Interview with Devidas Saudagar : मातीत राबणाऱ्या हातांचा लिहिण्यापर्यंतचा प्रवास खडतरच

Devidas Saudagar : तुळजापूर (जि. धाराशिव) येथील देविदास सौदागर यांच्या ‘उसवण’ या पहिल्याच कादंबरीला नुकताच साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या आयुष्यातील वेदनांचे वास्तव चित्रण या कादंबरीत आहे. पुरस्काराच्या निमित्ताने देविदास सौदागर यांच्याशी केलेली ही बातचीत.
Devidas Saudagar
Devidas Saudagar Agrowon

This conversation with Devidas Saudagar on the occasion of Sahitya Akademi Yuva Puraskar :

हातात सुई-दोरा असताना लेखणी कशी आली? कादंबरी लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

आमचं कुटुंब मूळचं लातूर जिल्ह्यातील बेलकुंडचं. उपजीविकेसाठी तुळजापूर (जि. धाराशिव) येथे स्थलांतरित झालो. माझा जन्म तुळजापूरचा. पोटापाण्यासाठी वडील शिंपी व्यवसाय करायचे. घरात टीव्ही किंवा रेडिओ नव्हता. मनोरंजनाची कुठलीच साधनं नव्हती. त्यामुळे बालपणीच वाचनाची गोडी लागली. अण्णा भाऊ साठे, भालचंद्र नेमाडे यांच्यापासून ते आसाराम लोमटे अशा अनेक लेखकांची पुस्तकं वाचली. दुसऱ्यांचं दुःख, वेदना व संघर्ष वाचताना आपल्याही जगण्याची गोष्ट सांगावी असं वाटलं. साहित्यात शिवणकाम करणाऱ्यांचं चित्रण दिसलं नाही. ही पोकळी मला लिहिण्याची प्रेरणा देऊन गेली. वडिलांचे हाल, स्वतःचे भोगलेले अनुभव जगासमोर मांडण्यासाठी लिहावं वाटलं. आधी कविता लिहिल्या. पण हे सगळं मांडण्यासाठी कविता अपुरी पडते. त्यामुळे कांदबरी लिहिण्याचं ठरवलं. कवितेच्या तुलनेत कादंबरी लिहिणं जास्त कष्टाचं काम आहे. त्यासाठी वेळ काढणं आणि रोजच्या जगण्याच्या धबडग्यात त्यासाठी मन एकाग्र करणं जिकिरीचं आहे. यामुळे कांदबरी  लिहिताना मध्येच थांबावं वाटलं. मात्र पुन्हा कोण शिंपी व्यवसायाच्या व्यथा मांडेल की नाही, असं वाटल्यानं कांदबरी लिहिण्याला बळ मिळालं.

आजोबा, वडील शेतमजूर होते. तुम्ही शिंपी कामाकडे कसे वळलात?

आजोबा व वडील शेतात काम करायचे. काही काळ त्यांनी गुरंही राखली. आजही अनेक शेतकरी बांधव शेतीला जोडधंदा किंवा पूरक व्यवसाय म्हणून शिवणकाम करतात. त्यामुळे शेती आणि शिवणकामाची पूर्वीपासूनच जवळीक आहे. आजोबांनी हयातभर शेतमजूर म्हणून काम केलं. त्यात कष्ट भरपूर होते आणि कमाई तुटपुंजी. त्यामुळे आजोबांनी वडिलांना शेतीच्या कामातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. घरची परिस्थिती हलाख्याची होती. वडील शिवणकाम शिकले व घर चालवू लागले. त्यांनी मलाही हे काम शिकवलं. मी एम.ए.पर्यंत शिक्षण घेतलं. पण नोकरी मिळेल असं वाटलं नाही. त्यामुळे मी पूर्णवेळ या व्यवसायात रमलो.

Devidas Saudagar
Interview with Dr.Megha Khole : मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत

वेदना संपत नाही म्हणून लेखन संपत नाही, असं तुम्ही म्हणता. तुमची भूमिका काय आहे?

‘उसवण’मध्ये शिवणकाम करणाऱ्यांच्या जगण्याचं वास्तव मांडलं आहे. गावगाड्यात एकेकाळी या व्यवसायाला असलेलं स्थान आज बदललं आहे. यांत्रिकीकरण वाढलं आहे. तयार (रेडिमेड) कपड्यांचा व्यवसाय वाढलाय. आता तर ऑनलाइन मार्केटिंगमुळे कपडे घरपोच मिळत आहेत. या सगळ्यांचा ग्रामीण भागातील शिंपी व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. ही उलथापालथ, घुसमट मी कांदबरीत मांडली आहे. ‘उसवण’मध्ये मांडलेल्या वेदनेला पुरस्कार मिळाला म्हणून ती संपत नाही. वेदनेवर केवळ फुंकर मारली जाते. कोणाला तरी आपल्या वेदनेची जाणीव झाली, ही भावना सुखावून जाते. कोणी तरी आपल्या सोबत आल्यासारखं वाटतं. आजूबाजूला अनेकांचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरू आहे. स्वतःच्या वेदनेला शब्दांची झालर देता आली, त्यामुळे संघर्ष करणाऱ्या इतरांच्या वेदना प्रकर्षाने जाणवतात. पुढची कादंबरी सुशिक्षित बेरोजगारांच्या आयुष्यावर असेल. त्यांची अवस्था खूप वाईट आहे. त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, लग्न होत नाहीत, वय निघून जात आहे. अशा तरुणांच्या आयुष्यावर लिहिण्याचा विचार आहे.

शेतकरी आत्महत्या या समस्येकडे आपण कसं बघता?  

शेतकरी आत्महत्या वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे हाताच्या फोडाप्रमाणे पिकवलेल्या त्यांच्या पिकांना योग्य भाव न मिळणं. वेळेवर उपलब्ध न होणारी साधनसामग्री, शेतीला वज न मिळणं, कर्जाचा दबाव यामुळे आत्महत्या घडतात. आत्महत्या थांबल्या पाहिजेत. त्याचं उत्तर आपल्या पूर्ण व्यवस्थेत दडलेलं आहे. सरकार, प्रशासन व समाज व्यवस्था यांची भूमिका यात महत्वाची आहे. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, असं सर्वसामान्य लोकांनाही वाटलं पाहिजे. प्रशासनाला शेतकऱ्यांविषयी आपुलकी वाटायला हवी. केवळ सरकारला दोष देऊन भागणार नाही, तर ग्राहक म्हणूनही शेतीमालाला चांगला भाव देण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. पाच अन् दहा रुपयाला मेथीची जुडी मागत बसलो आणि वरूनच महागाई वाढली म्हणत बसलो तर चुकीचे आहे. शेतीमालाच्या बाबतीत महागाईचा बागुलबुवा होऊ नये. इथे सरकारएवढीच लोकांची जबाबदारी आहे. आजोबा व वडिलांचे शेतमजूर म्हणून कष्ट मी जवळून बघितलेत. कादंबरीसाठी डोक्यात विषय भरपूर आहेत. मात्र शेतमजूर व शेतकऱ्यांचा संघर्ष मी येत्या काळात नक्की मांडेन.

Devidas Saudagar
Interview with Vikas Patil : यंदाच्या खरिपासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध

साहित्यात शेतीचं वास्तव नेमकेपणानं मांडलं जातं का?

पूर्वी शेतीच्या विषयावर बरंच लिखाण झालं आहे. अलीकडच्या काळात खेडी ओस पडत आहेत. शहरात दाटी होत आहे. खेड्यातील दुःख सांगणारे कमी होत चालले आहेत. साहित्यात वेदनेची व भोगण्याची गोष्ट लिहिणं तेवढं सोपं नाही. वेदना पाहणारा चांगलं लिहू शकेल; परंतु भोगणारा त्यापेक्षा किती तरी पटीने चांगलं लिहितो. वेदनेशी एकरूप झालेलाच त्याची प्रभावी मांडणी करतो. पण पोटाची खळगी भरण्यासाठीच्या संघर्षात स्वतःचं जगणं मांडण्यासाठी त्यांच्याकडे उसंतच नाही किंवा तसा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाहीत. काही युवक असे प्रयत्न करताना दिसतात. मात्र, आपलं दुःख कशाला उगाळत बसायचं आणि ते सांगितलं तरी त्यावर उपाय काय निघणार, असं त्यांना वाटतं. शेतीचा प्रश्‍न ज्वलंत आहे, त्यावर नेहमीच चर्चा होते; आपण बोलून त्यात काय फरक पडणार आहे, असा निराशावादी सूर दिसतो. साहित्यात शेतीचे प्रश्‍न मांडले गेलेच नाहीत, असं नाही. वास्तव जसंच्या तसं मांडलं गेलं नसलं तरी हे विषय आले आहेत. अलीकडच्या काळातील किंवा समकालीन गोष्टी साहित्यात दिसत नसल्या तरी त्या पुढील काळात नक्कीच येतील. मातीत राबणाऱ्या हातांचा लिहिण्यापर्यंतचा प्रवास खूपच खडतर आहे. रोजच्या जगण्या-मरण्याचा झगडा मोठा आहे. शेतीत रोज नव्या प्रश्नांचा सामना करताना लेखणी हातात घेऊन लिहावं वाटणं, हे खूप कठीण आहे.

ग्रामीण भागात समस्यांचा डोंगर आहे. या बद्दल आपल्याला काय वाटते?

शेतीप्रधान देशात महात्मा गांधी ‘खेड्याकडे चला’ म्हणत होते, याचा अर्थ नीट समजून घेण्यात मुळात आपण कमी पडलो आहोत. तरूणांचे लग्न न जमण्यासाठी सरकार जबाबदार नाही. प्रत्येक समस्येसाठी सरकारकडे बोट करून जमणार नाही. काही बाबतीत सर्वसाधारण मानसिकता चुकीची वाटते. चांगली हवा, चांगले अन्न व चांगले पाणी तसेच नैसर्गिक अधिवास शेतीतून मिळत असतानादेखील आपण भौतिक गोष्टींच्या नको इतके मागे लागलो. शहरी गोष्टींचा अतिरेकी हव्यास हा आपला जगण्यातला दुटप्पीपणा आणि विरोधाभास वाटतो. शेती बहरत गेली असती तर जमिनीचे तुकडे झाले नसते. कोणी शेती, तर कोणी शेतीपूरक जोडधंदा केला असता. दुर्दैवानं ते झालं नाही.

शेतकरी आणि शेतमजुरांशी तुमचा संपर्क येतो. तुमची निरीक्षणं काय आहेत?

शिवणकामाच्या निमित्ताने शेतमजूर व शेतकऱ्यांशी संपर्क येतो, त्यांची दुःखं कळतात. त्यांच्याबद्दल स्वतः एवढाच विश्‍वास वाटतो. ते पैसे बुडवणार नाहीत, याची खात्री वाटते. एखाद्याकडून शिवणकामाचे पैसे कमी घेणं किंवा उधार देणं, या गोष्टी करताना आपण आपल्याच कोणाला तरी मदत करतो, असं वाटून जातं. हा देखील आपल्यासारखाच झुंजणारा आहे, आपल्यासारखाच कोणीतरी आपल्याला भेटला अशी भावना असते. शेतकरी आणि शेतमजुरांच्या समस्यांची दाहकता मोठी आहे. त्यांच्या जगण्यातील वेदनांची तीव्रता आपल्यापेक्षा वेगळी नाही, याची जाणीव सतत होत राहते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com