Cooperative Department : सहकार आयुक्तांच्या बदलीचे कवित्व चालूच

Cooperative Commissioner : राज्याच्या सहकार आयुक्तपदावरून अनिल कवडे यांच्या अचानक झालेल्या बदलीचे कवित्व संपलेले नाही.
Cooperative Department
Cooperative Department Agrowon

Pune News : राज्याच्या सहकार आयुक्तपदावरून अनिल कवडे यांच्या अचानक झालेल्या बदलीचे कवित्व संपलेले नाही. निवृत्तीला केवळ दोन महिने उरलेले असताना त्यांना पदावरून कशासाठी हटविण्यात आले, असा सवाल सहकार विभागातील काही उपनिबंधक उपस्थित करीत आहेत.

सहकार आयुक्त पदावरील श्री. कवडे यांचा तीन वर्षांचा कालावधी संपलेला होता. निवृत्तीला सहा महिने राहिलेले असल्यास आणि वादग्रस्त पार्श्वभूमी नसल्यास अशा सनदी अधिकाऱ्याची शक्यतो बदली केली जात नाही. राज्याच्या प्रशासकीय वाटचालीत हा संकेत बऱ्यापैकी पाळला जात होता. हा संकेत श्री. कवडे यांच्याबाबत मोडण्यात आला आहे.

त्यांची सहकार आयुक्तपदी अचानक बदली केली गेली. या पदावर तत्कालीन विभागीय आयुक्त सौरभ राव यांना नियुक्त करण्यात आले. बदली करताना अनेक वेळा कोणत्या पदाची जबाबदारी दिली जाणार याविषयी देखील मंत्रालयातून संबंधित सनदी अधिकाऱ्याला माहिती दिली जाते. तथापि, अशी पूर्वकल्पना देण्याचे टाळण्यात आले आहे.

Cooperative Department
Cooperative Policy : कायदेशीर सुधारणा सहकाराला बळ देतील

“सहकार आयुक्तालयाचा गाडा हाकणे तसे क्लिष्ट काम आहे. सहकार, शेती व्यवस्थेची माहिती असलेल्या अधिकाऱ्याला आयुक्तपदी नियुक्त करणे अधिक उपयुक्त ठरते. तशी माहिती नसलेला अधिकारी आल्यास प्रशासन चालते; परंतु सहकाराची नाडी अशा अधिकाऱ्याला लवकर सापडत नाही. सहकाराची जाण नसलेल्या अधिकाऱ्याकडे सहकार आयुक्त सोपविले गेल्यास दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होतात.

असे काही अधिकारी यापूर्वी नियुक्त झालेले आहेत. श्री. कवडे यांनी अनेक समस्यांना तोंड देत सहकार आयुक्तालयातील धोरणात्मक कामाची चांगली घडी बसविली होती. त्यामुळे त्यांना याच पदावर सन्मानपूर्वक निवृत्त होऊ देणे राज्य सरकारसाठी प्रशस्त ठरले असते,” असे सहकार विभागाच्या एका उपनिबंधकाने सांगितले.

Cooperative Department
Cooperative Sector : सहकाराने केवळ साखर, दूध उद्योगात अडकू नये

राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत व पुरेसे कर्जवितरण झाले की नाही याचा आढावा घेणे, चांगल्या बॅंकांना प्रोत्साहन देणे; तर कर्जवितरणात पिछाडीवर राहणाऱ्या बॅंकांचे कान उपटणे, कर्जमाफीस चालना, विविध कार्यकारी सोसायट्यांचे संगणकीकरण अशा विविध आघाड्यांवर श्री. कवडे यांच्याकडून चांगला पाठपुरावा झाला.

विशेष म्हणजे त्यांच्याकडून आकसापोटी सहकारातील अधिकारी, सहकारी किंवा खासगी बॅंकांवर एकही कारवाई झालेली नाही. उलट राज्यभर दौरे करीत प्रेरणादायी भाषण (मोटिव्हेशन स्पीच) देण्यात ते आघाडीवर होते, असे कर्मचारी सांगतात.

सहकार विभागातील एका विभागीय सहनिबंधकाने वेगळे मत मांडले. ‘‘श्री. कवडे यांची बदली नियमानुसारच झालेली आहे. त्यांना साखर आयुक्त म्हणून तोलामोलाचे पद मिळाले आहे. तसेच नवे सहकार आयुक्त श्री. राव हे देखील कुशल प्रशासक आहेत. त्यांचा अनुभव, कायदेशीर अभ्यास व केंद्र शासनातील संबंध यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तालयाच्या कामाला गती मिळू शकते,’’ असे या सहनिबंधकाचे म्हणणे आहे.

गायकवाड यांच्याबाबतही असेच घडले

जीएसडीए, अर्थात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे तत्कालीन संचालक शेखर गायकवाड यांच्याकडे सहकार आयुक्तपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यांना लवकरच या पदावरून हटविले होते. ग्रामविकास व शेती क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या श्री. गायकवाड व श्री. कवडे या दोन्ही सनदी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्त म्हणून काम करण्याची इच्छा होती. मात्र त्यांना या पदापासून सतत दूर ठेवले गेले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com