Jalgaon News : खानदेशात शुक्रवारी (ता. १) सायंकाळी व रात्री अनेक भागांत जोरदार वादळी पाऊस झाला. काही भागात हलकी गारपीटही झाली. याचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला असून, नुकसानीचे क्षेत्र व बाधित शेतकरी संख्या वाढतच आहे.
खानदेशात २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान अनेक भागांत पाऊस व गारपीट झाली. यात २१ हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली. यात या महिन्यातही गारपीट व वादळी पाऊस सुरूच आहे. शुक्रवारीदेखील सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जळगाव भागात वादळी पाऊस व हलकी गारपीट झाली.
चोपडा तालुक्यातील माचले, मंगरूळ, बिडगाव, लोणी, वरगव्हाण, धानोरा, अडावद, यावलमधील किनगाव, आडगाव, डांभुर्णी, साकळी आदी भागातही वादळी पाऊस झाला. काही मिनिटात जोरदार पाऊस झाल्याने शेतांचे बांध फुटले. काही भागात शेतातच पाणी तुंबले.
कलिंगड दरात लागलीच घसरण
कलिंगड नाशवंत फळ आहे. पक्व झाल्यानंतर दोन-तीन दिवसातच ते काढून बाजारात पोचवावे लागते. यात पक्व झालेल्या कलिंगडाची काढणी या पावसाने अनेक भागात रखडली आहे. गुरुवारी (ता.२९ फेब्रुवारी) कलिंगड जागेवर किंवा थेट शिवार खरेदीत विक्रीसंबधी १२ रुपये ७० पैसे प्रतिकिलो या दरात सौदे झाले होते.
शुक्रवारी त्यासाठी सकाळी अनेक भागात काढणीदेखील झाली. परंतु शुक्रवारी दुपारी, सायंकाळी पावसाने कलिंगडाच्या क्षेत्रात धुमाकूळ केल्याने कलिंगडाची कमी दरात खरेदी सुरू झाली आहे. १० ते ११ रुपये प्रतिकिलोचा दर खरेदीदार देवू करीत आहेत. याचाही मोठा फटका कलिंगड केळी उत्पादकांना बसत आहे.
शेतकऱ्यांची तारांबळ
शुक्रवारी दुपारी अनेक भागात गहू, हरभरा कापणी, मळणीची कामे सुरू होती. ही कामे सुरू असतानाच वादळी पाऊस सुरू झाला. यात गहू, हरभऱ्याची नासाडी झाली. उघड्यावरील कोरडा चाराही भिजला. तसेच कलिंगड, केळी, पपईची काढणीदेखील थांबवावी लागली. अनेक शेतांत शेतमालाने भरलेली वाहने रूतली.
ती बाहेर काढण्यासाठी मोठी सर्कस रात्रीपर्यंत करावी लागली. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, वित्तीय संकट तयार झाले आहे. खानदेशात गुरुवारपर्यंत (ता. २९ फेब्रुवारी) वादळी पाऊस, गारपिटीत सुमारे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीचे क्षेत्र व बाधित शेतकरीसंख्या या पावसाने पुन्हा वाढली आहे. शुक्रवारच्या वादळी पावसात सुमारे दीड ते दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.