nitrogen Management
Agriculture Management Agrowon

Nitrogen Management : शाश्वत शेतीसाठी संतुलित नत्र व्यवस्थापन वापराची गरजेचे

Sustainable Agriculture : नत्र हे अन्नद्रव्य पिकांच्या शाकीय वाढीसाठी आणि वनस्पतीमध्ये प्रथिने निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. ते पिकांना लागणाऱ्या प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलन ठेवण्याचेही काम करते.
Published on

डॉ. एन. एम. कोंडे, डॉ. एस. डी. जाधव, डॉ. एलिसन ईगल

भारतातील भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास देशांमध्ये विविध प्रकारच्या जमिनी आढळून येतात. त्यात हलक्या, हलक्या ते मध्यम आणि भारी जमिनीचा समावेश होतो. जमिनीतील नत्राच्या एकूण साठ्यापैकी ५ टक्क्यांपेक्षाही कमी नत्र पिकांना उपलब्ध स्वरूपात असतो. पीक पोषणासाठी हेच उपलब्ध नत्र गरजेचे असते. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक ७८ टक्के भाग हा नायट्रोजन (नत्र) असला, तरी त्याचा प्रत्यक्ष वापर वनस्पतींना करता येत नाही.

विदर्भातील वातावरणाचा विचार करता हा प्रदेश उष्ण हवामान, अनियमित पाऊस, कमी आर्द्रतेचा आहे. तर भौगोलिक परिस्थिती व विशेषतः जमिनीचा विचार करता येथे मध्यम ते भारी जमिनी आढळतात. या भागातील जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण अत्यंत कमी ते कमी या वर्गवारीमध्ये असल्याचे दिसून येते. या भागातील मुख्य पिकांमध्ये सोयाबीन, कापूस, भात, तेलवर्गीय पिके, हरभरा, गहू आणि डाळवर्गीय पिके यांचा समावेश होतो. या सर्व पिकांसाठी नत्र या अन्नद्रव्याच्या अधिक वापर केला जातो.

हा नत्राचा पुरवठा सामान्यतः युरिया, डाय अमोनिअम फॉस्फेट या रासायनिक खतांद्वारे केला जातो. तसेच त्याची काही प्रमाणात उपलब्धता ही शेणखत, गांडूळ खत यांसारख्या सेंद्रिय खतांद्वारे केली जाते. या भागामध्ये मुळात माती परीक्षण करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर अंदाजे व असंतुलितपणे केला जातो.

याचा परिणाम जमिनीतील अन्य अन्नद्रव्याच्या संतुलनामध्ये होऊन त्याचा अप्रत्यक्ष परिणाम पीक पोषणावर होत असतो. अतिरिक्त खते देण्यासाठी खर्च वाढतो. त्यातच विदर्भातील काळ्या जमिनीतील नत्राची कार्यक्षमता ही ३५ ते ४० टक्के आहे. याचाच अर्थ ६० ते ६५ टक्के नत्राचा ऱ्हास होतो. म्हणजेच दिलेल्या खतमात्रेतील बराचसा भाग हा पाण्यासोबत निचरा होऊन जातो किंवा वातावरणात बाष्पीभवनाद्वारे मिसळला जातो. वातावरणात मिसळल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळते. भूजलामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढल्याने ते प्रदूषित होत आहे.

हरितगृह वायू उत्सर्जन आणि नत्र यांचा सबंध

देशातील हरितगृहवायूंच्या उत्सर्जनामध्ये ऊर्जा क्षेत्रातून उत्सर्जन सर्वाधिक असले तरी कृषी क्षेत्र हे दुसऱ्या स्थानावर आहे. सन २०२४ च्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर एकूण हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये कृषी क्षेत्राचा १० ते ३० टक्के वाटा आहे. भारत देशामध्ये तो १४ टक्के आहे. सन २०२३-२४ मध्ये भारत देशामध्ये एकूण ३०.६४ दशलक्ष मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आला त्यात सर्वाधिक २०.५ दशलक्ष मेट्रिक टन नत्रयुक्त खते होती.

nitrogen Management
Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

हा वापर २०२२-२३ च्या तुलनेत तो १.२ टक्क्याने जास्त होता. (वार्षिक अहवाल -Fertilizer Association of India -२०२३-२४). जमिनीतून नत्राच्या ऱ्हासामागे निचरा होणे (Leaching), डीनायट्रिफिकेशन, जमिनीची धूप, पिकांद्वारे शोषण, अस्थिरीकरण (Volatilization) ही प्रमुख कारणे आहेत. जमिनीमध्ये अतिरिक्त प्रमाण वापरले गेलेले नत्राचीच विविध रूपे तायर होऊन, त्याचे वातावरणात उत्सर्जन होते. त्यामुळेच माती परीक्षणानंतर पिकाच्या शिफारशीत गरजेइतकेच नत्र खत काटेकोरपणे दिले पाहिजे.

नत्र व्यवस्थापनासाठी उपाययोजना

नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांचे योग्य संतुलन ठेवणे आणि योग्य निविष्ठांचा वापर या तिन्ही घटकांवर सातत्याने काम करण्याची आवश्यकता आहे. उदा. माती परीक्षण आधारित खतांचा वापर, संतुलित खत व्यवस्थापन, खते टाकण्याची वेळ आणि पद्धत, पीक फेरपालट, एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा एकात्मिक वापर, पीक पद्धतीमध्ये शेंगवर्गीय पिकांचा समावेश, आच्छादन पिकांचा समावेश, योग्य मशागत पद्धती + जैविक खतांचा वापर, शास्त्रीय सिंचन इ.

nitrogen Management
Nitrogen Fertilizer : पिकाला नत्राची कमतरता का भासते ? ओळखा जमिनीतील नत्र कमी होण्याची कारणे

पर्यावरण संरक्षण निधी संस्थेसोबत संशोधन सुरू

पर्यावरण संरक्षण निधी ही अमेरिकेतील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी कार्यरत संस्था असून देशातील खोल काळ्या जमिनींमध्ये नत्राचा असंतुलित वापर आणि त्याचा पर्यावरणातील विविध घटकांवर होणारा परिणाम या मुख्य मुद्द्यावर काम करीत आहे. या संस्थेसोबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचा सामंजस्य करार करण्यात आला असून, विदर्भातील काळ्या जमिनींमध्ये नत्र या अन्नद्रव्याचे परिणाम, असंतुलन, नत्राचा होणारा ऱ्हास, अधिक कार्यक्षमता आणि पूरक निविष्ठा यासाठी एक वर्षापासून अभ्यास सुरू आहे.

त्या अंतर्गत ज्वारी -गहू, सोयाबीन -गहू आणि कापूस या मुख्य पिकांमध्ये नत्राच्या संतुलित वापराचे प्रयोग सुरू आहेत. नत्राचा कमीत कमी वापर करून अधिक उत्पादन घेण्यासंदर्भात नोंदी घेतल्या जात आहेत. सोबत मातीचा पोत सुधारण्यासाठी विविध सेंद्रिय निविष्ठांच्या एकत्रिकरणाचे नत्राच्या ऱ्हासावरील परिणाम तपासले जात आहेत.

त्यामुळे नत्राची कार्यक्षमता वाढवणे आणि त्याचा त्याचा ऱ्हास रोखण्यामध्ये सेंद्रिय निविष्ठांची भूमिका तपासली जात आहे. या अभ्यासाद्वारे पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा विकास करणे शक्य होईल. त्याचे निष्कर्ष आशादायक आहेत. नत्राच्या संतुलित वापराचे सोयाबीन -गहू, ज्वारी- गहू तसेच कपाशी पिकात पोषण आणि उत्पादकतेवर चांगले परिणाम आढळून आले आहेत.

संपूर्ण सेंद्रिय निविष्ठाचा वापर करून नायट्रेट व अमोनिया स्वरूपातील नत्राच्या साठ्यात इतर पद्धतींच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र ही वाढ मुख्यत्वे ज्वारी-गहू पीक पद्धतीमध्ये उत्पादनवाढीसाठी फायदेशीर आढळून आली नाही. याचाच अर्थ जमिनीतील पीक पोषणाच्या दृष्टीने नत्राचे संतुलन राखण्यासाठी माती परीक्षणानुसार संतुलित आणि एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्यांचा वापर करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

डॉ. एन. एम. कोंडे (सहयोगी प्राध्यापक),

९८२२८७५३७५

(डॉ. एन. एम. कोंडे आणि डॉ. एस. डी. जाधव हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत असून, डॉ. एलिसन इगल या अमेरिकन संस्था पर्यावरण संरक्षण निधीमध्ये शास्त्रज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com