Digital Farming : ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मुळे कृषी क्षेत्रात घडेल क्रांती

IoT in Agriculture : वाढत्या जागतिक लोकसंख्येसाठी २०५० मध्ये आजच्या तुलनेत ७० टक्के अधिक अन्नधान्य उत्पादन घ्यावे लागणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने व्यक्त केला आहे.
IoT in Agriculture
IoT in AgricultureAgrowon
Published on
Updated on

डॉ. बापूसाहेब भाकरे, डॉ. विशाल गमे, डॉ. धीरज निकम

Agritech : वाढत्या जागतिक लोकसंख्येसाठी २०५० मध्ये आजच्या तुलनेत ७० टक्के अधिक अन्नधान्य उत्पादन घ्यावे लागणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने व्यक्त केला आहे. मात्र, सुपीक शेतजमिनीचे कमी होत चाललेले प्रमाण, सिंचनासाठी पाण्यासह अन्य नैसर्गिक संसाधने कमी होत आहेत. सध्या असलेल्या पिकांचे उत्पादन कमी होत आहे की स्थिर राहिल्याचे दिसते.

लोकसंख्या वाढत असताना शेतामध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळ कमी होत चालले आहेत. या सर्व आव्हानांचा सामना करत उत्पादकता वाढविण्याचे आव्हान कृषी क्षेत्रासमोर आहे. त्यावर मात करण्यासाठी विविध यंत्रे, साधने आणि सेन्सर एकमेकांशी इंटरनेटद्वारे जोडून त्याद्वारे प्रत्यक्ष वेळेमध्ये (रिअल टाइम) अचूक कामे करून घेता येऊ शकते. या तंत्रज्ञानाला ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) असे म्हणतात.

शेतीमध्ये विविध प्रकारचे सेन्सर्स व त्याचा वापर केलेली यंत्रे, साधने यांचा वापर केला जातो. त्यांची जोडणी इंटरनेटच्या साह्याने केली जाते. ही सर्व साधने प्रत्यक्ष वेळेमध्ये माहितीची देवाणघेवाण करू शकतात. त्यामुळेच त्यातून काटेकोर शेतीचे (Precision Farming) ध्येय साध्य होऊ शकते. या तंत्रज्ञानामध्ये वायफाय प्रणाली, संगणक प्रणाली आणि माहिती तंत्रज्ञान यांचा एकत्रित वापर केलेला असतो.

या तंत्रज्ञानाला स्वयंचलित यंत्राची जोड दिल्यास मानवरहित ऑटोमायझेशन शक्य होऊ शकते. म्हणजेच भविष्यातील उत्पादकता वाढीसाठी राबविल्या जाणाऱ्या संभाव्य ‘स्मार्ट’ शेतीमध्ये अचूक निर्णय घेणे, यांत्रिकीकरण (Atomization), अचूक जोडणी (Connectivity) आणि प्रत्यक्ष वेळेवरील निरीक्षणे (रिअल-टाइम मॉनिटरिंग) या बाबी शक्य होणार आहेत.

IoT in Agriculture
Indian Agriculture : शून्य मशागत : शाश्वत शेतीचा दीपस्तंभ

या तंत्रज्ञानामध्ये माहिती संकलित करण्यासाठी विविध संवेदकांचा (सेन्सर्स) प्रभावीपणे वापर केला जातो. उदा. हवेतील व जमिनीचे तापमान, आर्द्रता, मातीतील उपलब्ध अन्नद्रव्ये, जमिनीतील ओलावा, पिकाचे निरीक्षण इ.

त्यानंतर संकलित केलेल्या सर्व माहितीचे विश्लेषण केले जाते. त्याद्वारे योग्य ते निर्णय घेतले जातात. उदा. सिंचन, खते, कीड व रोग प्रतिबंधक यांचे योग्य प्रमाण ठरवले जाते.

ही माहिती शेतकऱ्याला त्याच्या स्मार्टफोन, संगणक किंवा टॅब्लेटवर उपलब्ध होते. म्हणजेच शेतामध्ये न जाताही शेतकऱ्याला शेतीतील सर्व माहिती उपलब्ध होते. त्यानुसार तो सिंचन, खते व अन्य निर्णय घेऊ शकतो. किंवा त्यासंबंधीच्या सूचना स्वयंचलित यंत्रणेला दिल्या जातात. त्या आपोआप सुरू होऊन आपली कामे करतात.

जमिनीची मोजणीसुद्धा याच प्रकारे केली जाते. शेतीसह विविध नकाशे तयार करण्यासाठी आयओटी आणि उपग्रहाच्या माध्यमातून अचूक नकाशे तयार केले जातात. विविध उपग्रहाद्वारे छायाचित्रे घेऊनही पिकाखालील क्षेत्राची माहिती घेतली जाते. त्यानुसार संभाव्य नियोजन केले जाते. त्याला लँड यूज प्लॅनिंग असे म्हणतात. त्याच प्रमाणे पीक व्यवस्थापनामध्ये पिकाची स्थिती व त्यावरील किडी-रोग याबाबत माहिती उपलब्ध केली जाते.

आयओटी द्वारे कृषी क्षेत्रात क्रांती कशी घडू शकते?

आजवर औद्योगिक क्षेत्रामध्ये ‘आयओटी’ तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. या तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रामध्ये वापर करण्यासंदर्भात शास्त्रज्ञ प्रयत्न करत असून, त्या संबंधी यंत्रणा व संगणकीय प्रणाली यांचा विकास यावर भर दिला जात आहे. त्यामुळे येत्या काही काळात पारंपरिक शेती पद्धतींमध्ये ‘स्मार्ट’ शेतीचे नवीन युग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातून आणखी एक कृषी क्रांती घडू शकते.

स्वयंचलित हरितगृह : संपूर्ण स्वयंचलित हरितगृहामध्ये सेन्सर्स आणि ॲक्च्युएटर महत्त्वपूर्ण आहेत. त्याद्वारे तापमान, आर्द्रता आणि प्रकाश यासारख्या महत्त्वपूर्ण पर्यावरणीय घटकांचे निरीक्षण आणि नियंत्रण केले जाते. हवामान नियंत्रित ठेऊन, आयओटी द्वारे पिकांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करता येईल. परिणामी पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ मिळू शकते.

अचूक निर्णयक्षमता : हवामान घटकांची माहिती, जमिनीतील आर्द्रता, पाण्याची पातळी आणि पिकांच्या आरोग्याची माहिती सेन्सर्सच्या मदतीने संकलन आणि विश्लेषण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील पीक नियोजनाबाबत निर्णय घेण्यास मदत होईल. वेळेवर सिंचन, अन्नद्रव्य, कीड-रोग यांचे व्यवस्थापन शक्य होईल.

ड्रोनचा वापर : ड्रोन तंत्रज्ञान हे कृषी क्षेत्रात परिवर्तनकारी ठरणार आहे. कमी उंचीवरून उडणारे ड्रोन आणि त्यावरील विविध सेन्सर किंवा हायपरस्पेक्टरल कॅमेरे यामुळे कृषी क्षेत्रातील क्रॉप मॅपिंग, माती विश्लेषण, सिंचन व्यवस्थापन, कीड नियंत्रण, फवारणी या बाबी शक्य होतील.

हवामानाचे निरीक्षण करणे : शेतामध्ये स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना केल्यास त्या आधारे तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि पावसाचा अचूक अंदाज याबाबतची माहिती उपलब्ध होते. तिचा उपयोग संभाव्य व्यवस्थापनासाठी करता येतो.

अचूक आणि काटेकोर शेती : मातीमधील सेन्सर्स, उपग्रह प्रतिमा आणि वेगवेगळ्या यंत्रणेद्वारे गोळा केलेली माहिती एकत्र करून निर्णयामध्ये अधिक अचूकता साधणे शक्य होईल. त्याचा फायदा अधिक उत्पादन घेण्यासाठी होऊ शकेल.

कीड व रोग नियंत्रण : ‘आयओटी’ द्वारे वेगवेगळी उपकरणे (उदा. सेन्सर्स आणि इमेज रेकग्निशन तंत्रज्ञान) वापरून अचूकपणे किडी व रोगांचा प्रादुर्भाव बाह्य स्वरूपामध्ये लक्षणे दिसण्याआधीच लक्षात येऊ शकतो. त्यामुळे पिकाचे नुकसान टाळता येते.

IoT in Agriculture
Indian Agriculture : शाश्‍वत शेतीच्या ‘पुजारी’

प्रक्षेत्र नियंत्रण : ‘आयओटी’ या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना प्रक्षेत्रावरील सर्व माहिती एका ठिकाणी एकत्रित करण्यास मदत होते. पीक उत्पादन, पशुधनाच्या नोंदींपासून ते प्रक्षेत्राच्या आर्थिक स्थितीपर्यंत सर्व माहितीचे संकलन एकाच ठिकाणी करणे शक्य आहे. त्यामुळे ही प्रणाली सध्याच्या पिकाच्या नियोजन आणि व्यवस्थापनासोबतच संभाव्य पीकपद्धतीचे नियोजन करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावू शकते.

पशुधन ट्रॅकिंग आणि जिओफेन्सिंग : ‘आयओटी’ द्वारे सक्षम ट्रॅकिंग या उपकरणांच्या मदतीने पाळीव जनावरांचे स्थान आणि त्यांचे वर्तन यांचे प्रत्यक्ष वेळेवर निरीक्षण करू शकता. ‘जिओफेन्सिंग’ द्वारे आभासी (व्हर्च्युअल) सीमा निश्चित करू शकतात. त्यामुळे चराऊ जनावरे नियुक्त क्षेत्राच्या पलीकडे जाऊ लागल्यास शेतकऱ्याला सूचना प्राप्त होते. त्यामुळे मोठमोठ्या कुरणांमध्ये चरणाऱ्या जनावरांचे व्यवस्थापन करता येते.

शेतीमध्ये ‘आयओटी’ चे फायदे

आयओटी द्वारे कृषी क्षेत्रातील कार्यक्षमतेत सुधारणा होऊन त्याचबरोबर संसाधनांचा अपव्यय कमी करण्यापासून ते अचूक शेती करून उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यास मदत होते. तसेच शाश्वत शेती (Sustainable Agriculture) बाबत विचार करताना वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य त्यासोबतच भविष्यातील पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता वर्तमान गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास शेतकऱ्यांना सक्षम करते.

कृषी क्षेत्रातील ‘आयओटी’चे मुख्य फायदे :

शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होईल.

शाश्वत शेतीसाठी काटेकोरपणे संसाधनांचा वापर शक्य.

निविष्ठांचा अपव्यय कमी करून खर्च कमी करणे शक्य.

स्वच्छ व पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीला साह्यभूत.

 स्वयंचलित प्रक्रियेद्वारे कार्यक्षमतेत वाढ.

कृषी क्षेत्रात ‘आयओटी’ चे सकारात्मक परिणाम

मातीची सद्यःपरिस्थिती, हवामानाची पुढील वाटचाल, पिकाचे आरोग्य याबाबत प्रत्यक्ष वेळेवर माहिती उपलब्ध होऊन निर्णय घेणे सोपे होणार आहे. निर्णय घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापरही करणे शक्यआहे.

प्रत्यक्ष वेळेवरील माहितीनुसार (रिअल-टाइम डेटा) कार्य करू शकणाऱ्या उपकरणे आणि यंत्रणांचा विकास झाल्यास वेगाने आणि वेळेवर कामे करणे शक्य होईल. उदा. सिंचनाच्या नियोजनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले फुले इरिगेशन शेड्यूलर इ.

पिकांचे सातत्यपूर्ण निरीक्षण व सर्वेक्षण शक्य होते. उदा. पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता किंवा कीड, रोगांच्या प्रादुर्भावाची प्राथमिक लक्षणेही तातडीने नोंदवली जाऊ शकतात. त्यामुळे पुढील उपाययोजना करणे शक्य होते.

पशुपालनामध्येही प्रत्यक्ष वेळेवर जनावरांच्या शरीराचे तापमान, हृदयाची गती व अन्य शारीरिक बाबींच्या नोंदी उपलब्ध होऊ शकतात. त्याची तुलना प्रमाणित मापदंडांशी केली जाऊन संभाव्य उपाययोजनाही सुचवल्या जातील. त्यामुळे जनावरांचे आरोग्य, वर्तन आणि पर्यावरणीय परिस्थिती यानुसार अचूक निरीक्षण आणि व्यवस्थापन शक्य होईल.

निविष्ठा आणि शेतीमालाच्या विक्री, वितरण आणि पुरवठा साखळीमधील माहितीचे संकलन आणि विश्लेषण करून संपूर्ण कृषी पुरवठा साखळीमध्ये पारदर्शकता निर्माण करणे शक्य आहे. त्यामुळे उत्पादक ते ग्राहक या दरम्यान मालाचे गुणवत्ता नियंत्रण, अन्न सुरक्षितता निश्चित करणे शक्य आहे.

डॉ. बापूसाहेब भाकरे, ७५८८००५८९०

(प्राचार्य, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दु. सि. पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com