Onion
OnionAgrowon

Onion Market : नियमनमुक्तीद्वारे फुटली कांदा कोंडी

Onion Auction : हमाल-मापारी व व्यापाऱ्यांतील संघर्षामुळे बाजार समित्यांतील लिलाव ठप्प झाले होते. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या मदतीने व्यापाऱ्यांनी ७ ते ८ ठिकाणी बाजार समितीच्या बाहेर खासगी कांदा खरेदी सुरू केली आहे.

Nashik News : हमाल-मापारी व व्यापाऱ्यांतील संघर्षामुळे बाजार समित्यांतील लिलाव ठप्प झाले होते. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या मदतीने व्यापाऱ्यांनी ७ ते ८ ठिकाणी बाजार समितीच्या बाहेर खासगी कांदा खरेदी सुरू केली आहे. एकीकडे नियमनमुक्तीच्या आधारे कांदा विक्रीची कोंडी फुटली. ही बाब स्वागतार्ह आहे, मात्र त्यात पारदर्शकतेचा अभाव आणि दरात तफावत आहे. अशातच लासलगाव बाजार समितीने शुक्रवारी (ता. १२) व्यापाऱ्यांच्या भूमिकेला आव्हान देत नव्या व्यापाऱ्यांना परवाने देत लिलाव सुरू करून दाखविले आहेत.

सटाणा, देवळा, नामपूर, दिंडोरी, लासलगाव, नामपूर, नांदगाव, बोलठाण, येवला, सायखेडा अशा विविध ठिकाणी बाजार समित्यांबाहेर खासगी खरेदी केंद्रांवर शेतकरी संघटनांच्या माध्यमातून कांदा खरेदी झाली आहे.

Onion
Onion Purchasing : नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून कांद्याची बाजार समित्यांबाहेर खरेदी

त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा मात्र या खरेदीत लेखी व्यवहारातील पद्धती अधिकृत नाहीत. ही खरेदी बेकायदेशीर असल्याचा माथाडी मंडळाचा आरोप आहे. खरेदीत फसवणूक झाल्यास पैशाची खात्री कोण देणार, जबाबदारी कोण घेणार असे अनेक प्रश्न आहेत. शिवार खरेदीच्या अंगाने शेतीमाल विक्रीची कोंडी फुटली असली तरी दुसरे आव्हान निर्माण झाले आहे. यामध्ये शासनाच्या यंत्रणेकडून नियमन केले जावे, असेही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

लासलगाव येथे लिलाव सुरू

लासलगाव बाजार समितीने लिलावाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करून नविन व्यापाऱ्यांना आवाहन केले. अनुज्ञप्तीची पुर्तता करून घेऊन त्यांच्यामार्फत शुक्रवारी कांदा लिलाव सुरू केले गेले. लिलावाच्या पहिल्या सत्रात सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह संचालक उपस्थित होते. या वेळी भावेश केदा आहेर (धामोरी) यांचा कांदा हा शेतीमाल शिवस्वराज्य एक्स्पोर्टस् यांनी २,९०० रुपयांनी खरेदी केला. सायंकाळपर्यंत ६२२ वाहनांची आवक झाली. किमान ८०१, कमाल २९०० तर सरासरी १५०० रुपये दर मिळाला.

Onion
Onion Market : कांदा लिलाव दहा दिवसांपासून ठप्प

येवल्यात शेतकरी, हमाल-मापाऱ्यांत हाणामारी

येवला बाजार समितीमधील परवानाधारक व्यापाऱ्यांनी खासगी ठिकाणी कांदा खरेदी सुरू केली. या निर्णयाला शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला. मात्र या बाजार समितीबाहेरील लिलाव प्रक्रियेला हमाल व मापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. यामुळे शेतकरी व हमाल-मापारी यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी झालेल्या दगडफेकीत एक शेतकरी जखमी झाला. घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात असल्याचे समजते. पोलिसांनी हस्तक्षेप करत ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली.

लेव्हीच्या मुद्द्यावरून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तूर्तास शेतकऱ्यांची अडचण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. काढणी होऊन कांदा शेतात पडला आहे. पावसाळी वातावरणात बहुतांश शेतकऱ्यांकडे साठवणूक सुविधा नाही. त्यामुळे त्यांची अडचण होऊ नये. आचारसंहिता संपल्यानंतर राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, ही प्रशासनाची भूमिका ऐकायला व्यापारी तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी हितासाठी कामकाज सुरू केले.
बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, लासलगाव बाजार समिती.
देवळा येथे कांदा विक्री केंद्र सुरू केले आहे. उधार कांदा विकू नये. १२ तासाच्या आत रोखीने पेमेंट घ्यावे. यासाठी काही अडचणी आल्यास ५ व्यापारी व ५ शेतकरी यांची समन्वय समिती स्थापन केली आहे. त्यांच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे.
कृष्णा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com