Interview with Dr.Megha Khole : मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत

Dr Medha Khole : १५ जूनपर्यंत ज्या भागात मॉन्सून असतो त्यापेक्षा सध्या पिछाडीवर दिसतो. यापुढच्या काळात मॉन्सूनची वाटचाल कशी राहू शकते? पुढील आठवडाभर पावसाची स्थिती काय असू शकते? पावसासाठी कोणते घटक आवश्यक असतात? याविषयी पुणे येथील हवामान विभागातील हवामान अंदाज विभागाच्या प्रमुख डॉ. मेधा खोले यांच्याशी साधलेला खास संवाद.
Head of Weather Forecasting Department Dr. Medha Khole
Head of Weather Forecasting Department Dr. Medha KholeAgrowon

Dr. Head of Weather Forecasting Department of Meteorological Department in Pune. Exclusive interaction with Medha Khole

मॉन्सून पोचल्यानंतरही काही भागात पाऊस पडत नाही. असे का होत आहे?

साधारपणे आपण मॉन्सून म्हणजेच पाऊस असे समजतो. पण मॉन्सूनची शास्त्रीय परिभाषा वेगळी आहे. मॉन्सून हा मुख्यतः वाऱ्याशी निगडित आहे. आपल्याकडे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मॉन्सून असतो. कारण या काळात अरबी समुद्रातून नैऋत्य दिशेकडून जे वारे येतात ते मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात. यामुळे आपल्याकडे पाऊस पडतो आणि आपण त्याला नैऋत्य मॉन्सून म्हणतो. मॉन्सून आला हे जाहीर करण्याचे काही निकष आहेत. त्यात वाऱ्याची दिशा कोणती आहे? वाऱ्याचा वेग किती आहे? वाऱ्याची वातावरणातील उंची किती आहे? ढगांची स्थिती काय आहे? कुठले ढग आहेत? ढगांची उंची किती आहे? हे पाहिले जाते. या सगळ्या परिस्थितीचा पाऊस हा मॉन्सूनचा परिपाक आहे. पण मॉन्सून आला म्हणून रोजच पाऊस पडेल असे नाही. मॉन्सून सक्रिय होणे आणि दाखल होणे दोन वेगवेगळ्या वातावरणीय परिस्थिती आहेत.

सध्या मॉन्सूनची स्थिती काय आहे आणि पुढील काळात मॉन्सूनचा प्रवास कसा असेल ?

मॉन्सून यंदा देशात आणि राज्यात सरासरी तारखेच्या आधी आला आहे. सरासरी तारीख ही गेल्या ६० ते ७० वर्षात ज्या तारखेला मॉन्सून देशात पोचला त्याची सरासरी असते. म्हणजेच दरवर्षी कोणत्या तारखेला मॉन्सून देशात दाखल झाला त्याची सरासरी तारीख आहे. मॉन्सून पहिल्यांदा अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये दाखल होतो. मॉन्सूनचे जमिनीवरचे पहिले पाऊल हे केरळमध्ये पडते. केरळमध्ये मॉन्सून दोन दिवस आधी म्हणजेच ३० मे रोजी आला. केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याची सरासरी तारीख १ जून आहे. तर महाराष्ट्रात ६ जूनला पोचला. १२ जूनला मॉन्सून उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्हा सोडला आणि पूर्व विदर्भाचा काही भाग वगळला तर राज्याच्या इतर भागात मॉन्सून पोचला होता. १५ जूनपर्यंत मॉन्सून याच भागात होता. सरासरी मॉन्सून १५ जूनला बहुतांशी राज्य व्यापतो. पण सध्या मॉन्सूनने खानदेशातील नंदूरबार आणि विदर्भातील पूर्व विदर्भाचा काही भाग व्यापलेला नाही. पण मॉन्सून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्य व्यापण्याची शक्यता आहे.

Head of Weather Forecasting Department Dr. Medha Khole
Interview with Sachin Kalantre : नवनवीन वाण उपलब्ध करण्याचे सातत्याने प्रयत्न

मॉन्सूनचा जमिनीवरचा प्रवास समुद्रातील प्रवासापेक्षा वेगाने झालेला दिसतो. असे का?

जमिनीवर आणि समुद्रात मॉन्सूनमध्ये होणारे बदल किंवा मॉन्सूनचा स्वभाव वेगवेगळे असतात. समुद्रात मॉन्सून सक्रिय आहे की नाही, हे मोजण्यासाठी त्याचे परिमाण वारे आहे. तर जमिनीवर मॉन्सून सक्रिय आहे की नाही, हे मोजण्याचे परिमाण पाऊस आहे. मॉन्सूनमध्ये जमिनीवर आणि समुद्रात अशी तफावत दिसते. मॉन्सूनची जमीन आणि समुद्रातील वातावरणानुसार वाटचाल सुरु असते. त्यामुळे हा फरक दिसतो.

जूनमध्ये यापुढच्या काळात पावसात खंड पडू शकतो का?

जून महिन्यात आतापर्यंत बहुतांशी भागात चांगला पाऊस पडत आहे. काही भागात तर पावसाचा जोर जास्त आहे. काही ठिकाणी पाऊस अतिवृष्टीसारखा पडला. तसेच मॉन्सूनची वाटचालही समाधानकारक आहे. काही भागात पावसाचा जोर कमी झाला.

मात्र जून महिन्यात मोठा खंड पडण्याची शक्यता दिसत नाही. पण मॉन्सूनचा जोर कमी होऊ शकतो. ज्या भागात सध्या जोरदार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस पडत आहे, अशा ठिकाणी पुढील काही दिवसांत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नाही की पाऊस पडणारच नाही. पाऊस पडेल पण पावसाचा जोर कमी होऊ शकतो. १८ ते १९ जूनपर्यंत ही स्थिती राहू शकते. पण जसजसा मॉन्सून उत्तरेकडे सरकेल तसतसा पुन्हा पाऊस सक्रिय होऊ शकतो. मॉन्सूनच्या प्रगतीसाठीही पोषक हवामान आहे.

Head of Weather Forecasting Department Dr. Medha Khole
Interview with Vikas Patil : यंदाच्या खरिपासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध

जुलैमध्ये पावसात खंड पडू शकतो, अशी चर्चा आहे. खरंच असे घडू शकते का?

राज्यात १८ ते १९ जूनपर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. पण आपण हवामान विभागाचा पूर्ण मॉन्सून काळाचा अंदाज पाहिला तर मॉन्सून काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिला. कारण मागच्या वर्षी पॅसिफीक समुद्रात जो ‘एल-निनो’ सक्रिय होता त्याचा प्रभाव ओसरत आहे. मॉन्सून काळात त्याचा प्रभाव पूर्ण कमी होईल आणि ऑगस्ट-सप्टेंबरच्या काळात ‘ला-निना’ सक्रिय होण्याची शक्यता आहे. ‘ला-निना’ मॉन्सूनसाठी पोषक असतो. त्यामुळे देशात यंदा चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच मॉन्सूनवर केवळ ‘एल-निनो’ आणि ‘ला-निना’चाच परिणाम होतो असे नाही. ‘एल-निनो’चा प्रभाव कमी होत असताना या घटकांमुळे मॉन्सूनचा पाऊस चांगला पडू शकतो. त्यामुळे जुलै महिन्यात पाऊस कमी पडेल, याला काही आधार नाही. हवामान बदल किंवा इतर कारणांनी काही भागात पाऊस पडण्याच्या घटना घडत असतात. पण त्याला ‘एल-निनो’ किंवा ‘ला-निना’ थेट जबाबदार असतीलच असे नाही.

राज्यात पाऊस पडण्यासाठी पोषक स्थिती केव्हा निर्माण होऊ शकते?

राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यासाठी किंवा चांगला पाऊस पडण्यासाठी दोन-तीन घटकांची आवश्यकता असते. कोकणात पाऊस पडण्यासाठी पश्चिम किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार व्हावा लागतो. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस पडण्यासाठी किंवा मॉन्सून सक्रिय होण्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हावे लागते. हे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले किंवा त्याची तीव्रता वाढली आणि त्याचा प्रवास जर ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान असा झाला तर त्याच्या दक्षिणेला म्हणजेच राज्याच्या अंतर्गत भागात पाऊस पडतो. बंगालच्या उपसागरात जेव्हा एखादे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते तेव्हा बाष्प त्या दिशेने वाहते. त्यामुळे महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मॉन्सून सक्रिय होतो.

मॉन्सून ट्रफ किंवा मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा म्हणजे काय आणि तो कुठे तयार होतो?

मॉन्सून काळात मॉन्सून ट्रफ किंवा मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तो मॉन्सून काळात असतो. हा मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा राजस्थान ते ओडिशाच्या दरम्यान असतो. मॉन्सून काळात संपूर्ण चार महिने त्याचे अस्तित्व असते. हा मॉन्सून ट्रफ उत्तर किंवा दक्षिणेकडे सरकतो त्यानुसार पावसाचे प्रमाण बदलत असते. पण या सोबतच स्थानिक काही घटक असतात; ज्यामुळे पाऊस पडत असतो.

खरिपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आपण काय आवाहन कराल?

अनेक भागात आता कुठे पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत उष्णता जास्त आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय ही उष्णता कमी होणार नाही. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेतला तर पेरणी उलटू शकते. दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. हवामान विभाग रोज हवामान अंदाज आणि मॉन्सूनचा अंदाज देत असतो. त्याकडे आपण पाहावे. पावसाचे प्रमाण सध्या काहीसे कमी दिसत असले तरी पुन्हा मॉन्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडण्याची वाट पाहावी आणि योग्य ओल आल्यानंतरच पेरा करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com