Agriculture Industry : उच्चशिक्षित युवकाने मानले शेतीलाच उद्योग

Success Story of Farmer : मालखेड रेल्वे (जि. अमरावती) येथील तुषार माकोडे या ‘बीटेक’, ‘एबीएम’ उच्चशिक्षित युवकाने नोकरीपेक्षा शेतीलाच पसंती दिली. अभ्यासपूर्ण व व्यावसायिक शेतीचा आदर्श तयार करीत त्यात यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.
Tushar Mokode
Tushar MokodeAgrowon

Development of Agriculture and Cropping System : मालखेड रेल्वे (जि. अमरावती) येथील तुषार माकोडे या ‘बीटेक’, ‘एबीएम’ उच्चशिक्षित युवकाने नोकरीपेक्षा शेतीलाच पसंती दिली. शेवग्याच्य शेंगा व बियाण्यांचे उत्पादन, जोडीला शेडनेटमधील काकडी व सोयाबीन कुटारापासून इंधन पॅलेट निर्मिती करून शेतीलाच उद्योग बनविले. अभ्यासपूर्ण व व्यावसायिक शेतीचा आदर्श तयार करीत त्यात यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.

मालखेड (ता. चांदूररेल्वे, जि. अमरावती) येथील तुषार माकोडे या ३४ वर्षे वयाच्या युवकाने ‘बीटेक’(फूड सायन्स) व ॲग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट या पदव्या घेतल्या. वडील वासुदेवराव महावितरण कंपनीतून २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाले. नोकरीसोबतच त्यांनी

शेतीचीही आवड जपली. त्यामुळे तुषार यांच्यावरही लहानपणीच शेतीचे संस्कार झाले. त्यातूनच शेतीशी संबंधित पदव्या घेण्यावरच त्यांनी भर दिला. शिक्षण पूर्ण झाल्यावर व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीतील नव्या संकल्पनेवर काम सुरू केले.

दरम्यान, कुटुंबाने २०१५ मध्ये चार एकर पडीक शेती खरेदी केली. ती उपजाऊ करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. गावतलावातील गाळ आणून तो पसरविला. गावरान खत वापरले. सुमारे ५८ फूट विहीर खोदली. कुंपण केले.

Tushar Mokode
Agriculture Industry : शेतीपूरक, प्रक्रिया उद्योगाच्या योजना शेतकऱ्यांना फायदेशीर

अमिनो ॲसिड निर्मितीचा प्रयत्न

नवनिर्मितीची आस असलेल्या तुषार यांनी मानवी केसांपासून अमिनो ॲसिडची निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू केला. कोणत्याही कामाची लाज बाळगू नये असे धडे आईवडिलांकडून आधीच मिळाले होते. त्यामुळे मानवी केस संकलित करण्याचे कामही केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कंपनीला ॲमिनो ॲसिडचा सुमारे १२०० लिटरचा पुरवठा केला. मात्र काही तांत्रिक कारणे व शेतीच्या विकासाकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता हा व्यवसाय थांबविला.

शेतीचा विकास व पीकपद्धती

सध्या तुषार यांनी हंगामी पिकांवर भर न देता वेगळ्या व्यावसायिक पिकांची निवड केली. एक एकर शेवगा, अर्ध्या एकरात शेडनेट, त्यात काकडी आहे. पोकरा प्रकल्पातून शेडनेटसाठी नऊ लाख ७६ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. शेवगा पिकात चार वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. ओडीसी जातीचे वाण आहे. शेंगा आणि बियाणे अशी दुहेरी पद्धतीने विक्री केली जाते.

शेंगांची विक्री पाच किलो बंडलच्या पॅकिंगमधून होते. तुषार सांगतात, की नोव्हेंबर ते मे असा शेंगा विक्रीचा हंगाम असतो. या कालावधीत अडीच ते तीन टन एकरी उत्पादन मिळते. बियाणे विक्री करायची तर मार्चपर्यंतच शेंगांसाठी प्लॉट सुरू ठेवावा लागतो. हंगामाच्या सुरुवातीस किलोला ८० ते ९० रुपये दर मिळण्याची संधी असते. पुढे उन्हाळ्यानंतर किलोला ६०, ५० ते २५ रुपये असे दर घसरतात. अमरावती मार्केटला विक्री होते.

बियाणे विक्री

कोरोना येण्यापूर्वी तमिळनाडू येथील निर्यातदार कंपनीच्या साह्याने कॅनडा येथे ३५० ते ४०० किलो शेवगा बियाणे पाठविले. आताही महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा आदी ठिकाणी बियाणे पुरवठा होतो. दोन हजार रुपये प्रति किलो दर असून, आजपर्यंत ९०० किलो ते एक टन बियाण्यांची विक्री झाली आहे.

Tushar Mokode
Agriculture Industry : शेतीस उद्योगाचा दर्जा देण्यास शासन प्रयत्नशील

शेडनेटमध्ये काकडी

काकडीचा सुमारे एक वर्षाचा अनुभव तयार झाला आहे. यंदाच्या एप्रिल-मेमध्ये घेतलेल्या काकडीचे आठ टन, तर त्यानंतर सप्टेंबर- ऑक्टोबरमधील काकडीचे आतापर्यंत १२ टन उत्पादन मिळाले आहे. अजून उत्पादन सुरू आहे. अमरावती हीच बाजारपेठ असून, किलोला २२ रुपयांपासून २६ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. पुढील काळात पुणे, मुंबई बाजारपेठेत विक्रीचा प्रस्ताव आहे.

शेतीत सकारात्मता बाळगणे, नवे प्रयोग करणे, त्यासाठी जोखीम घेणे यासाठी सदैव तयार असलेल्या तुषार यांचा पुढील काळात केसरची लागवड करण्याचा मानस आहे. मात्र सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केसरला बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न आहे. आई लतिका, वडील वासुदेवराव, पत्नी आश्‍विनी आणि छोटा भार्गव असे तुषार यांचे हसतेखेळते कुटुंब आहे. या सर्वांचे बळ, मार्गदर्शन व भक्कम साथ असल्यानेच वाटचाल सुकर होत असल्याचे तुषार सांगतात.

शेतीची वैशिष्ट्ये

व्यावसायिक पिकांचा अंगीकार

कुटुंबाची साथ

पॅलेट्‍स निर्मितीतून उद्योगाची जोड

प्रक्रिया तंत्रज्ञान व व्यवस्थापन विषयातील शिक्षण असल्याने शेतीत सुकर नियोजन

बायोमास पॅलेट उत्पादन

तुषार यांनी फलोत्पादनाची कास करण्याबरोबर बायोमास पॅलेट्‍सच्या उत्पादनांना सन २०१६ मध्ये सुरुवात केली. यात शेतकरी व व्यापारी यांच्याकडून सोयाबीनचे कुटार घेण्यात येते. त्यावर प्रक्रिया करून त्यापासून पॅलेट तयार केले जातात. या उद्योगासाठी २० लाख रुपयांची यंत्रसामग्री लागते.

शेड व खेळते भांडवल अपेक्षित धरून सुमारे ७० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. विविध रासायनिक, पेंट, अन्नप्रक्रिया आदी औद्योगिक कारखान्यांना बॉयलरसाठी किंवा ‘स्टीम जनरेशन’साठी या जैविक पॅलेट्‍सचा इंधन म्हणून वापर होतो. प्रदूषणमुक्त असल्याने त्यांचा वापर वाढता असल्याचे तुषार सांगतो. दहा तासांची ‘शिफ्ट’ अपेक्षित धरता अडीच ते तीन टन, तर ताशी २५० ते ३०० किलो असे पॅलेटचे उत्पादन मिळते.

मुख्य नागपूर तसेच छत्रपती संभाजीनगर, पुणे आदी ठिकाणच्या कारखान्यांना पॅलेट्‍स पुरवल्या जात आहेत. महिन्याला ३५ ते ४० टन विक्री केली जाते. मागणीनुसार उत्पादन करण्यावर भर दिला आहे. साडेसात ते आठ हजार रुपये प्रति टन दर सध्या मिळत आहे.

तुषार माकोडे ७२७६३५८८१९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com