Farmer Success Story : एका गुराख्याचे सीमोल्लंघन

Animal Rearing : पुणे जिल्ह्यातील अतिपावसाचा मावळ प्रदेश. जमीन धरणात गेलेली. शिक्षण नाही, हाताला काम नाही. तरीही हताश न होता वांद्रे गावच्या दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या गणपत धोंडू वाळंज या गुराख्याने दारिद्र्याशी लढा दिला. शेती, पशुपालनासह बलुतेदारीतील विविध व्यवसायांमधून कुटुंबाला मोठे केले.
Agriculture Story
Agriculture StoryAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : पुण्याच्या पश्चिमेकडील मुळा नदीच्या खोऱ्यात निखुंडे गाव होते. शिवकाळात लोक दऱ्या-डोंगरांत राहून पारंपरिक शेती आणि पशुपालनाआधारे आनंदाने जगत होते. धोंडू वाळंज हे त्यापैकीच शेतकरी. सन १९२७ मध्ये मुळशी धरण उभे राहिले.

त्यात गावातील शेकडो शेतकऱ्यांबरोबर धोंडू यांच्या परिवारालाही विस्थापित व्हावे लागले. आपल्या मुलांबाळांसह समोरच्या डोंगरालगतच्या जंगलात ते राहू लागले. हे जंगल म्हणजेच आताचे वांद्रे गाव. रोजच्या जगण्याशी संघर्ष करीतच धोंडू यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा म्हणजे आत्ताचे ७५ वर्षांचे गणपतराव वाळंज.

परिस्थितीने जगायला शिकवले

जंगलात जगायचे कसे हा प्रश्न होता. मावळात तुफान पाऊस असतो. भाताव्यतिरिक्त काहीच पिकत नव्हते. त्यामुळे धरण बांधणाऱ्या कंपनीच्या दारात नोकरीसाठी उभा राहिलो. तेथे तीन रुपये रोजाने मजुरी करू लागलो. कुटुंब जगविण्यासाठी अजून पैशांची गरज होती. सुतार काम शिकलो.

लोकांना शेती अवजारे, घराचे सांगाडे तयार करून देऊ लागलो. घरे बांधताना माती, वीटकाम करावे लागते. मग गवंडी बनलो. पाथरवटाचे कामही शिकलो. त्यातून लोकांची घरेदारे, मंदिरे बांधू लागलो. धरणात मासेमारी केली. हे सारे करताना मूळ गुराखी धंदा सोडला नाही. मुळशीच्या रानात जनावरे चारताना गणपतराव आनंदाने सांगत होते.

Agriculture Story
Agriculture Success Story : अल्पभूधारक देसले बंधू झाले ४५ एकरांचे मालक

मुलांना घडवले

गणपतरावांनी १९७२ च्या दुष्काळात रानातील बांबूच्या बिया कुटून त्याची भाकरी तयार करीत कुटुंबाला सावरले. मुकुंद, शंकर, भरत आणि शरद अशी चार गुणी मुले त्यांना आहेत. स्वतःच्या पायांवर उभे राहून स्वयंरोजगार मिळविण्याच्या दृष्टीने त्यांना घडवले. सातवी शिकलेला मुकुंद आणि नववी झालेला शंकर यांनी वडिलांकडून बलुतेदारीतील कौशल्य मिळवले. भरत बारावी शिकून वायरमन झाला.

गणपतरावांनी पोटाला चिमटा काढून मुलगा शरदला स्थापत्य अभियंता घडवले. त्याने शिक्षणासोबत पुण्यात ‘प्लंबिंग’ आणि मजुरीचाही अनुभव घेतला. शंकर काही वर्षे मुंबईत डबेवाले झाला. सात वर्षानंतर तो पुन्हा गावी आला.

त्याने कैलासगडावर जीर्णोद्धाराची कामे केली आहेत. मुलांना चांगले वळण लागावे असा माझा प्रयत्न असतो. शंकरला माझ्यासारखीच कामाबरोबर भजनातही दंग राहण्याची सवय जडली आहे. सोळा वर्षांपासून तो परिसरातून शिर्डी येथे श्री. साईबाबा देवस्थानाकडे जाणाऱ्या पालखीचा प्रमुख आहे असे गणपतरावांनी सांगितले. मुकुंद डोंगरातील शेती तर शंकर जनावरे सांभाळतो.

शेती विकायची नाही, तर घ्यायची

गणपतरावांनी पै पै साठवत पुण्याच्या कोथरूड भागात छोटी जागा घेत घर बांधून तेथे मुलांना शिक्षणासाठी ठेवले. शेती विकत घेतली. आज ते २० एकरांचे मालक आहेत. जगण्यासाठी शेती विकायची नाही; उलट पडेल ते काम करायचे, त्यातून पैसे साठवायचे आणि शेती विकत घ्यायची हे सूत्र ठेवले.

एकेकाळी रोज रात्री टेंभा लावून त्याच्या प्रकाशात धरणालगत ते मासेमारी करायचे. आदरवाडी, कोंडेथर, डोंगरवाडी, दावडी, निवे, पिंपरी या गावात आपल्या जुन्या सायकलवरून ते मासे विकायला जात. अनेकदा दररोज ३० किलोमीटरपर्यंतची रपेट त्यांना मारावी लागली आहे. आता मासेमारी थांबवली आहे. मुलगा शंकरमध्येही मासेमारीची कला अवगत आहे.

ॲग्रो विशेष

Agriculture Story
Agriculture Success Story : भाजीपाला, दुग्धोत्पादनात ओळख सावरगावतळची!

गावासाठी काही तरी करू शकलो...

गणपतराव सांगतात की डोक्यावर कधी कर्ज ठेवले नाही. सतत जोडधंदे केले. त्यातून पै पै साठवत गेलो. त्यामुळेच परिवाराची प्रगती झाली. गावातील विकास कामांसाठीही माझी धडपड असते. आमचे गाव शांत आणि विकासाला पाठिंबा देणारे आहे.

मधल्या काळात खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जून आमच्या गावाला भेट दिली होती. धरणात जमीन गेलेल्या वाळंज परिवाराने कष्टातून पुन्हा जमीन घेतली. त्यातील २० गुंठे ग्रामपंचायतीसाठी दान केली आहे. कधी काळी पोटात अन्न नसताना मोलमजुरीसाठी संघर्ष केला त्या गावासाठी काहीतरी करू शकलो याचे मोठे समाधान आहे असे गणपतराव अभिमानाने सांगतात.

सखुबाईंची साथ

पत्नी सखुबाईंनी गणपतरावांना जिद्दीने साथ दिली आहे. त्यांच्याही कष्टाची प्रशंसा होत असते. माझे माहेर याच गावाचे आहे. लग्न झाल्यानंतर मी कोणत्याही कामाची लाज बाळगली नाही. धनी सुतार काम करू लागल्यावर त्याच्या समोर करवत ओढायला मीच बसायचे. शेती, गुरेढोरे वळणे, जंगलातून मोळ्या आणणे अशी सारी कामे न चुकता केली असे सखूबाई सांगतात.

सुनांनी घराला नेले पुढे

वाळंज परिवारातील सुनांचेही घराला पुढे नेण्यात महत्त्वाचे योगदान आहे. पैकी सुषमा ( मुकुंद यांची पत्नी) यांनी घरकामात तर कविता ( शंकर यांची पत्नी) यांनी गोठा सांभाळण्यापासून ते शेतीतील सर्व कामांत गुंतवून घेतले आहे. तिसरी सून सौ. तृप्ती (भरत यांची पत्नी) पुण्यात खासगी इस्पितळात आरोग्यसेविका आहेत. विशेष म्हणजे चौथी सून धनश्री शरद वाळंज यांना लग्नानंतरही पुढील शिक्षण घेण्यासाठी गणपतराव प्रोत्साहन देत आहेत.

मुकुंद वाळंज, ७०६६८४०८१७

शरद वाळंज, ७५०७८७८०५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com