Author R. R. Borade: मराठवाड्याच्या शेतीमातीतील लेखक

Indian Authors : थोर लेखक रा. रं. बोराडे यांचे निधन झाले आणि वाङ्‍मयविश्‍वाच्या एक मोठ्या कालखंडाचा साक्षीदार निखळला. बोराडे सर म्हणजे मराठवाड्यातल्या शेतीमातीचा पहिला लेखक. त्यांच्या आधी मराठवाड्यातला शेतकरी फारसा साहित्यात आलेला नव्हता.
Author R. R. Borade
Author R. R. BoradeAgrowon
Published on
Updated on

इंद्रजित भालेराव

Marathi Literature and Rural Writing : बी. रघुनाथ यांच्या ‘जनता लिम्बेटाकळी’ सारख्या एखाददुसऱ्या कथेचा अपवाद वगळला तर मराठवाड्याची माती साहित्यासाठी कोरडीच राहिलेली होती. त्यामुळे रा. रं. बोराडे यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण त्यांच्या आधी इथला शेतीमातीतला माणूस कुणीही कथा कादंबरीत आणून उभा केलेला नव्हता. इकडच्या खेड्यापाड्यात खूप उशिरा शिक्षण गेलं. निजामी राजवटीमुळे अनेक वर्षे इथली खेडीपाडी आदिम जीवन जगत होती.

अशाच आदिम जीवन जगणाऱ्या एका खेड्यात बोराडे सरांचा जन्म झाला. लातूर जिल्ह्यातील काटगाव सारख्या एका छोट्या खेड्यात जन्मलेल्या या मुलाने सकाळच्या कथा स्पर्धेतून आपल्या लेखनाला शालेय जीवनापासूनच सुरुवात केली आणि त्यांचे लेखन बहरतच गेले. त्यांच्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात नोकरीच्या निमित्ताने ते योगायोगाने बी. रघुनाथ यांच्याच भूमीत राहायला आले.

परभणीच्या शिवाजी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले तेव्हा त्यांनी सकस कथा लेखनाला सुरुवात केली होती. त्यांची ‘पाचोळा’सारखी कादंबरीही त्यांनी इथेच लिहिली. मळणीसारख्या संग्रहातल्या अगदी सुरुवातीच्या त्यांच्या कथाही त्यांनी इथे राहूनच लिहिल्या. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात परभणीला फार मोठे स्थान आहे.

Author R. R. Borade
Writer Success Story : एका शेतकऱ्यामधला लेखक कसा घडतो?

साहित्यातून उभा केला शेतकरी

बोराडे सरांनी आपल्या कथा कादंबऱ्यांमधून मराठवाड्यातला शेतकरी उभा केला. इथल्या शेतकरी स्त्रियांच्या जीवनाचं सूक्ष्मदर्शन घडवलं. त्यांच्या कथांतून येणारी नात्यागोत्यांची चित्रणे मोठी प्रत्ययकारी होती. त्यामुळेच त्यांचा ‘नातीगोती’ हा संग्रह खूप गाजलेला होता. पाचोळासारख्या कादंबरीतून बदलत्या ग्रामीण जीवनाचं त्यांनी केलेलं चित्रण आता ऐतिहासिक स्वरूपाचं समजलं जातं.

पारंपरिक सरंजामी गावगाडा सुरुवातीला आपल्या लेखनातून उभा करणाऱ्या बोराडे सरांनी नंतरच्या आपल्या लेखनातून ग्रामीण जीवनात निर्माण झालेल्या नव्या प्रश्‍नालाही स्पर्श केलेला दिसतो. चारापाणीसारख्या छोट्याशा कादंबरीत त्यांनी दुष्काळात जनावरांच्या चाऱ्या पाण्याच्या निर्माण झालेल्या प्रश्‍नावरून शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे चित्रण पाहायला मिळते. शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाच्या प्रभाव या कादंबरीवर पडलेला आपणाला पाहायला मिळतो.

कथाकथनही गाजायचे

बोराडे सरांना लेखनात खुसखुशीतपणा होता. ग्रामीण जीवनातली दुःख जशी नेमकेपणाने त्यांनी चित्रित केली तशी ग्रामीण जीवनातला विनोदही त्यांनी आपल्या कथेतून मांडला. त्यामुळे त्यांचं कथाकथनही खूप रंगायचं. त्यांच्या कथाकथनाचे प्रयोग त्या काळात खूप गाजायचे. परभणीला झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा मी अकरावीच्या वर्गात होतो. पुढे बारावीच्या वर्गात असताना खेड्यापाड्यातल्या लेखकांसाठी त्यांनी घेतलेल्या ग्रामीण आत्मकथन कौशल्य विकास शिबिरात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. आयुष्यभर त्यांनी मायेचा ओलावा मला दिला.

Author R. R. Borade
Pratap Chiplunkar : शेतकऱ्यामधला लेखक अॅग्रोवननं कसा घडवला ?

त्यांच्या नोकरीच्या शेवटच्या दोन वर्षांच्या काळात सर परभणीला राहायला आले तेव्हा त्यांच्या सतत भेटीगाठी होऊ लागल्या. चर्चा होऊ लागल्या. त्यांची भूकंपावरची ‘इथे होता एक गाव’ ही कादंबरी त्यांनी इथेच लिहिली. वाचलेल्या नव्या पुस्तकांवर आम्ही चर्चा करत असू. असंच बोलता-बोलता त्यांच्या वाणवळा या निवडक कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रतिभास प्रकाशासाठी आम्ही मिळवली.

त्याला नरहर करूंकरांची फार सुंदर प्रस्तावना आहे. शिवाय सरांच्या स्त्रीविषयक निवडक कथांच्या संपादनाचीही कल्पना त्यातून पुढे आली आणि ‘बोरी बाभळी’ हा कथासंग्रह तारा भवाळकरांच्या दीर्घ प्रस्तावनेसह आम्ही प्रकाशितही केला. आमच्या परभणीच्या प्रतिभास प्रकाशनाची आणि त्यांची चांगलीच नाळ जुळली.

या गोष्टीचं मलाही खूप समाधान वाटलं. पुढे रमेश राऊत यांच्या साक्षात प्रकाशनाशी माझा संबंध आल्यावर मी एक प्रस्ताव राऊत यांच्या समोर ठेवला, की ‘समग्र रा. रं. बोराडे असा एक प्रकल्प घेऊन बोराडे सरांच्या समग्र कथांचं नव्याने सादरीकरण करायचं. पण अचानक रमेश राऊत यांचे निधन झाले आणि तो प्रकल्प राहून गेला. नाहीतर तसे झाले असते तर बोराडे सरांच्या कथा नव्या पिढीसमोरही राहिल्या असत्या.

आपल्या नोकरीच्या शेवटच्या काळात अपमानास्पद वागणुकीने सर व्यथित झालेले असतानाच अचानक महाराष्ट्र शासनाने त्यांची साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. मागचं सगळं विसरून सर जोमानं कामाला लागले. त्यांच्या रूपानं पहिल्यांदाच मराठवाड्याला साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद मिळालं होतं. त्यांच्या सर्व चाहत्यांना खूप आनंद झाला होता. अर्थात काही जणांची पोटेही दुखली. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद हे ललित लेखकासाठी नसतं, असा सल्लाही दिला गेला होता.

पण बोराडे सरांनी कोणाच्याही तोंडी न लागता काम करायला सुरुवात केली. वर्षभरात मंडळाला नीट शिस्त लावली. वर्षभरातच त्यांच्या चांगल्या कामाची फळं दिसायला सुरुवात झाली आणि नाक मुरडणाऱ्या पत्रकारांनी बोराडे सरांच्या गौरवाला सुरुवात केली. लक्ष्मण शास्त्री जोशी आणि य. दि. फडके याच्या कालखंडाची लोकांना आठवण येऊ लागली. धूळ खात पडलेले अनेक चांगले प्रकल्प मार्गी लागले.

नवलेखक अनुदान योजनेला झळाळी आली. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेचे स्वप्न सत्यात आले. पुस्तकांच्या निर्मितीचा दर्जा सुधारला. विक्री व्यवहाराला वळण लावल्यामुळे कधी नव्हे ते मंडळाच्या प्रकाशनाच्या आवृत्ती वर्षभरात संपून नव्या आवृत्ती निघू लागल्या. कुणी हात न लावणाऱ्या साहित्य संस्कृती मंडळाला बोराडे सरांनी गौरवास्पद स्थितीला आणून ठेवले.

मी सरांना भेटायला अधून मधून जातच होतो. मागच्या वर्षीही असाच आवर्जून त्यांना भेटायला गेलो होतो. वाचता, लिहिता येत नाही आता जगून काय करू? असं सर उदास होऊन म्हणत होते. खूप विषयांवर आम्ही चर्चा केली. सरांनी आत्मचरित्र लिहायला हवं होतं पण त्यांनी ते का लिहिलं नाही त्यावरही सर सविस्तर बोलले. मी ठरवलं होतं की एकदा निवांत वेळ काढून सरांकडं जायचं, त्यांना चालतं बोलतं करायचं. पण जाऊ जाऊ म्हणताना एक वर्ष निघून गेलं आणि आता तर सर्वच निघून गेले. सरांना विनम्र अभिवादन अन् भावपूर्ण श्रद्धांजली!

(लेखक कवी, साहित्यिक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com