Agriculture Industry : कृषी-आधारित उद्योगातून मिळेल समृद्धीची दिशा

Development of Agriculture Industry : कोणत्याही उद्योगाच्या वाढीसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी सरकारने उचलली पाहिजे. तसे झाल्यास बहुतांश सर्व ग्रामीण भागामध्ये कृषी आधारित लहान आणि मध्यम उद्योगांच्या विकासाला चालना मिळू शकते. अशा प्रकारच्या कृषी आधारित उद्योगातून सर्वांगीण प्रगतीला एक नेमकी दिशा मिळू शकते.
Agriculture Industry
Agriculture IndustryAgrowon

डॉ. योगेश खांड्रे

भारतामध्ये कृषी आणि औद्योगिक उपक्रम यांच्याकडे प्रवृत्ती आणि कार्याच्या दृष्टीने स्वतंत्र दोन क्षेत्रे म्हणून पाहिले जाते. मात्र कृषी आधारित उपक्रमाचा देशाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. कृषी क्षेत्रातील सुधारणा, त्याला पूरक कंपन्या याला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

त्यामुळे या क्षेत्रातील तांत्रिक सुधारणा, संशोधन आणि विकासाचा वेग वाढून कृषी क्षेत्राच्या निर्यात क्षमतेत वाढ होईल. या क्षेत्रातील संधी, अडथळे, विरोध अशा बाबींविषयी प्रत्यक्ष उद्योजकांकडूनच माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अनेक उद्योजकांची मुलाखती घेतल्या आहेत. त्याच्या अनुभवाचा लाभ अन्य नव-उद्योजकांना नक्कीच होऊ शकतो.

भारत हा कृषी प्रधान देश असून, ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. अशा स्थितीमध्ये भारतामध्ये कृषी आधारित व कृषी पूरक उद्योगांची ज्या प्रमाणात वाढ व्हायला हवी होती, तितकी झालेली दिसत नाही. खरेतर भारतासारख्या कृषी आधारित अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये कृषी-आधारित उद्योग देशाच्या आर्थिक वाढ आणि विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

आज एकूण लोकसंख्येमध्ये तरुणांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येकाच्या हाताला काम देण्याची क्षमता फक्त कृषी आधारित उद्योगामध्ये आहे. प्रामुख्याने शेती ही जरी अन्नधान्य, भाजीपाला आणि फळफळावळांच्या उत्पादनासाठी केली जाते.

हे खरे असले तरी पारंपरिकरीत्या आपण ऊस, कपाशी, नीळ, चहा अशी पिके ही पूर्वापार उद्योगाच्या मागणीनुसार घेत आलो आहोत. त्यामुळेच ही पिके नगदी म्हणून मानली जातात. अन्य पिकांतूनही वेगवेगळे कृषी उद्योग, पूरक उद्योग आणि सहायक कंपन्या यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी अलीकडे अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारांकडून राबविल्या जात आहेत.

Agriculture Industry
Agriculture Industry : अडसर दूर झाले तरच कृषी उद्योगांना गती

कृषी आणि कृषी आधारित उद्योग म्हणजे काय?

२०२३ च्या भारतीय सर्वेक्षणाच्या आधारावर शेती हे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे क्षेत्र आहे. कृषी उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ५० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीय पुरुष शेतीमध्ये कार्यरत असून, त्यांनी देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात १७ ते १८ टक्के योगदान दिले आहे. एकूण रोजगाराच्या ६० टक्के रोजगार हे या क्षेत्रातून येतात.

आशियायी राष्ट्राच्या आर्थिक विकासात कृषी प्रक्रियेसारखे उद्योग मोठी भूमिका बजावत आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये कृषी मालाच्या उत्पादनापासून, प्रतवारी, प्रक्रिया, साठवण अशा अनेक बाबींना स्पर्श केला जातो. म्हणजेच विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये एका कृषिमालापासून तीन ते पाच किंवा त्याहीपेक्षा अधिक प्रकारचे वेगवेगळे उद्योग उभे राहणे शक्य आहे.

हे सारे उद्योग ग्रामीण भागामध्ये उभे राहून ग्रामविकासाच्या प्रक्रियेला चालनाच मिळणार आहे. ग्रामीण भागातील गरिबीची समस्या दूर करतानाच सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांचा आर्थिक विकास साधणे शक्य होऊ शकते. परदेशाप्रमाणे शहरी आणि मोठ्या उद्योगावर आधारित कोणत्याही उद्योग प्रारूपाच्या तुलनेमध्ये ग्रामीण कृषी आधारित उद्योगामध्ये लोकांचे जीवन बदलण्याची मोठी क्षमता आहे. याचे आपल्या सर्वांना माहिती असलेले साधे उदाहरण म्हणजे एखाद्या भागामध्ये साखर कारखाना उभा राहिला की त्या भागामध्ये आर्थिक, सामाजिक बदलांची प्रक्रिया वेगाने झाल्याचे दिसते.

कृषी आधारित उद्योगांचे साधारणपणे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते.

संसाधनांवर आधारित.

मागणीवर आधारित.

कौशल्यावर आधारित.

सहायक युनिट्स.

कृषी-आधारित, वन-आधारित, पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालन-आधारित, खनिज-आधारित, समुद्री-आधारित आणि इतर संसाधन-आधारित उद्योग ही काही उदाहरणे आहेत. कृषी आधारित उद्योग हे बहुतांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी संबंधित आहेत. काही सरळ सरळ कृषी उत्पादनावर आधारित आहेत, तर काही उद्योग शेतीला मदत करतात.

कामांच्या पद्धतीनुसार वर्गीकरण

कृषी प्रक्रिया केंद्र ः शेतीमधून उत्पादित होणाऱ्या विविध उत्पादनांच्या प्राथमिक घटकांपासून खाद्य योग्य अंतिम उत्पादनापर्यंत स्वरूप बदलले जाते. या प्रक्रियांमुळे पदार्थांचे मूल्य वाढते, त्यांचा साठवण कालावधी वाढतो. उदा. भात गिरण्या, डाळ गिरण्या इ.

उत्पादन केंद्र : यामध्ये कृषी उत्पादनापासून वेगळीच नावीन्यपूर्ण पदार्थ किंवा वस्तू निर्माण केली जाते. तयार झालेले हे उत्पादन कच्च्या मालासारखे न दिसता पूर्णपणे वेगळे दिसते. उदा. साखर कारखाना, बेकरी उत्पादने, सॉल्व्हंट तयार करण्याचे कारखाने, कापड गिरण्या, इ.

कृषी निविष्ठा उत्पादन उद्योग ः यामध्ये प्रत्यक्ष शेती करण्यासाठी आवश्यक त्या निविष्ठांची निर्मिती केली जाते.

अ) हा सरळ शेतीशी संबंधित असू शकतो. उदा. बियाणे निर्मिती उद्योग.

ब) पूर्णपणे रासायनिक उत्पादन प्रक्रिया उद्योग असू शकते. उदा. कीडनाशके, खते निर्मिती उद्योग.

क) तो पूर्णपणे यांत्रिक व तंत्रज्ञानाशी संबंधित असू शकतो. उदा. पंपसेट निर्मिती, ट्रॅक्टर किंवा अवजारांनी निर्मिती इ.

विक्री आणि सेवा पुरवणारी केंद्रे : ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक त्या निविष्ठा, उपकरणे यांची विक्री करणारी केंद्रे उपयोगी ठरतात. उदा. सध्याचे कृषी सेवा केंद्र.

शेतकऱ्यांच्या विविध यंत्रे, अवजारांची देखभाल दुरुस्ती केंद्रे महत्त्वाची ठरतात. उदा. पंपसेट, डिझेल इंजिन, ट्रॅक्टर आणि इतर कृषी उपकरणांची दुरुस्ती करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था.

कृषी उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्था

कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध मंत्रालये, महामंडळे आणि सरकारी संस्था कार्यरत आहेत. ते कृषी आधारित उद्योगांच्या विकासावर लक्ष ठेवतात, त्यांना अनुदानपर योजना राबवतात.

कृषी मंत्रालय : कृषी उत्पादनासोबतच प्राथमिक प्रक्रिया, द्वितीय प्रक्रिया आणि ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक त्या वितरण व शीतसाखळी या संबंधित उद्योगांना चालना देण्याचे काम करते.

खादी आणि ग्रामोद्योग मंडळ : या पारंपारिक कृषी आणि ग्रामीण कला कौशल्ये आधारित उद्योगांना चालना दिली जाते. पारंपरिक हातमाग, रेशीम उद्योग, बांबू व अन्य घटकांच्या हस्तकला यांचा समावेश आहे.

व्यापार आणि विकास महासंचालक : ट्रॅक्टर, पॉवर टिलर, डिझेल इंजिन, पंप संच आणि इतर कृषी यंत्रे बनवणाऱ्या उद्योगांची देखरेख करतात.

डिझेल इंजिन, पंप संच आणि इतर कृषी यंत्रे बनवणाऱ्या उद्योगांची देखरेख करतात.

ॲग्रो-इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन : प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांना प्रामुख्याने कृषी यंत्रसामग्री, पुरवठा आणि कृषी सल्लागार सेवा पुरविल्या जातात. कृषी-उद्योग क्षेत्रातील काही उत्पादन उपक्रमही अनेक महामंडळांनी हाती घेतले आहेत.

लघू उद्योग विकास संस्था : लहान कृषी-उद्योगामध्ये होजियरी, अन्न प्रक्रिया, पेये, कृषी उपकरणे, वनस्पतिजन्य कीटकनाशकांची निर्मिती इ. उद्योगांचा समावेश होतो.

Agriculture Industry
Agriculture Industry : उच्चशिक्षित युवकाने मानले शेतीलाच उद्योग

समस्यांची सोडवणूक आणि संधीमध्ये वाढ

कृषी-आधारित उद्योगांची वाढ आणि विस्तारामध्ये अंतर्गत आणि बाह्य पर्यावरणीय घटक महत्त्वाची भूमिका निभावतात. स्थानिक पातळीवर कच्च्या मालाची उपलब्धता, उत्पादित मालाचा दर्जा, पॅकिंग, वाहतूक आणि वितरणाची योग्य सुविधा अशा अनेक घटकांच्या योग्य समन्वयातून उद्योगाची उभारणी, वाढ आणि विकासाची प्रक्रिया पार पडते.

उद्योगातून निर्माण होणाऱ्या मालाला नियमित आणि सातत्यपूर्ण मागणीची जोड अत्यावश्यक असते. मात्र भारतासारख्या लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर पोचलेल्या देशामध्ये देशांतर्गत मागणीच इतकी मोठी आहे की त्याची पूर्तता करण्यातच बहुतांश उद्योग पुरे ठरत नाहीत.

कोणत्याही उद्योगाच्या वाढीसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी सरकारने उचलल्यास बहुतांश कृषी आधारित लहान आणि मध्यम उद्योगांच्या विकासाला चालना मिळू शकते. या उत्पादनांची पॅकिंग, साठवण आणि शिपिंग या माध्यमातून निर्यातीच्या संधीही खुल्या होऊ शकतात. अशा प्रकारच्या कृषी आधारित उद्योगातून सर्वांगीण प्रगतीला एक नेमकी दिशा मिळू शकते.

कच्च्या मालाच्या स्वरूपानुसार उद्योगाचे समूहीकरण

अ.क्र. उद्योगाचे समूहीकरण (कच्च्या मालावर आधारित) अंतिम उत्पादने

१ तृणधान्यांवर आधारित उद्योग गव्हाचे पीठ, बिस्कीट उत्पादन, मिठाई, बेकरी उत्पादने, तांदूळ कोंडा आणि राइस ब्रॅन ऑइल, कॉर्न फ्लेक्स, कॅन केलेला बेबी कॉर्न, स्टार्च साहित्य इ.

२ डाळींवर आधारित उद्योग बेसन (बेसन), स्नॅक्स खाण्यासाठी तयार, पापड, संपूर्ण डाळ

३ तेलबियांवर आधारित उद्योग खाद्यतेल, पशुखाद्य, प्रक्रिया केलेले बियाणे (तीळ)

४ फळे, भाज्यांवर आधारित उद्योग गोठलेली फळे आणि भाज्या, चिप्स आणि वेफर्स, फ्रेंच फ्राईज, निर्जलित भाज्या, केचअप, प्युरी आणि तीव्र द्रावणे, रस, लोणचे

५. मसाल्यांवर आधारित उद्योग पेस्ट आणि पावडर, ओलिओरेसिन, सुगंधी अर्क इ.

६. दुग्ध व्यवसायावर आधारित उद्योग स्किम्ड मिल्क पावडर, तूप, दही इ.

७. फुलशेतीवर आधारित उद्योग ताजी, वाळलेली फुले, गुलकंद, अत्तर व सुगंधी द्रव्यांची निर्मिती.इ.

८. मत्स्य आधारित उद्योग मासे प्रक्रिया, मासे जेवण, मासे / कोळंबीचे लोणचे

९. पशुधन आणि कुक्कुटपालन उद्योग प्रक्रिया केलेले पोल्ट्री उत्पादने, मांस रस्सा (ग्रेव्ही) घट्ट करण्यासाठी पदार्थ, मटण आणि कोकरू, प्रक्रिया

१०. औषधी वनस्पती आधारित उद्योग औषधी उत्पादने

११. कापूस, ताग आधारित उद्योग तंतू प्रक्रिया, धागे निर्मिती, हातमाग, यांत्रिक माग ते कापड उद्योग.

१२. उसावर आधारित उद्योग गूळ, साखर निर्मिती, मिठाई आणि बेकरी उत्पादने

१३. लागवड पिकांवर आधारित उद्योग चहा पावडर, कॉफी पावडर

१४. इतर उद्योग मध, मशरूम,

(स्रोत : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, MoFPI)

- डॉ. योगेश खांड्रे, ८१४९४६३७७७, (सहयोगी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च, एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com