Pune News : साखर निर्यातबंदीचा ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे भाव विक्रमी पातळीवर पोचले होते. जागतिक बाजारात मागणी असताना भारतातून निर्यात झाली असती तर ऊस उत्पादकांना ४ ते साडेचार हजार रुपये टनांपर्यंतही भाव मिळाला असता. पण सरकारने निर्यातबंदी करून आणि इथेनॉल निर्मितीवर बंधने घालून देशात साखरेचे आणि उसाचे भाव दबावातच ठेवले.
भारत जागतिक पातळीवर ब्राझीलनंतर दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश. पण भारताने साखर निर्यातबंदी केली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या भावात तेजी आली. जागतिक बाजारात साखरेचे दर नोव्हेंबरमध्ये १२ वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेले होते. लंडनच्या वायदेबाजारात दर ७७३ डॉलर प्रति टनापर्यंत पोचले होते. रुपयात याचा विचार केला तर ६४,२०० रुपये प्रति टन असा भाव होतो.
निर्यातीस परवानगी दिली असती तर कारखान्यांना उसाला टनाला ४००० पेक्षा अधिक दर देता आला असता. मात्र स्थानिक बाजारात दर नियंत्रणात राहावेत यासाठी निर्यातीवर बंधने घालण्यात आली. त्यामुळे स्थानिक बाजारात साखरेचे घाऊक दर ३८,००० रुपयांपेक्षा कमी राहीले. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा आपला भाव जवळपास निम्म्यावर होता. यामुळे साखरेचे आणि पर्यायाने उसाचे भाव वाढले नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा फायदा आपल्या ऊस उत्पादकांना झाला नाही.
सरकारने देशात साखरेचे भाव कमी राहावे यासाठी साखर निर्यातीवर बंदी घातलीच. शिवाय इथेनाॅल निर्मितीवरही बंधने आणली. यामुळे अनेक वर्षानंतर ऊस उत्पादकांना मिळालेल्या सुवर्णसंधीची माती झाली. याचा फायदा ब्राझील आणि थायलंडने घेतला. ब्राझीलने इथेनॉलचे उत्पादन कमी केले आणि साखरेचे विक्रमी उत्पादन केले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका
महाराष्ट्रात दुष्काळामुळे उसाचा यावर्षी उतारा कमी झाला. उसाला अधिक दर मिळाला असता तर शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई झाली असती. मात्र काहीही झाले तर ग्राहकांना स्वस्तात साखर मिळावी या उट्टाहासाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारने विचारच केला नाही, अशी टीका शेतकरी करत आहेत.
निर्यातबंदी कायम राहणार
देशातील साखर उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा जवळपास १० लाख टनांनी कमी राहून ३२१ लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. तर आतापर्यंत ३१६ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. उत्पादन घटल्याने सरकार साखर निर्यातबंदी उठवण्याच्या विचारात नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजेच यापुढच्या काळातही साखरेच्या भावावरील दबाव कायम राहणार आहे.
साखर निर्यात (लाख टनांत)
२०२२-२३ १११
२०२१-२२ ६२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.