Dairy Farming: अवशेषमुक्त दूध उत्पादनासाठी जागरूक व्हा

Residue Free Milk: पशू, मानवी आरोग्य आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शाश्‍वत पशुपालन आणि मानवी आरोग्याची गरज ओळखून सर्वांनी रसायन अवशेषमुक्त उत्पादनासाठी जागरूक होण्याची गरज आहे.
Dairy Farming
Dairy FarmingAgrowon
Published on
Updated on

Aware for Residue Free Milk Prodution: स्थळ : सेंटर फॉर एक्सलन्स, डेअरी, बारामती (जि. पुणे) येथील प्रयोगशाळेत पशुपालक, प्रक्रियादारांकडून तपासणीसाठी आलेल्या दूध, तुपाचे काही नमुने ...

तज्ज्ञांनी जेव्हा एफटीआयआर आणि एलसीएमएस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नमुने तपासले, तेव्हा यामध्ये अमाईड आणि वेगवेगळ्या रसायनांचे अंश दिसून आले. हे रासायनिक अंश दूध आणि दुग्धजन्य पदार्थात आढळणे म्हणजे थेट पशू आणि मानवी आरोग्यासाठी धोक्याचा संदेशच म्हणावा लागेल.

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सेंटर फॉर एक्सलन्स, डेअरीमध्ये अद्ययावत प्राणी पोषण, रोग निदान आणि विश्‍लेषणात्मक प्रयोगशाळा कार्यरत आहे. या ठिकाणी दूध, दुग्धजन्य पदार्थ, चारा, मुरघास, रक्त, मूत्र, शेण आणि औषधी नमुन्यांचे परीक्षण केले जाते. या ठिकाणी गेल्या पाच वर्षांत अकरा हजारांहून अधिक नमुन्यांची तपासणी एफटीआयआर आणि एलसीएमएस तंत्राने होत आहे.

या तपासणीतील निष्कर्षाबाबत संस्थेतील प्रकल्प प्रमुख डॉ. धनंजय भोईटे म्हणाले, की प्राणी पोषण प्रयोगशाळेमध्ये चाऱ्यातील क्रूड प्रोटीन, फॅट, तंतुमय घटक, राख आणि आर्द्रता यांचे प्रमाण सामान्य मर्यादेत आढळले. रोगनिदान प्रयोगशाळेमध्ये गर्भधारणा चाचणी, ब्रुसेलोसिस आणि प्रतिजैविक संवेदनशीलता चाचण्या होतात. यामध्ये जिवाणूंमध्ये प्रतिजैविक प्रतिकारक्षमता वाढताना दिसली. त्यामुळे दूध, मांसात प्रतिजैविक अवशेष राहण्याचा धोका वाढला आहे. पशुखाद्यात मेलॅमाईन, सायन्यूरिक आम्ल आणि अफ्लाटॉक्सिन दिसून आले. ही पशुवैद्यकीय क्षेत्रासाठी चिंतेची बाब आहे.

विश्‍लेषणात्मक प्रयोगशाळेत तपासणीसाठी आलेल्या काही धान्य, पशुखाद्य, चारा नमुन्यामध्ये मेलॅमाइन, सायन्यूरिक आम्ल आणि अफ्लाटॉक्सिन (B१, B२) आढळले. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या काही नमुन्यामध्ये तणनाशक अवशेष दिसून आले आहेत. दूषित चारा, पाण्यातून हे अवशेष जनावरांच्या आहारात गेल्याने दुधामध्ये हे अंश दिसतात. तुपाच्या काही नमुन्यामध्ये ऑक्सामाइडसारख्या घातक पदार्थांचे अंश सापडला आहे. उजनी धरणातील काही माशांच्या शरीरात पारा, शिसे हे जडधातू आढळले. हे सर्व मानवी आरोग्यासाठी धोकादायक पातळीवर आहे.

Dairy Farming
Dairy Farming Success Story: दुष्काळी पट्ट्यात तरुणाचा आदर्श दुग्ध व्यवसाय

तपासणीसाठी आलेल्या दूध, तुपामध्ये अमाइड आणि तणनाशकांचे अंश सापडण्याचे कारण म्हणजे चारा पिकात अनियंत्रित पद्धतीने होणारा रासायनिक घटकांचा वापर. मका पिकावरील कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकाचा अनियंत्रित वापर तसेच तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर वाढला आहे. मक्यामध्ये आलेले रसायनांचे हे अवशेष चाऱ्यातून गाईंच्या शरीरात जातात. पुढे त्याचे काही अंश दूध, तूप, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये दिसून येतात. हे घटक मानवाचे यकृत, मज्जासंस्था आणि अन्नपचनावर परिणाम करतात.

हा धोका लक्षात घेऊन चारा पिकांसाठी सेंद्रिय खते आणि फवारणीसाठी कीडनाशकांचे नियमन करणे गरजेचे आहे. दूषित पाण्यातून आलेले शिसे, पारा, आर्सेनिक हे जड धातू मानवी हाडे, यकृत आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतात. जनावरांच्या आजाराच्या उपचारात अनियंत्रित अँटिबायोटिक्स वापरमुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. हे प्राणीज घटक आहारात आल्याने मानवामध्येही कर्करोग, प्रजनन समस्या आणि किडनीते विकार बळावत आहेत.

प्रयोगशाळा प्रमुख विजय मुंडे म्हणाले, की दुग्धजन्य पदार्थांमध्ये सेंद्रिय क्लोरीनयुक्त संयुग आणि अँटिबायोटिक्स अवशेषांमुळे भारतातील दूध उत्पादने निर्यातीसाठी अपात्र ठरतात. दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या बरोबरीने चारा, पाणी आणि पशुखाद्याचे नियमित परीक्षण, सुरक्षित अन्न पुरवठा आणि आरोग्यदायी दुग्धोत्पादनासाठी सुनिश्‍चित करणे महत्त्वाचे आहे. युरोपीय महासंघाने अन्नसुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणासाठी लागू केलेले कठोर नियम आपणही पाळले पाहिजेत. देश, परदेशातील बाजारपेठ लक्षात घेता भारतातील अन्न आणि दुग्ध उत्पादने रसायन अवशेषमुक्त राहण्यासाठी कठोर अन्न तपासणी प्रणाली आवश्यकता आहे.

दूध संकलन केंद्रांमध्ये नियमित अवशेष तपासणी बंधनकारक होणे गरजेचे आहे. डेअरी उद्योगाने चारा, पशुखाद्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या नियमित तपासणीसाठी प्रयोगशाळा अद्ययावत कराव्यात. तसेच पशुपालकांमध्ये रसायन अवशेषांबाबत जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आरोग्य, अन्न सुरक्षा आणि निर्यात धोरण लक्षात घेता, पशुवैद्यकासोबतच, कृषी पदवीधर, कंपन्या, शेतकरी आणि शासन यांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे तरच या समस्येवर तोडगा निघू शकेल.

Dairy Farming
Dairy Farming : संघर्षातून विस्तारलेला दुग्धव्यवसाय

पशू औषधांचा योग्य वापर

शिरवळ (जि.सातारा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य आणि रोगपरिस्थितिविज्ञान शास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉ. राहुल कोल्हे म्हणाले, की अन्नसाखळीतील दूषित घटकांचे रासायनिक, जैविक आणि भौतिक असे वर्गीकरण होते. यामध्ये कीटकनाशके, जड धातू, पशुवैद्यकीय औषधांचे अवशेष, जिवाणूजन्य विषारी अवशेष, बुरशीजन्य मायकोटॉक्सिन्स इत्यादींचा समावेश आहे. जगभरातील संशोधनातून असे लक्षात आले, की कीटकनाशक, बुरशीनाशक, जड धातू (शिसे, पारा, कॅडमिअम, आर्सेनिक) संप्रेरक, पशुवैद्यकीय औषधे इत्यादीचे रासायनिक विषारी अवशेष पाणी, मृदा, पशुखाद्य आणि चाऱ्यामध्ये आढळतात.

तेच पुढे वनस्पतिजन्य खाद्य पदार्थ, प्राणिजन्य खाद्य पदार्थात दिसून येतात. मायकोटॉक्सिन्स हे बुरशींद्वारे तयार झालेले विष आहे. उदा. अफलाटॉक्सिन्स हे धान्य, पशुखाद्य दूषित करते. अनियंत्रित पद्धतीने पशू उपचारात वापरले जाणारे अँटिबायोटिक्स तसेच इतर औषधांचे अंश मांस, दूध आणि अंड्यांमध्येही दिसताहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध मानके निर्धारित आहेत. याची माहिती फूड सेफ्टी ॲण्ड सॅन्डर्डस रेग्यूलेशन्स २०११ आणि वेळोवेळी केलेल्या सुधारणा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणच्या संकेतस्थळावरून (https://www.fssai.gov.in/) दिली जाते. त्याचा अभ्यास महत्वाचा ठरणार आहे.

उपचार, खाद्य नियोजनात सतर्कता

कासदाह आजारावर उपचारासाठीही अँटिबायोटिक्सचा अयोग्य वेळी आणि अनियंत्रित मात्रांमध्ये वापर होतो. त्यामुळे दुधात त्याचे अंश दिसतात. अजुनही पशुपालक चारा, खाद्य साठवणुकीबाबत पुरेसे जागरूक नाहीत. चारा, मुरघासाची गुणवत्ता खालावल्याने मायकोटॉक्सिनचा दुधात प्रवेश होतो.

याचा थेट परिणाम जनावरांसह मानवी आरोग्यावर होतो. गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनासाठी सेंद्रिय पद्धतीने चारा उत्पादन, योग्य गुणवत्तेचे पशुखाद्य, जबाबदारीने प्रतिजैविकांचा वापर आणि निरोगी गाई, म्हशींचे संगोपन हेच पशुपालकांचे ध्येय असले पाहिजे, असा सल्ला पशुतज्ज्ञांनी दिला आहे.

पशुपालकांनो, स्वच्छ दूध उत्पादनावर द्या भर...

नियमित जंतनाशक, लसीकरण आणि स्वच्छता आवश्यक. अँटिबायोटिक्सवर अवलंबून राहण्याऐवजी किरकोळ संसर्गावरील उपचारासाठी आयुर्वेदिक किंवा प्रोबायोटिक आधारित पर्याय वापरावेत.

अँटिबायोटिक वापरल्यानंतर गाई, म्हशींचे दूध हे निर्देशित केलेल्या ठरावीक कालावधीसाठी आहारात वापरू नये किंवा डेअरीला देऊ नये.

बुरशीजन्य आजार नियंत्रणासाठी उच्च दर्जाचा मुरघास तयार करावा. कोरडा चारा योग्य पद्धतीने साठवावा. हानिकारक विषारी पदार्थ निष्प्रभ करण्यासाठी खाद्यात अफलाटॉक्सिन बाइंडर, प्रोबायोटिक्सचा वापर करावा.

चारा पोषणासाठी सेंद्रिय खतांचा व कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय कीडनाशकांचा वापर करावा. खाद्य, चाऱ्याची दूषित पदार्थ ओळखण्यासाठी नियमितपणे तपासणी करावी.

जनावरे, गोठ्याची स्वच्छता महत्त्वाची आहे. दूध काढणी यंत्र, साठवणुकीची भांडी स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवावीत. दूध काढण्यापूर्वी आणि नंतर कासेची योग्य स्वच्छता आणि टीट डीपिंगचा वापर करावा.

- डॉ. शांताराम गायकवाड, ९८८१६६८०९९, (महाव्यवस्थापक, गोविंद डेअरी, फलटण, जि. सातारा)

स्वच्छ, दर्जेदार दूध म्हणजे काय?

निरोगी कासेत तयार झालेले, स्वच्छ आणि निर्जंतुक पद्धतीने संकलित केलेले वासरहित दूध म्हणजे स्वच्छ दूध. याबाबत माहिती देताना पशुतज्ज्ञ डॉ. नितीन मार्कंडेय म्हणाले, की गुणवत्तापूर्ण आरोग्यदायी दूध हे प्रतिजैविके, असामान्य घटक आणि रसायन अवशेषरहित असलेच पाहिजे. प्रति मिलि दुधात समूहनिर्मिती म्हणजे संख्यात्मक वाढ करण्याची क्षमता असणाऱ्या सामान्य जिवाणूंची संख्या १५,००० पेक्षा कमी असावी. प्रति मिलि दुधात शरीर पेशी (सोमॅटिक सेल्स) संख्या एक लाखापेक्षा कमी असावी. स्वच्छतेमुळे दुधातून पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. त्याद्वारे तयार केलेले दुग्धजन्य पदार्थ अधिक काळ टिकतात.

-डॉ. धनंजय भोईटे, ९४२२५१८१६९

- डॉ. राहुल कोल्हे, ९८६०१९६२०१

- डॉ. नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१

(लेखक ॲग्रोवनचे मुख्य उपसंपादक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com