Indrajeet Bhalerao: चांदण्यातली चंद्रभागा आणि चंद्रभागेतलं चांदणं- इंद्रजीत भालेराव

Chandrabhaga River: १० एप्रिल २०२५ रोजी पंढरपुरात मुक्काम होता. पोचायला उशीर झाल्यामुळे मंदिरात लवकर जाता आलं नाही. उद्या सकाळीही गडबड असणार होती. त्यामुळे उशिरा का होईना मंदिरात जाऊन येऊयात असं आम्ही ठरवलं.
Chandrabhaga River
Chandrabhaga RiverAgrowon
Published on
Updated on

Pandharpur Night Visit Story: १० एप्रिल २०२५ रोजी पंढरपुरात मुक्काम होता. पोचायला उशीर झाल्यामुळे मंदिरात लवकर जाता आलं नाही. उद्या सकाळीही गडबड असणार होती. त्यामुळे उशिरा का होईना मंदिरात जाऊन येऊयात असं आम्ही ठरवलं. संतोष, बबन आणि मी असे आम्ही तिघेजण मंदिराकडे गेलो. रात्रीचे दहा वाजलेले होते.

दर्शन अजून सुरू होतं. पण आम्ही मुखदर्शनच घेणार होतो. त्यामुळे चप्पल बाहेर ठेवून आम्ही आत आलो. निवांत मुखदर्शन घेतलं. रुक्मिणीचंही मुखदर्शनच घेतलं. शांत आणि निवांत चित्तानं मंदिराच्या मंडपात बसलो. गाभाऱ्यात बसून थोडे डोळे मिटले आणि मला कविता सुचली, जी मी परवा माझ्या पेजवर टाकलेली होती. 'विठूरखुमाई' नावाची ती कविता होती.

Chandrabhaga River
Indrajit Bhalerao : स्वाभिमान घडवाया बळ आम्हाला मिळो बळीला

मंदिरातून बाहेर पडलो आणि म्हटलं चला वाळवंटात जाऊन येऊ. तोपर्यंत साडेदहा वाजून गेलेले होते. मग आम्ही मंदिरातून वाळवंटाच्या रस्त्यानं निघालो. रस्त्यात दुतर्फा मिठाईची आणि वस्तूंची दुकानही अजून उघडीच होती. इथं देशपांडे मिठाईवाल्यांची तीन-चार दुकानं आहेत.

हे सगळे नाझऱ्याचे श्रीधर कवींचे वंशज आहेत, असं आम्हाला आम्ही नाझऱ्याला गेलो तेव्हा तिथल्या श्रीधर कवींच्या वंशज असलेल्या खुशालराव देशपांडे यांनी सांगितलेलं होतं. त्यापुढे गेल्यावर घाटावरचे होळकर आणि शिंदे या संस्थानिकांचे प्रचंड मोठे वाडे म्हणा, मठ म्हणा, मंदिरं म्हणा उभी होती. त्यावर चर्चा करत करत आम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात उतरलो.

Chandrabhaga River
Indrajit Bhalerao : भक्ती ही शेवटी विरोधीभक्तीच राहिली !

चैत्री वारी नुकतीच होऊन गेलेली होती. अजून गर्दी पूर्ण ओसरलेली नव्हती. वाळवंटात बरेच लोक निवांतपणे थंड हवा खात झोपलेले होते. बरेच लोक जागे असलेले झोपण्याच्या तयारीत होते. मी या रात्रीच्या चंद्रभागेचं दर्शन घेत होतो. छायाचित्र काढत होतो. आता पौर्णिमा जवळ आलेली असल्यामुळे चंद्रही पूर्ण तेजानं चमकत होता. त्यामुळे चांदण्यातली चंद्रभागा फारच सुंदर दिसत होती. चंद्रभागेतलं चांदणंही तसंच सुंदर दिसत होतं. दिवसभर उन्हानं लाही लाही झालेले जीव आता शांत थंड हवा खात पडलेले होते आमची ही अवस्था तशीच होती.

चंद्रभागेच्या अलीकडच्या थडीवर विठ्ठलाचं मंदिर, पलीकडच्या थडीवरचे नव्यानं बांधण्यात आलेले मठ. त्यावरचे चमचमते दिवे. या सगळ्यांचं चंद्रभागेच्या नदीत पडलेलं रात्रीचं प्रतिबिंब. काठाला बांधून ठेवलेल्या नावा. रात्रीच्या वेळीही चारा शोधत आलेली चंद्रभागेतली पाखरं. हे सगळंच कॅमेरॅनं नकळत टिपण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी जशी चंद्रभागा दिसली तशी छायाचित्रात पकडण्याचा प्रयत्न केला. अर्थातच ही सगळी छायाचित्रे मीच काढलेली आहेत.

इथल्या लोहदंड तीर्थाविषयी बहीण म्हणायची ते ऐकलेलं होतं,

शंकर सांगे ऋषीपाशी । सर्व तीर्थ मध्यान रात्री ।येती पुंडलिकापाशी । करिती अंघोळ वंदीती चरण ॥

या बहिणीने म्हटलेल्या ओवीनुसार आता इथं सर्व देवांची यायची वेळ झालेली आहे, त्यामुळे आपण निघालं पाहिजे. म्हणून आम्ही तिथून निघालो आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com