Nagar News : खतासोबत कोणत्याही बाबीची लिंकिंग केली तर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला जात असला तरी खत कंपन्या अशा इशाऱ्याला अजिबात दाद देत नसल्याचे दिसत आहे. खरीप पिकाला गरज असलेल्या खतांची मागणी वाढताच खतासोबत कीटकनाशक व अन्य बाबींची सक्तीने लिंकिंग केली जात असल्याचे खुद्द निविष्ठा विकेत्यांचेच म्हणणे आहे.
प्रशासन, कृषी विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असून लेखी तक्रार करा असे सांगितले जात आहे. कृषी विभागाची भरारी पथके, महसूल विभागाचे अधिकारी गुप्त चौकशीतून लिंकिंगला आळा घालू शकत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होते. लिकिंगचा थेट आर्थिक भुर्दंड मात्र शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. पुरेसा पाऊस झालेल्या भागात खरिपात शेतकऱ्यांची पिकांना खते देण्याची लगबग सुरू आहे.
त्यामुळे खतासोबत कीटकनाशके व अन्य काही बाबीची सक्तीने लिंकिंग केली जाते. खतासोबत लिंकिंग केली जात असल्याच्या तक्रारी आहे. महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अजून एकही कारवाई झालेली नाही. लिंकिंग केली तर कठोर कारवाई करण्याचा प्रशासनाने इशारा दिला. मात्र या इशाऱ्याला काही कंपन्या आणि नगर जिल्ह्यातील मुख्य विक्रेते दाद देत नसल्याचे दिसते आहे.
काही किरकोळ विक्रेत्यांनी ‘अॅग्रोवन’कडे कैफियत मांडली. ‘प्रामुख्याने मागणी असलेल्या युरिया, संयुक्त खतासोबत कीटकनाशके व अन्य बाबी सक्तीने दिल्या जातात. मुळात ज्या भागात औषधाला मागणी नाही, त्या भागातील विक्रेत्याला दिलेली कीटकनाशके विक्रीअभावी शिल्लक राहतात. त्याचा खर्च नाइलाजाने अन्य विक्रीत काढावा लागतो. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागतो.
लिकिंगला विरोध करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना खताचा पुरवठाच केला जात नसल्याचेही सांगितले जात आहे. नगर जिल्ह्यात काही ठरावीक मुख्य विक्रेते लिकिंगबाबत अग्रेसर असल्याचे बोलले आहे. खतासोबतच्या कीटकनाशके व अन्य लिकिंगमुळे सध्या किरकोळ विक्रेते बेजार झाले असून ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सोसत असल्याचे सांगण्यात आले.
मुख्य आणि किरकोळ विक्रेत्यांत अंतर
खत, बियाणे, कीटकनाशकांचा एकोपा सातत्याने पाहायला मिळतो. मात्र खत लिंकिंगबाबत मुख्य विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांच्यात अंतर पडल्याचे पाहायला मिळत आहे. किरकोळ विक्रेत्यांचा ग्रामीण भागात थेट शेतकऱ्यांशी संपर्क असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक दराने खते विक्री करायची वेळ येऊ नये म्हणून किरकोळ विक्रेते लिंकिंगला विरोध करतात. मुख्य विक्रेते मात्र खत लिंकिंगबाबत खत कंपन्यांच्या भूमिकेशी अप्रत्यक्ष सहमत असल्याचे दिसते. लिकिंगला विरोध केला तर किरकोळ विक्रेत्याला मुख्य विक्रेते खताचा पुरवठा करण्याला टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.