Sangli News : शासनाने ई-पीकपाहणी अॅपद्वारेच करायची अशी सक्ती केली आहे. शेतकरी पीकपाहणीची नोंद करण्यासाठी दिवसभर प्रयत्न करत आहे. मात्र, ई-पीकपाहणी करण्यासाठी नेटवर्कचा अडथळा निर्माण झाला आहे. यासदंर्भात आवश्यक तांत्रिक माहितीही मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी नोंद करण्यासाठी नेटवर्कची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
जिल्ह्यात यंदा जून महिन्यापासून वेळेत पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. सध्या जिल्ह्यात खरिपाची २ लाख ४० हजार १९० हेक्टरवर पेरणी झाली आहे. शासनाने ई-पीकपाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी अशी सक्ती केली आहे. त्यामध्ये विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीकपाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावत दिसल्यास ई-पीकपाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहित धरले जाणार आहे.
जिल्ह्यातील शेतकरी ई-पीकपाहणीवर पिकाची नोंद करण्यासाठी अॅपचा वापर करत आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत १३ हजार ९६३ खातेदारांनी १३ हजार १३१ हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी अॅपवर पिकाची नोंद केली आहे. तर ऊस, द्राक्ष, केली ही पिके घेणाऱ्या खातेदारांनीही पीकपाहणी केली आहे. ही पिके घेणाऱ्या खातेदारांची संख्या ७ हजार ९९५ असून ५ हजार २२२ हेक्टर क्षेत्राची पीकपाहणी ॲपवर नोंद केली आहे.
परंतु गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क नसल्याने अॅप सुरू होत नाही. अॅप सुरू झाले तर ते मध्येच बंद पडते. पुन्हा अॅप सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागत आहे. अनेक शेतकरी पहाटेच्या वेळी अॅप सुरू होते का याची चाचपणी करताहेत. परंतु सातत्याने सर्व्हर बंद पडत असल्याने शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी अॅपवर पिकाची नोंद करता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
जत तालुक्यासारख्या भागात मराठी आणि कन्नड अशी भाषा आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी अॅपवर पिकाची नोंद कशी करायची याबाबत पुरेशी माहिती नाही. त्यामुळे जत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये ई-पीकपाहणी करण्यासाठी जनजागृती केली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच शेतकऱ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नाही. त्यामुळे जत तालुक्यातील अॅप वर ई-पीकपाहणी कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात, सर्व्हर डाऊन, नेटवर्क मिळत नाही, मध्ये अॅप बंद होणे असे प्रकार होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. सर्व्हर डाऊन असल्यामुळे तांत्रिक माहिती मिळेना गेली आहे. अनेक पिके नोंदविताना अनेक समस्या येत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.