Pune News : ‘‘राज्याच्या सहकाराने केवळ साखर कारखाने, दूध संघांमध्ये अडकून पडू नये. ‘सहकारातून समृद्धी हे घोषवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी बाजारपेठा, ग्राहक मागणीचा बारकाईने अभ्यास करीत सहकाराने आता नव्या उद्योगांमध्ये उतरावे,’’ असे आवाहन राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने (वॅमनीकॉम) पुण्यात शुक्रवारी (ता.२) आयोजित केलेल्या ‘स्टार्टअप कॉन्क्लेव्ह अॅन्ड अॅवॉर्ड २०२४’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सहकार आयुक्तालयाच्या अपर निबंधक डॉ. ज्योती मेटे, ‘वॅमनीकॉम’च्या संचालिका हेमा यादव, दूरदर्शनच्या पुणे विभागाचे प्रमुख इंद्रजित बागल उपस्थित होते. सहकार व स्टार्टअप क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या काही सहकारी संस्थांना या वेळी पारितोषिकांनी गौरविण्यात आले.
श्री. प्रभू म्हणाले, “सहकाराला नव्या विचाराची, दिशेची गरज आहे. नवकल्पना प्रत्यक्षात आणल्या तरच प्रगतीची दारे उघडतात. महाराष्ट्रातील सहकाराचे कार्य मोठे आहे. राज्यात थोर विभूतींच्या कर्तृत्वातून माळरानावर साखर कारखाने, दूध डेअरी उभ्या राहिल्या. त्यांनी सहकाराची पाळेमुळे खोल रुजवली. सहकारी साखर किंवा दूध उद्योग हे यापुढेही चालूच राहतील. मात्र, आता उद्योगाची क्षेत्रे बदलावे लागतील. सहकार टिकून राहण्यासाठी गरजेनुसार नवे उद्योग उभारावे लागतील.”
डॉ. मेटे म्हणाल्या, ‘‘देशाच्या एकूण सकल उत्पादनात (जीडीपी) सेवा क्षेत्राचा वाटा मोठा असल्याचे सांगितले जाते. परंतु, कृषी क्षेत्राचे योगदानदेखील अजिबात कमी नाही. मुळात, देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कृषी आणि सहकाराने मोठे बळ दिले आहे. गावपातळीवर सहकाराला चालना देण्यासाठी सरकारी पातळीवर सतत प्रयत्न चालू आहेत.
त्यासाठी आता विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या उपविधीमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे सोसायट्यांना नवे व्यवसाय व सेवा सुरु करण्याची संधी मिळेल. राज्यातील सर्व सहकारी संस्थांनी बदलत्या काळानुसार ग्राहकाभिमुख होत व्यावसायिक अंग बळकट केले पाहिजे.’’
मोहापासून दारुऐवजी लाडू
सुरेश प्रभू यांनी स्टार्टअप प्रदर्शनाला भेट देत बारकाईने माहिती घेतली. ते म्हणाले, “मी देशाचा वाणिज्य मंत्री होतो. स्टार्टअप इंडियाची जबाबदारी माझ्याकडेच होती. देशभर मी नवउद्योजकांना भेटलो व त्यांना प्रोत्साहन दिले.
आज त्यातील अनेक जण चांगले उद्योजक होत असल्याचे पाहून आनंद होतो आहे. गडचिरोलीतील नवउद्योजकाने मोहाच्या फुलांपासून लाडू निर्मितीचा उद्योग सुरु केला आहे. मोहापासून दारुऐवजी लाडू तयार करण्याचा हा व्यवसाय उल्लेखनीय आहे. त्यामुळे ग्राहकांना काय पाहिजे हे शोधून व्यवसाय, उद्योग उभारावेत. ते चिकाटीने चालवावेत. त्यात यश हमखास मिळते.”
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.