Onion Market : कांदा लिलाव दहा दिवसांपासून ठप्प

Onion Rate : मार्चअखेर २९ पासून बहुतांश बाजार समित्यांच्या मुख्य व उपबाजार आवारात लिलाव ठप्प आहेत.
Onion Market
Onion MarketAgrowon

Nashik News : मार्चअखेर २९ पासून बहुतांश बाजार समित्यांच्या मुख्य व उपबाजार आवारात लिलाव ठप्प आहेत. त्यातच ४ एप्रिलपासून बाजारात लिलाव पूर्ववत होतील, अशी अपेक्षा होती. मात्र लेव्हीच्या मुद्द्यावर हमाल मापाऱ्यांनी कामकाजात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

तर हमाली, तोलाई व वाराई कपात करणार नाही; मात्र कामकाजासाठी तयार आहोत, अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे. या दोन्ही भूमिका परस्परविरोधी असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बाजार समिती कामकाज बंद ठेवता येणार नाही, याबाबत पणन संचालनालयाने पत्र काढून स्पष्ट केले आहे. मात्र असे असताना हमाल, मापारी व व्यापाऱ्यांच्या या भांडणात बाजार समितीची कोंडी झाली तर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

एकीकडे दोन्ही घटकांच्या मागण्या या न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज सुरू झालेले नाही. तर दुसरीकडे बाजार समिती व उपबाजारातील आवारात सुट्यांमुळे लिलाव बंद राहत असल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे.

Onion Market
Onion Market : कांदा मार्केटमध्ये व्यापाऱ्याचे ८ लाखांचे चेक बाऊन्स; शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ

उन्हाळी कांदा व इतर माल विक्री करता येत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मार्चअखेर विविध सणांमुळे जिल्ह्यातील कांदा बाजार सलग चार दिवस बंद होता. माथाडी कामगारांचे प्रश्‍न, शनिवार, रविवारची सुटी, अमावस्या, गुढीपाडवा आदींमुळे बाजार बंद राहणार आहे. त्यापुढील कामकाजाबाबतही स्पष्टता नाही.

एकीकडे लग्नसराई व सणासुदीच्या काळात कौटुंबिक खर्च व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतीमालाची विक्री करतात. मात्र बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी वाढत आहेत त्यातही कुठलाही तोडगा अद्याप न निघाल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. बाजार समित्यांचे कामकाज परत सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

Onion Market
Onion Market : कांद्याची खेडा खरेदी घसरणीवर

...असे राहिले कामकाज बंद

शुक्रवारी (ता.२९ मार्च) गुड फ्रायडे, शनिवारी (ता. ३० मार्च) रंगपंचमी, रविवारी (ता. ३१ मार्च) नियमित सुट्टी तर सोमवारी (ता. १), मंगळवारी (ता.२) व बुधवारी (ता. ३) व्यापाऱ्यांच्या मार्च अखेरच्या व्यवहारामुळे बाजार बंद होता. गुरुवारी (ता. ४) बाजार पूर्ववत सुरू होईल, असे सांगण्यात आले होते.

त्यातच हिशोब पट्टीतून हमाली, तोलाई व वाराई कपातीसंदर्भात हमाल-मापारी यांच्याकडून पत्र आले. त्यामुळे गुरुवारी व शुक्रवारी बाजार बंद राहिला. ६ एप्रिलला शनिवार, तर आज (ता. ७) रविवार आहे. उद्या (ता. ८) अमावस्या तर मंगळवारी (ता. ९) गुढीपाडव्याची सुट्टी आहे. एकंदरीत २९ मार्च ते ९ एप्रिल असे सलग १२ दिवस लिलाव बंद राहणार आहेत.

उठसूठ नेहमी बाजार समित्या बंद ठेऊन शेतकरी नाहक भरडला जातोय. व्यापारी आणि हमाल-मापाऱ्यांतील वादामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. जिल्हा उपनिबंधक, कामगार उपायुक्तांशी बोलणे झाले आहे. योग्य तोडगा काढून बाजार समित्या तत्काळ सुरू कराव्यात.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com