
Farmers Success Story: यवतमाळ येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा यांनी पर्यावरण, गुणवत्तापूर्ण पीक उत्पादनाची गरज ओळखून स्वानुभवातून गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक नैसर्गिक शेतीचे मॉडेल विकसित केले आहे. त्यांचे हे शेतीचे मॉडेल उत्पादन खर्च कमी करीत अधिक उत्पन्न देणारे आहे. या शेती पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी जमीन सुपीकता आणि पर्यावरण संरक्षणाचा उद्देश साधला आहे. त्यांच्या मते जेव्हा रासायनिक खते, कीटकनाशके नव्हती, त्या वेळी निसर्गात असलेल्या फळ, फुलांचे उत्पादन कसे होत होते?
हाच धागा पकडत त्यांनी पीक व्यवस्थापनास सुरुवात केली. पक्ष्यांचा शेतशिवारात वावर वाढला तर पिकांचे किडींपासून संरक्षण होईल. ही बाब विचारात घेत त्यांनी शेताच्या बांधावर अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. रासायनिक खतांना पर्याय म्हणून त्यांनी शेणखत आणि विविध नैसर्गिक निविष्ठाच्या वापरावर भर दिला. यावर जास्त खर्च होत नाही. यासाठी त्यांनी पशुपालनातही सातत्य राखले आहे.
पावसाचे पाणी शेतशिवारातच जिरले पाहिजे यासाठी त्यांनी जल, मृदा संधारणावर भर दिला आहे. जमिनीची सातत्याने सुपीकता वाढवण्यावर त्यांचा भर आहे. यातून त्यांनी रसायन अवशेषमुक्त गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे गणित साध्य केले आहे. या सर्व प्रयत्नामध्ये त्यांना पत्नी सौ. मंजुश्री यांची साथ मिळाली आहे. सुभाष शर्मा यांच्या शाश्वत शेती पद्धतीच्या मॉडेलचा देशभर प्रसार झाला आहे. जमिनीची सुपीकता जपण्याच्या अथक प्रयत्नांची, पर्यावरणपूरक शेती पद्धतीची दखल घेत केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.
वरपूड (ता. परभणी) येथील चंद्रकांत अंबादासराव देशमुख हे संशोधक शेतकरी म्हणून ओळखले जातात. वरपूड शिवारामधील १५० एकर क्षेत्रामध्ये त्यांचे विविध प्रयोग सुरू आहेत. देशमुख यांना ताग तसेच सोयाबीन, हरभरा बीजोत्पादनाचा अनुभव आहे. त्यांनी निवड पद्धतीने सोयाबीनची जात विकसित केली असून त्यास ‘वरपूडकर सिलेक्शन’ हे नाव दिले आहे. उन्हाळी हंगामातही त्यांनी आधुनिक सिंचन पद्धतीने सोयाबीनचे विक्रमी बीजोत्पादन घेतले आहे. या शेती व्यवस्थापनात त्यांना पत्नी सौ. लता यांची चांगली साथ मिळाली आहे.
पिकांच्या गरजेनुसार मोजून पाणी देण्यासाठी स्टॅण्डर्ड वॉब्लर, हाय वॉब्लर, यूपी ३, बब्लर, म्युझिकल नोझलसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा ते वापर करतात. १७ वर्षांपूर्वी त्यांनी शिवारात केसर, पायरी, हापूस, वनराज, हूर, दशहरी आंबा लागवड आहे. याचबरोबरीने २०२३ मध्ये त्यांनी नवीन क्षेत्रात देश, परदेशातील ५५ आंबा जातींची लागवड केली. हैदराबाद येथील इक्रिसॅट आणि रांची येथील कृषी विद्यापीठाने त्यांचा प्रयोगशील शेतकरी म्हणून गौरव केला आहे.
चळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील वासुदेव भास्कर गायकवाड हे बी.ई. सिव्हिल पदवीधर असून १९९६ पासून प्रयोगशील शेती करतात, सुरुवातीला २० एकर द्राक्ष, १० एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड होती. स्थानिक मार्केटसह निर्यातक्षम उत्पादनातही त्यांनी आघाडी घेतली.
पण या दोन्ही पिकांतील रासायनिक खते, कीडनाशकांच्या अनियंत्रित वापराचे परिणाम अनुभवल्यानंतर त्याला पर्याय शोधला पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला. याचे चिंतन करुन पुढे १० वर्षे त्यांनी विना खुरपणी आणि पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती व्यवस्थापनाकडे लक्ष दिले आहे. या शेती प्रवासात त्यांची पत्नी सौ. सुलभा यांचाही मोलाचा वाटा आहे.
मासानोबू फुकुओका यांच्या संकल्पनेनेनुसारच गायकवाड शेतीचे व्यवस्थापन करतात. आंबा, सीताफळ बागेचे नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थापन ठेवले आहे. गायकवाड यांना कृषी विभागातर्फे कृषिभूषण (सेंद्रिय) पुरस्कार तसेच मुंबई येथील वसंतराव नाईक प्रतिष्ठानतर्फे नैसर्गिक शेतीतील कार्याबाबत पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सिंगापूर (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील रोहन उरसळ हे पुरंदर हायलॅण्ड्स शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष आहेत. उरसळ यांनी दिवे, जाधववाडी शिवारातील तीनशेहून अधिक अंजीर, पेरू आणि सीताफळ उत्पादकांना एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली.अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना विविध निर्यातक्षम वाण उपलब्ध व्हावे, अंजिराला परदेशी बाजारपेठ मिळवण्यासाठी रोहन उरसळ प्रयत्नशील आहेत.
गेल्या काही वर्षात त्यांनी जर्मनी, नेदरलॅण्ड, हाँगकाँग बाजारपेठेत अंजिराची यशस्वी निर्यात केली आहे. देश, परदेशातील विविध प्रदर्शनांत त्यांच्या कंपनीच्या उत्पादनांनी ठसा उमटवला आहे. कंपनीने आंबा, पेरू, जांभूळ, अंजीर, सीताफळ प्रक्रियेला गती दिली आहे. याचबरोबरीने अंजीर ब्रेड स्प्रेड, अंजीर ज्यूस निर्मितीमध्ये चांगले काम केले आहे. कंपनीतर्फे पोलंड देशात अंजीर ज्यूस निर्यात सुरू झाली आहे. शेतकरी ते निर्यातदार या प्रवासात त्यांच्या पत्नी सौ. प्रणाली यांचाही मोलाचा वाटा आहे.
पूर्णपणे जिरायती पट्टा असलेल्या मांडवगण (जि. अहिल्यानगर) शिवारास अनुकूल अशी तुरीची शेती प्रयोगशील शेतकरी प्रशांत देशमुख यांनी यशस्वी केली आहे. अकरा वर्षांपासून तूर पिकात सातत्य ठेवण्यासह लागवड अंतर, वाण बदल आणि योग्य व्यवस्थापनातून एकरी ८, १२, १६ क्विंटलपर्यंत उत्पादनाची पातळी गाठली आहे. तूर पिकातील ‘मास्टर शेतकरी’ अशी त्यांची ओळख आहे. ‘मायक्रोबायोलॉजी’ विषयात पदवी घेतल्यानंतर प्रशांत यांनी २००७ च्या दरम्यान घरच्या शेतीमध्ये लक्ष घातले.
त्या वेळी उसाचे अधिक क्षेत्र होते. मात्र कमी पाण्यात येणारे आणि उसाला पर्याय ठरणारे पीक शोधताना ‘ॲग्रोवन’मध्ये तूर शास्त्रज्ञ डॉ. वंजारी यांचा लेख वाचनात आला. त्यांचे मार्गदर्शन घेऊन तूर पिकाची त्यांनी निवड केली. २०१३ पासून ते आजपर्यंत प्रशांत यांनी विविध प्रयोगांमधून तूर उत्पादनवाढीचा आलेख उंचावत ठेवला आहे. या शेती व्यवस्थापनात त्यांना पत्नी सौ. शीतल यांची चांगली सोबत आहे.
मावलगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील शरद बाबूराव पाटील हे प्रयोगशील शेतकरी. लाल कंधारी गोवंश संगोपन आणि संवर्धनासाठी मावलगाव येथे २००३ मध्ये लाल कंधारी पैदास केंद्राची स्थापना केली. त्यांच्या ‘लक्ष्मी’ या लाल कंधारी गाईने राष्ट्रीय पशू प्रदर्शनात चार वेळा सर्वोत्कृष्ट गोवंशाचा पुरस्कार मिळविला आहे. मावलगावमध्ये त्यांनी ‘घर तेथे लाल कंधारी गाय’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमातून त्यांच्या गावामध्ये ३५० हून अधिक जातिवंत दुधाळ लाल कंधारी गाईंचे संगोपन होत आहे.
गावशिवारात नवनवीन कृषी तंत्रज्ञान प्रसारामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. श्री विठ्ठल शेतकरी बचत गट आणि शेतकरी मित्र फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे ते सभासद आहेत. २०२० मध्ये पाटील यांना कृषी विभागातर्फे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. प्रयोगशील शेती आणि लालकंधारी गोवंश संगोपनामध्ये पत्नी सौ. शालिनी यांची चांगली साथ मिळाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.