
Gokul Milk Kolhapur : महाराष्ट्रातील दराप्रमाणे दूध दर मिळाला नाही, तर सीमाभागातील गोकुळ संघाला दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संघाला दिला. याबाबत कर्नाटकातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ संघाला दराबाबत २८ फेब्रुवारीची डेडलाईन दिली आहे.
गळतगा येथील चिलिंग सेंटरवर बेळगाव परिसर व सीमाभागातील ३०० पेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्याठिकाणी गोकुळचे विस्तार पर्यवेक्षक निवृत्ती हंकारे, परशराम पारधी, यल्लाप्पा पाटील, शरद पवार आदींबरोबर शेतकऱ्यांची चर्चा केली. परंतु या चर्चेतून काही मार्ग निघाला नाही.
यावेळी चर्चेसाठी आलेल्या पर्यवेक्षकांना काहीवेळ चिलिंग सेंटरमध्ये दरवाजा बंद करून कोंडले. यावेळी संघाचे संचालक किंवा कार्यकारी संचालकांना कळवूनही ते न आल्याने शेतकरी संतप्त झाले होते. घोषणाबाजी करून त्यांनी निषेध केला. गोकुळचे अध्यक्ष व संचालकांसोबत फोनवर चर्चा घडवून आणली.
त्यात २८ तारखेपर्यंत मुदत घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दूध उत्पादकांनीही समजुतीची भूमिका घेऊन २८ पर्यंत वाट पाहू, त्यापूर्वी योग्य तोडगा निघाला नाही, तर गोकुळचा संपूर्ण दूध पुरवठा बंद केला जाईल, असा इशारा दिला. यावेळी ५० गावांतील ३०० पेक्षा जास्त दूध उत्पादक उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया वाढ, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केली होती. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत आंदोलनही केले होते.
अलीकडे गाय दूध संकलनाचे प्रमाण वाढले असतानाच त्या दूध खरेदी दरात मात्र प्रती लिटर दोन रुपये केल्याने उत्पादकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नव्या निर्णयानुसार, म्हशीच्या ५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या दुधास प्रतिलिटर एक रुपयाने वाढ केली आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर दीड रुपये वाढ केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.