Sharad Joshi : कांदा लढ्यातूनच आर्थिक क्रांतीची सुरवात!

Farmer Protest : कुठल्याही शेतमालाचे आंदोलन कुठे परिणामकारक होवू शकते, याचे भान कांदा आंदोलनाने दिले. जोशींच्या मते विशिष्ट किमतीच्याखाली शेतमाल विकायचा नाही, हा इथल्या शेतकऱ्यांचा निर्धारही महत्त्वाचा होता. त्यामुळेच कांद्याचा लढा हा देशातील शेतकरी क्रांतीची सुरुवात ठरू शकला.
Sharad Joshi
Sharad JoshiAgrowon
Published on
Updated on

चिमणदादा पाटील

Sharad Joshi Protest : शरद जोशीचे उपोषण चालू असतानाच १० मार्च ते १६ मार्च १९८० या काळात निघोजे गावचे सरपंच वसंतराव येळबंडे यांच्या नेतृत्वाखाली शंभरेक शेतकऱ्यांनी आपापल्या बैलगाड्या अचानक पुणे - नाशिक महामार्गावर सोडून रस्ता रोको आंदोलन सुरू केले. छोट्या छोट्या गटांनी साधारणतः २ ते ३ किलोमीटरमध्ये रस्ता अडवल्यामुळे पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली.

महामार्गच बंद पडल्यामुळे हजारो ट्रक व वाहने अडकून पडली. सर्वदूर खळबळ माजली. आंदोलनाचे पडसाद दिल्लीपर्यंत पोचले. १३ मार्च १९८० ला लोकसभेत शासनातर्फे निवेदन देण्यात आले, की नाफेडला ४५ ते ७० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच दिवशी शरद जोशींनी आपले उपोषण सोडले.

पुढे एकाच महिन्यात (२३-४-८० रोजी) नाफेडने कांदा खरेदी बंद केली. त्या विरोधात शरद जोशी दुसऱ्यांदा उपोषणाला बसले. ३ मे १९८० रोजी पोलिसांनी त्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला. माझे उपोषण म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न नाही. हा आरोप मुळातच चुकीचा आहे, असे त्यांनी कोर्टात सांगितले.

शरद जोशींच्या आदेशाप्रमाणे चाकण मार्केटमधील सर्व शेतकऱ्यांनी आपला कांदा विकला नव्हता. अचानक पाऊस आल्यास आपला कांदा भिजेल व सगळा माल पाण्यात जाईल. त्यापेक्षा आता येईल त्या भावात विकून टाकू, अशी चलबिचल शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली. ते लक्षात येताच सौ. लीलाताई आंदोलनस्थळी आल्या.

Sharad Joshi
Sharad Joshi: शरद जोशी- अंगारमळ्यातला योध्दा शेतकरी

चाकण बाजारपेठेत जमलेल्या शेतकऱ्यांपुढे म्हणाल्या, ‘‘ज्या कोणाला कांदा विकावासा वाटत असेल, त्यांनी तो खुशाल विकावा. सर्व शेतकऱ्यांनी हे आंदोलन सोडायचं ठरवलं तरी या कामासाठी माझ्या नवऱ्याने सुरू केलेले उपोषण त्यांनी सोडावं, असे मी मुळीच म्हणणार नाही.

माझा कुंकवाचा धनी बळी पडला तरी चालेल, पण मी आता माघार घेणार नाही. इतकेच नव्हे तर माझा नवरा, मी, आमची गाडी, आमचे दोन बैल आणि आमचा डॅश कुत्रा या रस्त्यावर बसून हे आंदोलन असेच चालू ठेवू.’’ लीलाताईंच्या या भाषणाने समोर बसलेल्या महिला पेटून उठल्या.

त्यातील एक उभी राहून म्हणाली, ‘‘माझं कुंकू पुसलं गेलं तरी हरकत नाही. मीपण आता माघार घेणार नाही.’’ बायकांनी घेतलेला पुढाकार पाहून सगळे शेतकरी ‘रास्ता रोको’ ला पुढे आले आणि घोषणा देत नाफेडच्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांच्याच बाजार समितीतील कार्यालयात कोंडले. शेवटी पुण्याहून नाफेडचे पाटील नावाचे अधिकारी आले. त्यांनी वाटाघाटी केल्या.

कांद्याचा भाव प्रतिक्विंटल ५० ते ६० रुपये मान्य केला. कारण त्या वेळी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल १५ रुपये इतका कोसळलेला होता. पण कांद्यावर निर्यातबंदी घालणे व आंदोलन तीव्र झाले की तेवढ्या पुरती निर्यातबंदी उठविणे, असे एक दुष्टचक्रच सुरू झाले होते.

नाफेडने वरकरणी कांदा खरेदी चालू ठेवली होती. काही ना काही कारण दाखवत कांदा परत पाठवत होते. बाजारपेठेत आलेल्या कांद्याचे मोठमोठे ढीग लिलावासाठी पडून होते. जोशींनी दिवसभर वारंवार नाफेडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुण्याला जाऊन कलेक्टरांना भेटून रविवारीदेखील खरेदीचे आश्वासनही मिळविले. रविवारी खरेदी सुरू झाली.

बाजारपेठेत शरद जोशी, शंकरराव वाघ, बाबूलाल परदेशी सतत फिरत होते. बाजीराव शिंदे या दलालाच्या गाळ्यासमोर कांद्याचे ४२ ढीग पडून होते. नाफेडने कांद्याचा एकच ढीग खरेदी केला. जोशींकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात तक्रारी घेऊन येवू लागले.

शेतकरी संतप्त झाले. शेतकरी संघटनेच्या घोषणाबरोबरच नाफेडच्या विरोधात घोषणा द्यायला सुरवात केली. लिलावच बंद पाडला. शेतकरी पुणे-नाशिक महामार्गावर आले. मोठ्या प्रमाणात दगड गोळा करून रस्त्यावर ठेवले.

तिथेच बसकण मारून त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलकांची संख्या चार-पाच हजारावर जाऊन पोचली. राष्ट्रीय महामार्गच बंद पडल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शरद जोशींना व त्यांच्याबरोबरच्या ३१६ आंदोलकांना अटक केली.

रात्री दहा वाजता त्यांना चाकणच्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर उभे केले. सर्वांना १० दिवसाचा रिमांड देण्यात आला. जोशींना व इतर ७ कार्यकर्त्यांना औरंगाबाद येथील तुरुंगात डांबण्यात आले. ३ जून १९८० ला रिमांड पूर्ण झाल्यावर सर्वांना खेड तालुका कोर्टात हजर करण्यात आले. आंदोलकांतर्फे तीन ॲडव्होकेट साहेबराव बुटे व सहकारी वकिलांनी काम पाहिले. तसेच, आमदार राम कांडगे यांनीही मदत केली. सायंकाळी पाचच्या सुमारास सर्वांची जामिनावर सुटका झाली.

शेतकरी संघटनेने आंदोलनासाठी कांदा हे पीक प्रथम निवडले. ही निवड अचूक ठरली. त्या वेळी देशात कांद्याच्या उत्पादनापैकी एकट्या महाराष्ट्रातच ६० ते ७० टक्के कांदा उत्पादन होई. त्यातही ५० टक्के कांदा पुणे व नाशिक जिल्ह्यात होई. म्हणजे देशातील एक तृतीयांश कांदा या दोन जिल्ह्यातील पाच तालुक्यात होत होता.

कुठल्याही शेतमालाचे आंदोलन कुठे परिणामकारक होवू शकते, याचे भान या आंदोलनाने दिले. जोशींच्या मते विशिष्ट किमतीच्याखाली शेतमाल विकायचा नाही, हा इथल्या शेतकऱ्यांचा निर्धारही महत्त्वाचा होता. त्यामुळेच कांद्याचा लढा हा देशातील शेतकरी क्रांतीची सुरुवात ठरू शकला.

चाकण परिसरातील कांद्याच्या उत्पादनाइतकेच प्रचंड उत्पादन कांद्याचे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात घेतले जात होते. चाकण कांदा आंदोलनाच्या दैनिकामध्ये येणाऱ्या बातम्या वाचून निफाड साखर कारखान्यातील कारकून तुकाराम निरगुडे पाटील हे चांगलेच भारावून गेले होते. त्यांनी शरद जोशींना पत्र लिहून चाकणला भेटण्यास आले.

शेतकरी संघटनेच्या कार्यालयात पोचल्यानंतर थोड्या चर्चेनंतर शरद जोशी यांनी तीन दिवस आपल्याबरोबर फिरविले. आळंदीच्या शेतकरी संघटनेची सभा त्यांनी पाहिली. त्यांनी नाशिकला संघटनेचा कार्यक्रम ठेवण्याविषयी चर्चा केली. शेवटी चौथ्या दिवशी नाशिकला संघटनेचा कार्यक्रम करण्याचे आश्‍वासन घेऊनच ते निघाले.

Sharad Joshi
Ground Water Management : भूजलाचे व्यवस्थापन आव्हानात्मक : जोशी

निफाडला आल्यानंतर कारखान्याचे चेअरमन माधवराव बोरस्ते, माधवराव मोरे, प्रल्हाद पाटील यांची जोशी यांच्याशी भेट घडवून आणली. १५-४-१९८० रोजी कारखान्याच्या आवारात शरद जोशी यांची सभा झाली. पुढील मोठी सभा १५-८-१९८० ला घ्यायचे ठरले. निरगुडे यांनी पुन्हा १२-८-१९८० ला तिघांची भेट घडवून आणली.

उसाच्या शेतीबाबत चर्चा केली. साखर निर्मितीच्या प्रत्येक पावलावर सरकारचे व राजकारण्यांचे जाचक नियंत्रण असल्याचे शरद जोशी यांच्या लक्षात आणून दिले. त्यातून शंभरच्या खाली कांदा द्यायचा नाही आणि तीनशेच्या खाली ऊस द्यायचा नाही, अशी जाहीर घोषणाच करण्यात आली. आंदोलन एक पाऊल पुढे गेले.

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com