Vasola Forest Story: वासोळ्याच्या जंगलातील राजाराणी

Life in the Mountains: शंकररावाच्या जोडीला द्रौपदाबाई डोंगरामध्ये कष्ट करू लागली. त्यांना जंगलात नारायण, नवनाथ अशी दोन मुले आणि तीन मुली झाल्या. जंगलात पुरेसे अन्न नव्हते. वासोळा गावात हे दूध विकून लिटरमागे त्यांना तीन रुपये मिळायचे. त्यातून ते पोट भरायचे.
Shankar and Dropadabai
Shankar and DropadabaiAgrowon
Published on
Updated on

Success Story: सह्याद्रीतील वाईच्या कुशीत कृष्णा नदी संथपणे वाहते. तिचे खोरे डोंगर आणि दाट वनराईने नटलेले. याच भागातील आकोशी ते वासोळा या गावांना जोडणाऱ्या पर्वतरांगेत कमळगडाचे जंगल पसरले आहे. वासोळ्याच्या दुर्गम माथ्यावरील या दाट जंगलात एक झोपडी दिसली. तेथे शंकर कचरे आणि त्यांची पत्नी द्रौपदाबाई हे कष्टाळू शेतकरी जोडपे मला भेटले. साधी काडीपेटी आणण्यासाठी त्यांना डोंगरात दोन तासाची चढउतार करावी लागते.

आजारी पडता दवाखाना थेट ३५ किलोमीटरवर आहे. शंकररावांचे आई-वडील म्हणजे विठोबा आणि बमाबाई. दोघेही भूमिहीन शेतकरी होते. विठोबा पोटासाठी जंगलातील जमीन कसायचे. जमीन मिळण्यासाठी विठोबाने आयुष्यभर ५२ अर्ज केले होते. शेवटी डोंगरात जागा मिळाली. विठोबाने त्यांच्या इतर भाऊबंदांनाही शेतीसाठी जागा मिळवून दिली. मात्र, सारे जण एकाच झोपडीत राहू लागले. पुढे विठोबाला याच जंगलात झालेला मुलगा म्हणजे शंकर.

Shankar and Dropadabai
Agrowon Newspaper Success Story: तयाचा वेलू गेला गगनावरी!

“हे जंगल, हा डोंगर हे माझे जग आणि हीच माझी शाळा. जनावरांसोबत मी आईबाबांच्या मागे जायचो. दिवस कधी उगवायचा-मावळायचा तेही समजत नसे. बापाने तीन लग्न केली होती. माझ्या पहिल्या आईचा एक मुलगा वैरणासाठी जंगलात गेला आणि याच डोंगरावरून घसरून वारला. माझ्या सख्खा आईला दोन मुले. त्यातील एक दुसरा भाऊ अर्धांगवायूने गेला. तिसऱ्या आईला तर मुलबाळच नव्हते.

या रानात माझा बाप विठोबा हा वाघासारखा जगला. त्याने १०० वर्षे शेती केली. तो धिप्पाड मावळ्यासारखा होता. त्यानेच समोरच्या डोंगरातील झोपडीत राहणाऱ्या द्रौपदा आखाडे या शेतकरी कन्येशी माझे लग्न लावून दिले. बाप ४० वर्षांपूर्वी तोही गेला. आता त्याचा वंश मी एकटा चालवतो आहे,” अशी थक्क करणारी कथा ६० वर्षांचे शंकरराव सांगतात.

२५ वर्षे केली हमाली

शंकररावाच्या जोडीला द्रौपदाबाई डोंगरामध्ये कष्ट करू लागली. त्यांना जंगलात नारायण, नवनाथ अशी दोन मुले आणि तीन मुली झाल्या. जंगलात पुरेसे अन्न नव्हते. पण, संसार वाढत होता. कधी कधी उपाशी राहावे लागे. नाचणी, वरई, भात अशी पिके घ्यायची. मात्र, पिकपाणी मोजके होत असे.

Shankar and Dropadabai
Success Story: शेतकरी कुटुंबातील तीन भावंडे बनली ‘ एमबीबीएस’

थोडी जनावरे होती. त्यांचे दूध स्वतः न पिता शंकरराव ते किटलीत भरायचे. घनदाट जंगलातून चालत जात भलामोठा डोंगर उतरत. वासोळा गावात हे दूध विकून लिटरमागे त्यांना तीन रुपये मिळायचे. त्यातून ते पोट भरायचे. पण, पुढे दूधही कमी झाले. मग पुढे शंकररावांनी जंगल सोडले. संसार चालविण्यासाठी पैशांच्या शोधात ते तडक मुंबईला गेले आणि हमाल बनले. शंकररावांनी २५ वर्षे हमाली केली.

मुलांना दहावी-बारावीपर्यंत शिकवले. बापासारखी दोघे मुले वासोळ्याच्या जंगलात राहणार नव्हतीच; त्यामुळे मुलेदेखील मुंबईत हमाल बनली. या भावांनी आपली बहीण वनिताला मात्र शिक्षणासाठी सोबत नेले. तिला आता पदवीधर केले आहे. शंकरराव आणि द्रौपदाबाईचा सारा परिवार आता त्यांना सोडून शहराकडे राहायला गेला आहे.

मुलाला मिळेना मुलगी

“शरीर थकल्याने मी मुंबई सोडली. पुन्हा या डोंगरात आलो. जगण्यासाठी पुन्हा शेती करतो आहे. हा डोंगर सोडणार नाही. खाली पठारी भागात झोपडं बांधायला किंवा शेतजमीन घ्यायला भरमसाट पैसा लागेल. तो कुठून आणायचा? त्यापेक्षा या डोंगरातल्या रानात याच झोपडीत कायमचा राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. मुलगा नारायण सुनेसह मुंबईला स्थायिक झाला आहे. दुसरा मुलगा नवनाथ लग्नाला आला.

मात्र डोंगरातल्या मुलाला कोणी मुलगी देईना. म्हणून त्याला आम्ही मुंबईला पाठवला आहे. पण मुलगी पाहायला गेल्यावर मुलीवाले म्हणतात की, मुलगा मुंबईत असला तरी तिथे त्याचे घर नाही. सबब मुलगी मिळणार नाही. त्यामुळे आता नवनाथसाठी डोंगरातलीच मुलगी शोधावी लागेल.” शंकरराव आपल्या संसाराचं दुःख शांतपणे कथन करीत होते. शंकररावांना मग मी सहज म्हणालो, “दादा, अहो... प्रगतीसाठी लोकं गाव-पाडा सोडतात.

शहरात जातात. तुम्ही मात्र, मुंबईला जाऊन परत उलटं या डोंगरात आलात.” त्यावर शंकरराव निर्धारपूर्वक म्हणाले, “मुंबईच्या हॉस्पिटलमधील दवा घेण्यापेक्षा या डोंगराची हवा खात, या झोपडीत आम्ही राजाराणीसारखं जगतो आहे. माझा बाप या डोंगरात १०० वर्षे जगला. आमचं बी काय बरंवाईट व्हायचं ते इथंच होईल..!”

(शंकर कचरे ७०८३६१४८५७)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com