
Future of Animal Farming: शेतकऱ्यांकडे असलेले पशुधन भविष्यात कमी कमी होत जाणार आहे. एकूणच, प्राणीपालन अधिक तंत्रज्ञान संचालित, शाश्वत आणि ग्राहककेंद्रित होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी संधी आणि आव्हाने दोन्ही निर्माण होतील.
भविष्यातील शेतीचा विकास शेतकऱ्यांच्या दररोजच्या जगण्यामध्ये बदल होणारी एक महत्त्वाची बाब आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या पशुधनाची संख्या आता कमी होत जाणार आहे. १९५६ मध्ये केलेल्या पशुधनाच्या गणनेमध्ये भारतात एकूण १५८ दशलक्ष गायी-म्हशींची असलेली संख्या सतत वाढत जाऊन १९९२ मध्ये २०४ दशलक्षपर्यंत पोहोचली. त्यानंतर मात्र ही संख्या कमी होत असून २०१९ च्या गणनेमध्ये १९२ दशलक्षपर्यंत खाली आली आहे.
भारताच्या क्षेत्रफळाच्या सर्वसाधारणपणे १० टक्के क्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात २०१९ मध्ये ७.२२ टक्के म्हणजे १३.० दशलक्ष गायी होत्या, तर ५.१० टक्के म्हणजे ५.६ दशलक्ष म्हशी होत्या. गायी आणि म्हशींवर चाऱ्यासाठी होणारा खर्च शेतकऱ्यांना आता परवडत नाही. घरचे दूध पाहिजे म्हणून प्रत्येक जनावरामागे ३०० ते ५०० रुपये खर्च व गडी सांभाळण्याचा ५०० रुपये खर्च परवडत नसल्यामुळे दूध बाजारातून विकत आणण्याकडे शेतकऱ्यांचा सुद्धा कल वाढत आहे. दर दोन-तीन वर्षांनी पडणाऱ्या दुष्काळामुळे यामध्ये अधिकच भर पडली आहे.
तंत्रज्ञानामध्ये बदल
सर्व जमिनी लागवडीखाली येत असल्यामुळे जनावरांना चारण्यासाठी मोकळे क्षेत्र मिळणे आता दुरापास्त झाले आहे. अद्ययावत गोठे बांधून चारा टाकण्यासाठी, गोठा स्वच्छ करण्यासाठी, दूध काढण्यासाठी ऑटोमॅटिक व्यवस्था केली जात आहे. जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अद्ययावत आरोग्य तंत्रज्ञान, कृत्रिम रेतन, तपासणी व उपचार या सर्वांमध्ये अधिक अचूकता येईल. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होईल.
हवामान बदलानुसार नियोजन
आपापल्या भागामध्ये हवामानातील बदल विचारात घेऊन कोणत्या जातीची जनावरे सांभाळली पाहिजेत, कोणत्या प्रजाती जास्त उत्पादन देतील, कोणत्या प्रजातींना रोगांची बाधा कमी होईल या सर्वांचा विचार करून जास्तीत जास्त माहिती घेऊन पशुधन सांभाळणारी शेतकऱ्यांची नवी पिढी निर्माण होईल. शेतकरी ग्रीनहाउस वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि टिकाऊ शेतीसाठी हवामान-समंजस प्राणीपालन तंत्रज्ञान स्वीकारतील. पर्यायी पशुखाद्य आणि शाश्वत चारण तंत्र वाढीस लागेल.
ग्राहक मागणीतील बदल
सेंद्रिय, अँटिबायोटिक-मुक्त आणि नैतिक दृष्टिकोनातून पाळलेल्या प्राण्यांच्या उत्पादनांची मागणी वाढेल. त्यामुळे पारंपरिक प्राणीपालन पद्धतींमध्ये बदल होईल. प्रयोगशाळेत विकसित मांस आणि वनस्पती-आधारित पर्याय पारंपरिक पशुपालनाला आव्हान देतील.
सरकारी नियम व समर्थन
पर्यावरण व पशुसंवर्धनासाठी कठोर कायदे लागू होऊ शकतात, ज्यामुळे अनुपालन खर्च वाढेल, परंतु शाश्वत पद्धतींसाठी अनुदाने देखील मिळतील. स्थानिक जाती आणि देशी प्राण्यांच्या संवर्धनासाठी धोरणे लागू केल्याने लहान शेतकऱ्यांना मदत होईल.
डिजिटल बाजारांशी एकीकरण
ई-कॉमर्स आणि थेट ग्राहक विक्री प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना पशुधन उत्पादने अधिक प्रभावीपणे विकता येतील. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे उत्पादनाचा मागोवा घेता येईल आणि गुणवत्ता व योग्य किंमत सुनिश्चित केली जाईल.
प्रजनन तंत्रज्ञान
निवडक प्रजनन आणि जनुकीय अभियांत्रिकीमुळे रोगप्रतिकारशक्ती आणि उत्पादकता वाढेल. क्लोनिंग आणि प्रयोगशाळा-आधारित प्रजनन तंत्र पशुपालनात क्रांती घडवू शकते. उदाहरणार्थ, गाय आणि म्हैस यांच्या बाबतीत कृत्रिम रेतन तयार करताना पुढच्या किमान ५०-१०० पिढ्यांमध्ये बैल किंवा टोणगा जन्मालाच येणार नाही, अशी सोय रेतमात्रा साठवून ठेवताना केली जात आहे. याचा परिणाम नक्की काय होईल, हे आज तरी सांगता येत नाही.
विमा संरक्षण अधिक शेतकऱ्यांना पशुधन विमा, डिजिटल कर्ज आणि आर्थिक साधनांद्वारे जोखीम व्यवस्थापनाचा फायदा होईल. सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) लहान शेतकऱ्यांना अधिक चांगले बाजारभाव मिळवण्यासाठी मदत करतील.
एकूणच, प्राणीपालन अधिक तंत्रज्ञान संचालित, शाश्वत आणि ग्राहककेंद्रित होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी संधी आणि आव्हाने दोन्ही निर्माण होतील. शेतकऱ्यांच्या कित्येक पिढ्यांच्या जगण्याचा भाग असलेले हे पशुधन आता भविष्यात कमी कमी होत गायब होईल. आपल्या दारातच कष्ट केलेला बैल मेला पाहिजे, त्याला मी कसायाकडे देणार नाही हे शेतकरी जीवनातील अतिमहत्त्वाचे तत्त्व हरवून जाईल. आवडता बैल मेल्यावर शेताच्या बांधावर मीठ टाकून बैल पुरण्याची गोष्ट आता नव्या पिढीला समजण्याची कुठलीच शक्यता उरणार नाही असे वाटते.
shekharsatbara@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.