Buldhana News : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प ई-पीक पाहणीस एक ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. यात सात-बारावर पीकपेरा स्वतः शेतकऱ्यांनी अॅन्ड्राईड फोनद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. शेतकरी स्तरावर पीकपाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ९ लाख २८ हजार ७८१ हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ३७ हजार १८ हेक्टर क्षेत्र, तसेच सहा लाख ६१ हजार १३५ खातेदारांपैकी एक लाख ७२ हजार ७८४ खातेदारांनी पिकांची ई-पीक पाहणी करून मोबाइल ॲपद्वारे सात-बारावर नोंदणी केली आहे. आजवर जिल्ह्याची ई-पीक पाहणीची नोंदणी फक्त ३१.६० टक्के क्षेत्रावर झाली आहे.
तसेच खरीप हंगामात डिजिटल क्रॉप सर्वेअंतर्गत जिल्ह्यातून निवड झालेल्या बुलडाणा तालुक्यात आजपर्यंत ५७ हजार ६९४ हेक्टर क्षेत्रापैकी २० हजार ७६८ हेक्टर क्षेत्र, तसेच ७२ हजार ३४४ खातेदारांपैकी २१ हजार ५७८ खातेदारानी पिकांची ई-पीक पाहणी केली. बुलडाणा तालुका डिजिटल क्रॉप सर्वेअंतर्गत ई-पीक पाहणीची नोंदणी ३६.०१ टक्के क्षेत्रावर झाली आहे. उर्वरीत क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंदणी करण्याचे आवाहन आले आहे.
ही पीक पाहणीची नोंदणी ई-पीक पाहणी व्हर्जन ३.० या मोबाइल ॲपद्वारे करताना ॲन्ड्रॉईड फोन आवश्यक आहे. सदर ॲप गूगल क्रोम अपडेट करून मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेत बांधावर जाऊन पिकांची नोंदणी करून माहिती अपलोड करावी. शेतकऱ्याजवळ मोबाइल उपलब्ध नसल्यास किंवा हाताळता येत नसल्यास, संबंधित गावाचे तलाठी, कोतवाल, तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर यांची मदत घेऊन पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी ॲपद्वारे करावी.
...तर सात-बारा राहणार कोरा ई-पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी केली नसल्यास सात-बारावर पीकपेरा कोरा राहणार आहे. तो नंतर भरता येत नसल्यामुळे पीकविमा आणि इतर शासकीय अनुदान, लाभ मिळविण्यास अडचण निर्माण होणार आहे. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीबाबत पीकविमा मिळण्यासाठी सात-बारावर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपूर्वी पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.