Pre-Sowing Tillage: पेरणीपूर्व मशागतीचे महत्त्व...

Summer Tillage: जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म उपयोगी ठरतात. ते टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या पूर्वमशागतीस महत्त्व आहे. उन्हाळ्यात ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान सातत्याने पोचत असल्यामुळे जमिनीचे तापमान १५ सें.मी. खोलीपर्यंत वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील विविध बुरशा, सुप्तावस्थेत असलेल्या किडी व त्यांच्या कोषावस्था नष्ट होतात.
Agriculture Tillage
Agriculture TillageAgrowon
Published on
Updated on

संजय बडे

Farming Techniques: पिकांच्या लागवडीमध्ये माध्यम म्हणून जमीन अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही पिकाचे चांगले व शाश्‍वत उत्पादन मिळण्यासाठी जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म उपयोगी ठरतात. ते टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या पूर्वमशागतीस महत्त्व आहे. मातीच्या वरच्या थरांमध्ये वाढणाऱ्या उपयुक्त सूक्ष्मजीवांमुळे माती सजीव मानली जाते. हा मातीचा वरील भाग अत्यंत सुपीक असून, त्याची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी तिचे व्यवस्थापन अत्यंत दक्षतेने करणे गरजेचे आहे. जमिनीची मशागत करताना आपण प्रामुख्याने जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये आवश्यक बदल करत असतो.

मशागत तंत्रामुळे होणारे फायदे

जमीन ढिली आणि मोकळी करणे : मोकळ्या जमिनीमध्ये पावसाचे आणि ओलिताचे पाणी सहज मुरते.

जमिनीत हवा खेळती ठेवणे : मशागतीमुळे हवा खेळती राहिल्यामुळे वनस्पतीची मुळे आणि सूक्ष्मजीवांची चयापचय क्रिया योग्य रितीने होण्यास मदत होते. मातीमध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन जलद गतीने होण्यास मदत होते.

Agriculture Tillage
Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्र ठरतेय फायद्याचे!

जमिनीचे तापमान वाढविणे : जमिनीत हवा आणि पाणी यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. जमिनीचा जास्तीत जास्त भाग सूर्याच्या उन्हाखाली आणल्यामुळे तापमान वाढून जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या कार्यालाही वेग मिळतो. या प्रक्रिया जलद झाल्याने पिकाला फायदा मिळतो.

धसकटे काढणे : मशागतीमुळे पूर्वीच्या पिकाचे धसकटे काढली जाऊन नव्या पिकांच्या मुळांच्या वाढीला जागा उपलब्ध होते. जमीन पेरणी व पुढील सिंचनासाठी तयार करणे सोपे जाते.

तणांचे नियंत्रण करणे : पिकांपेक्षा वेगाने वाढून तणे पिकांशी अन्न, पाणी व अन्य घटकांसाठी स्पर्धा करतात. त्याचा विपरीत पिकाच्या उत्पादनावर पडतो. बहुवार्षिक तणांच्या गाठी व मुळ्या काढण्यासाठी तीन वर्षांतून एकदा खोलवर नांगरणी आणि वेचणीची शिफारस केली जाते.

कीटकांचा नाश करणे : किडींचे प्रादुर्भाव व समस्या जरी पिकावर दिसत असल्या तरी किडीच्या जीवनप्रक्रियेतील काही अवस्था मातीमध्ये पार पडत असतात. मशागतीदरम्यान जमिनीत लपलेले कीटक आणि त्याच्या कोषावस्था पृष्ठभागावर उघडे पडतात. त्या पक्षी वेचून खातात. त्याच प्रमाणे सूर्यप्रकाशात आल्यामुळे उष्णतेने मरतात.

Agriculture Tillage
Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्राने माती करूया समृद्ध

सेंद्रिय/भरखते जमिनीत मिसळणे : सेंद्रिय खते जमिनीवर पसरवल्यास त्यातील सेंद्रिय कर्बासह अन्नद्रव्यांचा ऱ्हास वेगाने होते. त्यामुळे अशी खत मशागतीनंतर मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळून थोड्या खोलीवर दिल्यास पिकांना अधिक फायदा होतो.

सुपीकता वाढविणे : सलग पिके घेत राहिल्यामुळे जमिनीच्या वरील थराची सुपीकता काही अंशी कमी झालेली असते. अशा वेळी मातीची उलथापालथ करणे गरजेचे असते. मात्र सुपीकता वाढीसाठी मशागत करत असताना ती वरच्या एक ते दीड फुटामध्ये करून घ्यावी. अतिखोल नांगरणीद्वारे उलथापालथ करणे टाळावे. कारण जमिनीत अतिखोल असलेला मातीचा थर कमी सुपीक असतो. नांगरल्यानंतर तो वर येऊन पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. अतिखोल नांगरणी ही तीन ते चार वर्षातून एकदाच करावी.

तवा फोडणे : साधारण नांगरणी खोलीच्या खाली क्षारयुक्त चिकट घट्ट थर जमतो, त्याला ‘तवा धरणे’ असे म्हणतात. तो तवा फोडण्यासाठी खास तयार केलेल्या अवजारांनी मशागत करणे नेहमीच उपयुक्त ठरते. तवा फोडला नाही, तर पिकांची मुळे त्या थरात शिरू शकणार नाहीत. जमिनीचा पाण्याचा निचरा व्यवस्थित होणार नाही.

उन्हाळ्यात जमीन नांगरून तापवणे फायद्याचे...

खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते, या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत जमिनीचे सौरीकरण (सॉल सोलरायझेशन) म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे एक ते दीड फूट खोल जमिन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान सातत्याने पोहोचत असल्यामुळे जमिनीचे तापमान १५ सें.मी. खोलीपर्यंत वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील विविध बुरशा, सुप्तावस्थेत असलेल्या किडी व त्यांच्या कोषावस्था नष्ट होतात.

सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते, तशीच ती जमिनीलासुद्धा असते. पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते. त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. पडणारा पाऊस कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो. त्याची ओल खोलपर्यंत जात नाही. नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते. त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो. जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.

- संजय बडे ७८८८२९७८५९

(कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com