Shri Guru Paduka Darshan: हरिनामाच्या गजरात ‘श्री गुरु पादुका दर्शन’ सोहळ्याची भक्तिमय सांगता!

Mumbai Spiritual Event: मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या ‘श्रीगुरू पादुका दर्शन’ सोहळ्याने भक्तिरसात तल्लीन झालेल्या भक्तांसाठी अद्भुत आध्यात्मिक अनुभूती दिली. टाळ-मृदंगाच्या नादात हरिनामाचा गजर, अभंगवाणी, पखवाज वादन आणि वारकऱ्यांच्या भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
Guru Paduka Festival
Guru Paduka FestivalAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: टाळ-मृदंगाच्या साथीने केलेला संतांच्या नामाचा गजर, अखंड ऐकू येणारी भक्तिगीते आणि पादुका दर्शनाने समाधानी झालेले असंख्य चेहरे... अशा भक्तिमय वातावरणात संत आणि सद्‍गुरूंच्या पादुका दर्शन सोहळ्याच्या दैवी पर्वणीची रविवारी (ता. ९) सांगता झाली.

‘सद्‍गुरू वाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी...’ अशी भावना मनात बाळगलेल्या हजारो गुरुभक्तांना दोन दिवस संत व सद्‍गुरूंच्या पादुकांवर नतमस्तक होण्याचा योग आला. सोहळ्याला सर्व स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. भक्ती आणि शक्तीच्या एका अनोख्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यामुळे हजारो गुरुभक्तांनी भक्तीचा अनोखा महाकुंभ ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.

मुंबई : तेथें सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । दिंड्या पताका झळकती । जे गर्जति हरिनामें ।।... असा अनुपम सुखसोहळा मुंबईतील वरळीत गेले दोन दिवस बघायला मिळाला. निमित्त होते, संत आणि सद्‌गुरू पादुका दर्शन उत्सवाचे. त्यासाठी वेगवेगळ्या भागांतून वारकरी विद्यार्थी आले, पखवाजवादक आले, भजनी मंडळे आली, विणेकरी आले, गायनाचार्य आले, मृदंगाचार्य आले, पताकाधारी आले. तुळस डोक्यावर घेऊन महिला आल्या. भाविक आले. भक्तिरसात तल्लीन झाले. सुखाच्या अनुभूतीत न्हाले आणि परमेश्‍वराकडे मनीचे भाव मांडून प्रसन्न चित्ताने घरी परतले.

Guru Paduka Festival
Shri Guru Paduka Darshan: मुंबईत भक्तीचा महासागर! आजपासून श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाची सुरुवात

वरळीतील एनएससीआय डोममधील वातावरण शनिवारी (ता. ८) सकाळपासूनच भक्तिमय झाले होते. कारण ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवा’त राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून संत आणि सद्‌गुरूंच्या पादुका शुक्रवारी सायंकाळीच दाखल झाल्या होत्या. शनिवारी सकाळी सर्व पादुकांचा अभिषेक व महापूजा संबंधित संस्था व संस्थानांच्या विश्‍वस्तांनी केली.

यामध्ये संत ज्ञानेश्‍वर माउली (नेवासा), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव महाराज (घुमान), संत जनाबाई (गंगाखेड), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत सेना महाराज (पंढरपूर), संत सावता माळी महाराज (अरण), संत एकनाथ महाराज (पैठण), संत तुकाराम महाराज (भंडारा डोंगर), संत निळोबाराय (पिंपळनेर) यांच्यासह श्री महेश्‍वरनाथ बाबाजी, श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट), श्री साईबाबा (शिर्डी), श्री गजानन महाराज (शेगाव),

समर्थ रामदास स्वामी (सज्जनगड), टेंबे स्वामी महाराज (माणगाव), श्री गोंदवलेकर महाराज (गोंदवले), शंकर महाराज (धनकवडी, पुणे), गुळवणी महाराज (पुणे), गजानन महाराज (शिवपुरी) आणि श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे (कार्ला) या सद्‌गुरूंच्या पादुकांचा समावेश होता. अभिषेक व महापूजेनंतर त्या त्या संतांची आरती झाली. त्यानंतर आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी भाविकांना मार्गदर्शन केले.

Guru Paduka Festival
Shri Guru Paduka Darshan: भाविकांच्या गर्दीने फुलणार भक्तीचा महाकुंभ

‘अहंकारमुक्तीत सुखाची अनुभूती असते’ असा संदेश त्यांनी दिला. ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक तथा ‘एपी ग्लोबाले’चे अध्यक्ष अभिजित पवार यांनी श्री एम यांच्याशी संवाद साधला. मार्गदर्शन सत्रानंतर भाविकांसाठी पादुका दर्शन सुरू झाले. आळंदी येथील कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह वेगवेगळ्या भागातून आलेल्या भजनी मंडळांनी हरिनामाचा गजर केला. विद्यार्थ्यांचे सामूहिक पखवाज वादन झाले. त्यानंतर अखंड भक्तिगीते झाली, हरिपाठ झाला. भक्तिरसात तल्लीन होत भाविक दर्शनबारीतून येऊन पादुकांसमोर नतमस्तक होत होते. भक्तिसोहळा रविवारी रात्री नऊपर्यंत अखंडपणे सुरू होता.

हरिनामाचा अखंड गजर

वारकरी विद्यार्थी, भजनी मंडळे आणि भाविकांनी हरिनामाचा गजर केला. यामध्ये ‘जय जय रामकृष्णहरी’, ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’, ‘मुकुंद माधव हरी बोल’, ‘जय गजानन, श्री गजानन, जय जय जय बोलो जय गजानन’, ‘हरे राम राम राम, सीताराम राम राम राम’, ‘मोरया रे बाप्पा मोरया रे’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाच्या नामाचा छंद लागला मला’, ‘राधे राधे हो राधे राधे’, ‘ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया’, ‘निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम’, ‘गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला’, अशा नामस्मरण रचनांचा समावेश होता. भाविकही त्याचवेळी ठेका धरत भक्तिरसात तल्लीन झाले.

पखवाज वादनाची जुगलबंदी

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर परिसरांत पखवाज वादनाचे धडे देणाऱ्या विविध संस्थांच्या गुरूंसह विद्यार्थ्यांनी भक्ती-शक्ती व्यासपीठावर श्री पादुका दर्शन उत्सवात हजेरी लावली. यामध्ये दीक्षा भगत (रा. शिवकर, पनवेल), मैथिली पाटील (रा. वार्दोली, पनवेल), रिद्धी फडके (रा. पनवेल) या विद्यार्थिनींसह आठ वर्षीय ऋग्वेद पाटील (रा. नांदगाव, पनवेल) याचाही समावेश होता. त्यांनी पखवाजावर मारलेल्या थाफेमुळे ‘धा धा दिं ता तिट धा दीं ता तीटकतागदीग...’चा नाद झंकारत होता.

Guru Paduka Festival
Shri Paduka Darshan Sohala : अहंकारमुक्तीतूनच सुखाची अनुभूती!

अभंग आणि हरिपाठाचा गोडवा

‘इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘आरंभीव नैन अयोध्येचा राजा’, ‘विठुमाउली तू माउली जगाची’, ‘तूज मागतो मी आता’, अशा भक्तिरचना मध्यंतरीच्या काळात अखंडपणे सुरू होत्या. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. कोणी पाउली खेळत होते, तर कोणी फुगड्या खेळत होते. अनेकांनी जागेवरच ताल धरला होता. लहान मुलांचा उत्साहही मोठा होता.

आध्यात्मिक गुरू श्री एम यांनीही वारकरी विद्यार्थ्यांसमवेत पाउली खेळण्याचा आनंद लुटला. अभिनेत्री तथा गायिका केतकी माटेगावकर यांनी ‘बोलावा विठ्ठल... पहावा विठ्ठल...’ ही भक्तिरचना सादर केली. सायंकाळी आळंदी येथील कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या साधकांनी हरिपाठ सादर केला. बालकीर्तनकार उमेश महाराज सोळाके यांच्या रसाळ वाणीतून वेगवेगळ्या वारकरी चालींमुळे हरिपाठातील अभंगांचा गोडवा द्विगुणित झाला. संस्थेचे संस्थापक रवींद्र महाराज गाडेकर यांनी संचालन केले.

पादुकांना मान वस्त्र अर्पण

मुलुंड येथील सुप्रिया दिवेकर यांनी सर्व पादुकांना मान वस्त्र अर्पण केले. त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी श्री गुरू पादुका दर्शन सोहळ्याला हजेरी लावून मान वस्त्र अर्पण करण्याची परंपरा जपली. त्या कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर श्रीफळाऐवजी मानवस्त्र अर्पण करतात. या मानवस्त्राची शिलाई त्या स्वतः करतात.

भजनी मंडळे अन् मान्यवरांचा सन्मान

पादुका दर्शन उत्सवात रविवारी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. त्यांच्यासह विविध भजनी मंडळे, वारकरी यांचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या रायगड आणि ठाणे जिल्हा शाखांचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com