Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी पात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग गुरुवारी (ता. १४) सकाळी दहा वाजताच्या सुमारास पूर्णतः थांबविण्यात आला. जायकवाडीच्या एकूण २७ गेट पैकी १० व २७ क्रमांकाच्या गेटमधून सुरू असलेला १०४८ क्युसेक विसर्ग गुरुवारी बंद केला गेला.
जायकवाडी प्रकल्पातून दोन टप्प्यात सुमारे २७ दिवस आवकेनुसार कमी अधिक प्रमाणात विसर्ग सुरू होता. तर प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून होणारा विसर्ग आधीच थांबविण्यात आला आहे.
माहितीनुसार, यंदा १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्यावतीने जाहीर केलेल्या पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून जायकवाडीच्या तुडुंबतेवर शिक्कामोर्तब झाले होते. त्या आधी काही दिवसांपासून पाणीसाठा स्थिर ठेवण्याचे प्रयत्न प्रकल्प प्रशासनाकडून सुरू होते.
त्यासाठी येणारी आवक आणि त्यानुसार पाणीसाठा स्थिर ठेवण्यासाठी विसर्ग करण्याचे काम जायकवाडी प्रकल्प प्रशासन करत होते. १३ ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रकल्प प्रशासनाने १०२.७२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या जायकवाडी प्रकल्पात क्षमतेनुसार १०२.७२ टीएमसी एकूण पाणीसाठा झाल्याचे स्पष्ट केले. त्यामध्ये ७६.६६ टीएमसी जिवंत पाणीसाठाचा समावेश होता.
जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या वतीने अधिकृतरीत्या पूर्ण क्षमतेने प्रकल्प भरल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे प्रकल्पावरून अपेक्षित सिंचन क्षमतेप्रमाणेच होईल याशिवाय प्रकल्पावरून असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा ही सुरळीत राहील, अशी आशा निर्माण झाली होती. गतवर्षी प्रकल्पात ५० टक्के ही उपयुक्त पाणीसाठा नव्हता.
यंदा मात्र चित्र बदलले आहे. त्यामुळे येत्या रब्बी हंगामासाठी तीन तर उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तने प्रकल्पातून सिंचनासाठी दिली जातील अशी आशा आहे. माहितीनुसार यंदा एक १ पासून आतापर्यंत गोदावरी पात्रातून जायकवाडी प्रकल्पात साधारणतः १११.०७७९ टीएमसी पाणी आले. त्यापैकी जवळपास ३०.४७४४ टीएमसी पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या नदीपात्रात करावा लागला.
नोव्हेंबरच्या शेवटी आवर्तन सुटण्याची शक्यता..
अलीकडच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातून नोव्हेंबरच्या अखेरच्या दहा दिवसांत पहिले आवर्तन सुटण्याची आशा आहे. प्रकल्पाचे डाव्या कालव्यावरून साधारणतः १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्र संचित होऊ शकते. तर उजव्या कालव्याच्या आधारे जवळपास ४१ हजार हेक्टरला सिंचनासाठी पाणी मिळू शकते. याशिवाय प्रकल्पावरून लहान-मोठ्या जवळपास २७ पाणीपुरवठा योजना पाणी मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.