Indian Agriculture : शून्य मशागत : शाश्वत शेतीचा दीपस्तंभ

Zero Tillage Agriculture Method : हवामान बदलास तोंड देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाने राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाची कमी खर्चाची शून्य मशागत पद्धत यशस्वी करून दाखवली आहे. आता कृषी विद्यापीठांकडून यावर संशोधन होऊन शिफारशी प्राप्त होतील, अशी आशा आहे.
Zero Tillage
Zero TillageAgrowon
Published on
Updated on

विजय कोळेकर

Zero Tillage Technique : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची २०१८ पासून राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील १६ जिल्ह्यातील हवामान संवेदनशील ५२२० गावांमध्ये अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.

बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि शेती किफायतशीर होण्यासाठी सहकार्य करण्याच्या प्रमुख उद्देशाने राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाने शेतीमध्ये अनेक प्रयोगशील उपक्रम राबवून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, कार्यक्षम वापर, मातीचे आरोग्यसंवर्धन, संरक्षित शेती, आणि किफायतशीर कृषी व्यवसाय उभारणीसाठी तांत्रिक तसेच आर्थिक साहाय्य केले आहे.

यामध्ये हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जगभर चर्चिल्या जात असलेल्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला भेडसावत असलेल्या जमिनीच्या आरोग्यावर विशेष काम करण्यात आले आहे. त्यासाठी अनेक प्रयोगांतून सिद्ध झालेले उपाय आणि काही नावीन्यपूर्ण प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात प्रकल्पाला यश आले आहे.

कृषी विभागाने एरव्ही अशक्य वाटत असलेली ‘शून्य मशागत शेती पद्धती’ प्रकल्पामार्फत राज्याच्या निम्म्या जिल्ह्यांत पोहोचवली असून कापूस उत्पादकांना कमी खर्चाचा आणि शाश्वत उत्पन्नाचा शून्य मशागतीचा मार्ग दाखविण्यात आला आहे. जगभरात विशेषतः दक्षिण अमेरिका, ब्राझील, अर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया , कझाकिस्तान आदी देशांत शून्य मशागत शेतीचे प्रमाण वाढत चालले आहे.

महाराष्ट्रात कोल्हापूरचे प्रताप चिपळूणकर हे कृषी पदवीधर शेतकरी मागील १५ हून अधिक वर्षे ‘विना नांगरणीची’ ऊसशेती करत आहेत तर रायगड जिल्ह्यातील कृषीरत्न कृषी पदवीधर शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी १२ वर्षांपूर्वी विना चिखलणी भात पिकासाठी ‘सगुणा राईस तंत्र’ म्हणजेच ‘एसआरटी’ तंत्र विकसित केले आहे.

प्रकल्पातील विशेषज्ञांनी या दोन्ही पद्धतींचा तसेच इतर देशातील मका व सोयाबीन पिकातील शून्य मशागत तंत्रांचा अभ्यास करून त्यातील तत्त्वे राज्यातील कापूस, मका, सोयाबीन आणि हरभरा पिकांसाठी लागू पडतात का, हे पडताळण्यासाठी अनुभवी विस्तार कार्यकर्ते आणि प्रयोगशील शेतकरी यांचे सहकार्याने सतत तीन वर्षे प्रयोग केले.

Zero Tillage
Zero Tillage Technique : शून्य मशागत तंत्राची उपयुक्तता

शेतकऱ्यांच्या सहभागातून मराठवाडा, विदर्भातील कृषी हवामानास योग्य असलेली शून्य मशागत पद्धती विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये (१) रुंद वरंब्यावर पिकांची लागवड करणे, (२) पिकांची टोकन पद्धतीने पेरणी करणे, (३) तणनाशकांच्या साहाय्याने किंवा ग्रासकटरच्या साहाय्याने तणांचा बंदोबस्त करून तणे जागेवरच कुजवणे आणि (४) पिकांची काढणी करताना जमिनीपासून काही अंतरावरून कापणी करून पिकांची मुळे जमिनीतच कुजवणे या प्रमुख चार तत्त्वांचा अवलंब करावा लागतो.

या तत्त्वांचा अवलंब करून कापूस, मका, सोयाबीन, हरभरा, तूर आणि बाजरी या पिकांसाठी लागू होणारी शून्य मशागत पद्धती प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून तयार करून त्याच्या प्रसारासाठी प्रकल्पाने शेकडो ठिकाणी प्रत्यक्ष शेतावर शेतीशाळा घेतल्या असून अशा ठिकाणी इतर भागातील शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे मोठ्या प्रमाणावर आयोजित केले.

आजमितीस मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासह १५ कापूस पिकविणाऱ्या जिल्ह्यांमधील सुमारे २०० गावांतील ३५०० हून अधिक कापूस उत्पादक शेतकरी मागील २-३ वर्षांपासून नांगरणी, कुळवणी, रोटा करणे किंवा कोळपणी, वखरणी अशी मशागतीची कोणतीही कामे न करता रुंद वरंब्यावर कापसाचे उत्तम पीक घेत आहेत.

आणि हे सर्वच शेतकरी कापसाच्या बियाण्याची टोकन मजुरांच्या साहाय्याने किंवा टोकन यंत्राच्या साहाय्याने करत असल्यामुळे कापसाच्या दोन ओळीतील आणि दोन रोपांतील अंतर योग्य राखता येणे शक्य झाले आहे.

परिणामी कापसाच्या झाडांची वाढ अधिक जोमाने होऊन उत्पादन वाढण्यास मदत होत आहे. पिकांची मुळे जमिनीतच ठेवणे गरजेचे असल्यामुळे हे शेतकरी कापसाच्या पऱ्हाट्या उपटून न काढता जमिनीपासून दोन तीन इंचावरून त्याची कापणी करून मुळासह उरलेला भाग बेडवरील जमिनीतच कुजवत आहेत.

Zero Tillage
Zero Tillage Technique : शून्य मशागत तंत्राने फळबाग यशस्वी केलेले शिक्षक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील टापरगावचे अतुल रावसाहेब मोहिते या युवा शेतकऱ्याने २०१९ मधील खरिपात बेड तयार करून कापूस लागवड केली असून आजपर्यंत ते बेड न मोडता त्यावर सलग १० पिके घेतली आहेत.

त्यांचे अनुभव लक्षात घेऊन त्याच जिल्ह्यातील जवळपास ४० गावांमधील शेतकऱ्यांनी ३२०० एकर क्षेत्रावर बेड तयार करून मागील २-३ वर्षांपासून कापूस, सोयाबीन, मका हरभरा पिकांची लागवड सुरू केली.

रुईखेड्याचे माजी उपसरपंच प्रभाकर सुसलादे १० एकर कापूस मशागतीशिवाय पिकवतात आणि एकरी सरासरी १२ क्विंटल उत्पादन घेतात. गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगाव येथील अमोल चव्हाण या युवा शेतकऱ्याने मशागतीशिवाय एकरी २२ क्विंटल कापूस उत्पादित केला आहे.

सिल्लोड तालुक्यातील बोधवडचे गणेश गव्हाणे आणि फुलंब्री तालुक्यातील भगवान बलांडे आणि भाऊसाहेब सोनवणे यांनी तर शून्य मशागतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार सुरू केला आहे. बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगावचे अरुण देशमुख यांनी मशागतीशिवाय उत्पादित केलेल्या सोयाबीनचे बियाणे घेण्यासाठी मध्य प्रदेशातील शेतकरी रांग लावत आहेत. तर बुलडाणा जिल्ह्यातील कोलवडच्या भगवान हरिभाऊ जाधवांना विनामशागत एकरी १३ क्विंटल सोयाबीनचा उतारा पाहून सुखद आश्चर्याचा धक्का बसला.

विशेष म्हणजे तणांचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली तणनाशके वापरण्यात हे शेतकरी तरबेज होत आहेत. त्यामुळे महिला भगिनींना निंदणी किंवा भांगलण करावी लागत नसल्याने त्यांचे मोठे काबाडकष्ट वाचले आहेत. शून्य मशागतीमुळे रासायनिक खतांच्या वापरत २५ टक्के बचत झाल्याचे आणि किडींचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २-३ फवारण्या कमी झाल्याचे हे शेतकरी सांगत आहेत.

या सर्व शेतकऱ्यांचे अनुभवातून त्यांना एकरी खर्चामध्ये सरासरी ८ ते १० हजाराची बचत झाल्याचे दिसून येत आहे. कापूस उत्पादकांचा एकरी खर्च जर ३० ते ४० टक्क्यांनी कमी होत असेल, शेतातून दरवर्षी वाहून जाणारी एकरी १२ ते १६ टन माती वाचत असेल आणि उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होत असेल तर शून्य मशागत शेतीपद्धतीकडे वळण्यात कोणताही धोका नसल्याचे शेतकऱ्यांचे मत बनत आहे.

हवामान बदलास तोंड देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाने राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाची कमी खर्चाची शून्य मशागत पद्धत यशस्वी करून दाखवली आहे.

आता कृषी विद्यापीठाकडून यावर संशोधन होऊन शिफारशी प्राप्त होतील, अशी आशा आहे. दरवर्षी राज्यातील १० टक्के शेतकऱ्यांनी जरी मशागतीचे जू मानेवरून उतरवले तरी पुढील १० वर्षांत महाराष्ट्र हा देशासाठी शाश्वत शेतीचा दीपस्तंभ ठरेल जेथे शेतकरी आनंदी राहतील.

(लेखक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे मृदा विज्ञान विशेषज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com