवीन दृष्टी दिली.
आज, त्यांच्या पवित्र भूमीवर, आपण २१ व्या शतकातील नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहोत. एकाच वेळी विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुडी कार्यान्वित करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि सर्वांत अभिमानाची गोष्ट म्हणजे हे तीनही फ्रंटलाइन प्लॅटफॉर्म भारतात बनवलेले आहेत.
लांब पल्ल्याचा सागरी प्रवास, उद्योग, नौदल संरक्षण आणि जहाज उद्योगाचा आपला समृद्ध इतिहास आहे. या इतिहासापासून प्रेरणा घेत, आजचा भारत जगातील एक प्रमुख सागरी शक्ती बनत आहे. आज उद्घाटन झालेल्या प्लॅटफॉर्ममध्येही हे दिसून येते. नीलगिरी चोल राजवंशाच्या सागरी पराक्रमाला समर्पित आहे. सुरत युद्धनौका आपल्याला त्या काळाची आठवण करून देते जेव्हा भारत गुजरातच्या बंदरांद्वारे पश्चिम आशियाशी जोडला गेला होता. आज या दोन युद्धनौकांबरोबर वागशीर पाणबुडी देखील कार्यान्वित होत आहे.’’
‘भारत विस्तारवादाच्या भावनेने काम करत नाही; भारत विकासाच्या भावनेने काम करतो. भारताने नेहमीच खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे समर्थन केले आहे. म्हणूनच, जेव्हा समुद्राच्या सीमेवरील देशांच्या विकासाचा प्रश्न आला तेव्हा भारताने सागर हा मंत्र दिला. सागर म्हणजे - प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास आहे. जेव्हा जग कोरोनाशी लढताना गुडघे टेकत होते, तेव्हा भारताने ‘एक जग एक आरोग्य’ हे स्वप्न दिले. आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर विश्वास ठेवणारे लोक आहोत आणि म्हणूनच, भारत या संपूर्ण प्रदेशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी मानतो,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
नौदलाचे कौतुक
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘नौदलाने शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहेत आणि हजारो कोटींच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालाचे संरक्षण केले आहे. यामुळे, जगाचा भारतावरील विश्वास वाढला आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलावरील विश्वासही सतत वाढत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, आखाती किंवा आफ्रिकन देशांसमवेतचे आर्थिक सहकार्य सतत मजबूत होत आहे. गेल्या १० वर्षांत भारताच्या तिन्ही सैन्यांनी ज्या पद्धतीने स्वावलंबनाचा मंत्र स्वीकारला आहे तो खूप कौतुकास्पद आहे. संकटाच्या काळात भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज किती गंभीर आहे हे समजून भारताची वाटचाल सुरू आहे.’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.