Children Education : मुलांना समजून घेताना...

Early Education : पालकांच्या प्रचंड अनाठायी अपेक्षांमुळे अगदी नर्सरीला जाणारे मूल देखील आज टेन्शनमध्ये आहे, याची जाणीव मात्र या पालकांना नाही. मुलांना समजून घेणाऱ्या सुजाण पालकत्वाचे शिक्षण देण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे.
Early Education
Early EducationAgrowon
Published on
Updated on

शिवाजी काकडे

Indian Kids Education : औराद शहाजादी जि. लातूर इथे एका महिलेने आपल्या मुलांना सीबीएसई शाळेत प्रवेश घेता येत नाही म्हणून आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याची बातमी वाचून मनाला धक्का बसला. खरचं स्वतःच्या, मुलांच्या आयुष्यापेक्षा अधिक महत्त्वाची होती का सीबीएसई माध्यमाची शाळा? का मोह झालाय आम्हाला या महागड्या शिक्षणाचा! अनेक पालकांना मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतला म्हणजे आपली जबाबदारी पूर्ण झाली असे वाटते. मुलांना प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत टाकले म्हणजे मुले शिकतात, असा पालकांना समज आहे. पण मुले शिकतात कशी, हे मात्र पालकांना माहीत नसत.

इंग्रजीचा शाळा आणि ग्रामीण मुले

आपली मुलं शिकून मोठी व्हावीत अस सर्वच पालकांना वाटत असत. मुलांना चांगली शाळा मिळावी, त्याच्या शिक्षणात काही कमी पडू नये यासाठी पालक शक्य ते सारे प्रयत्न करीत असतात. पण मुलं शिकतात कशी, हे मात्र पालकांना माहीत नसत. प्रसिद्ध लेखक शिवराज गोर्ले यांचा एक मार्मिक लेख काही वर्षांपूर्वी वाचनात आला होता. पालकांच्या चांगल्या शाळेविषयीच्या ''श्रद्धा'' त्यांनी सांगितल्या. शाळा इंग्रजी माध्यमाची असेल म्हणजे शिक्षणाचा दर्जा उच्चप्रतीचा असतो.

झकपक टाय व बुटासहित गणवेश असला की, आपोआप शिकणे दर्जेदार होते. खूप पुस्तके, गाइड यांचा खर्चाचा बोजा पालकांवर लादणारी, जास्त फी आकारणारी व मुलांवर दप्तरांचे ओझे लादणारी शाळा उत्तम असते. पालकांना शाळेत न येऊ देणारी, कडक शिस्तीची शाळा म्हणजे उत्तम शाळा होय. अशी मार्मिक पद्धतीने टीका लेखक शिवराज गोर्ले यांनी पालक प्रबोधनासाठी केली होती. शहरांप्रमाणे आज ग्रामीण भागामध्ये पालकांमध्ये इंग्रजी शाळांचे प्रचंड आकर्षण आहे.

मुलांच्या भविष्याची काळजी म्हणून मुलगा तीन वर्षांचा होताच त्याला गावापासून दूर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले जाते. मुलांना घेण्यासाठी येणारी पिवळी बस हे खास आकर्षण! मुलांना शाळेच्या भीतीपोटी लवकर उठावे लागते, त्यामुळे मुलांचे पोट साफ न होणे, गाडी येण्याच्या वेळेला शौचास आल्याची भावना होणे, पचनाच्या समस्या, गाडी हुकेल या भीतीपोटी मनात कसेतरी होणे, चिडचिड होणे या व इतरही भावनिक, मानसिक आणि शारीरिक समस्या मुलांमध्ये वाढतात.

Early Education
Education Scholarship : ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती

तास दोन तासांचा प्रवास याचे परिणाम मुलांवर होतात. यामुळे मुले शिकण्यापेक्षा अभ्यासात मागे पडतात. लहान मुलांना भावनिक आधार हवा असतो तो गावातल्या शाळेतच मिळतो. ज्या गोष्टी शिकताना आपल्याला आनंद मिळतो तेच खरे शिक्षण होय. सरकारी शाळेतील शिक्षकांना मुलं कशी शिकतात, याचे उत्तम प्रशिक्षण दिलेले असते. खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये केवळ घोकंपट्टी आणि खूप सारा लिहिण्याचा अभ्यास मुलांना दिला जातो.

परवाच एका कार्यक्रमात बोलताना एनसीईआरटी चे संचालक डी. पी. सकलानी यांनी सांगितले की, इंग्रजी शाळांबद्दल पालकांमध्ये असलेले आकर्षण हे आत्मघात करण्यासारखे आहे. आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. केवळ सामाजिक प्रतिष्ठेसाठी अनेक पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. यामुळे मुलांचे प्रचंड नुकसान होते. मातृभाषेतील शिक्षणच मुलांच्या मेंदू विकासासाठी पोषक आहे. मुले शिकतात कशी आणि मुलांच्या मेंदू विकासाचे प्रशिक्षण शिक्षकांबरोबर पालकांना देखील देणे आवश्यक आहे. तरच मुले चांगली शिकू शकतील.

Early Education
Right To Education : शिक्षण हक्क कायद्याच्या नियमांत बदल का केला?

सुरुंगाने पहाड फोडता येतो पण...

एखादा मोठा डोंगर फोडायचा असेल तर तो सुरुंगाने सहज फोडणे शक्य आहे. परंतु या सुरुंगाने कळी उमलता येत नाही. कळी उमलण्यासाठी सुरुंगाचा वापर केला तर तिच्या चिंधड्या - चिंधड्या उडतील. कळीचे फुल होण्यासाठी तिला जपावे लागते, उमलण्यासाठी रात्र जाऊन सकाळ होण्याची वाट पाहावी लागते. मुलांना घडविण्यासाठी देखील असेच जपण्याची, वाट पाहण्याची गरज आहे.

आपल्या मुलांनी बडबड करू नये, खेळू नये, सतत अभ्यास करत राहावा, अभ्यास केला नाही तर कडक शिक्षा करावी, असे पालकांना वाटते. शाळेत मुले खेळताना दिसली की, पालकांचा शाळेविषयी दुराग्रह होतो. सर यांना खूप अभ्यास द्या, खेळू देऊ नका आणि अभ्यास केला नाही तर यांना मारा एवढ्याच सूचना पालक करतात. घरीही केवळ अभ्यास कर, अभ्यास कर असा उपदेश वारंवार मुलांना करतात.

मुलांना सतत उपदेश करत राहणे योग्य नाही. मुलांनी जे काही केले त्याचही ‘तू हे छान केलंस हं’ असंही कौतुक पालकांनी जरूर करावं. मुलांचं कौतुक केलं की ती खुलतात, फुलतात आणि अजून चांगलं काम करतात. आई - वडील आणि शिक्षकांच्या प्रेम, विश्वास, कौतुक आणि संवादामुळे मुलांचे आत्मबळ वाढते. मुलांची शिकण्याची गती वाढते. शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया शिक्षक आणि पालकांनी समजून घ्यावी. पालकांच्या शिक्षणविषयक चुकीच्या कल्पना मुलांच्या शिक्षणात अडथळा ठरतात.

प्रत्येक मूल शिकू शकते

प्रत्येक मूल वेगळं असतं आणि प्रत्येक मूल शिकू शकते. हार्वड गार्डनर च्या मते प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळी बुद्धिमत्ता असते. भाषिक बुद्धिमत्ता, गणितीय, शारीरिक, संगीतविषयक, अवकाशीय, निसर्गवादी, अस्तित्वविषयक, आंतरवैयक्तिक आणि व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. असे बुद्धिमत्तेचे प्रकार आहेत. प्रत्येक मुलाची बुद्धी, कल, अभिरुची वेगवेगळी असते. त्यामुळे केवळ परीक्षेतील गुणांच्या आधारे मुलांचे मूल्यमापन होत नाही.

पालकांनी विशिष्ट परीक्षेला मुलांना पास होण्याचा आग्रह करू नये किंवा इतरांशी आपल्या मुलांची तुलना करू नये. केवळ पाठ्यपुस्तकांची घोकंपट्टी करून परीक्षेत गुण मिळविणे म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षण म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक , सामाजिक आणि आध्यात्मिक विकास होय. पालकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांचा आहार, व्यायाम, खेळ, कला, अवांतर वाचन याकडेही लक्ष द्यावे.

वाचन, चिंतन आणि मनन यातून मुलांचा सर्वांगीण विकास होतो. आज शिक्षणातून केवळ अस्वस्थ आणि असमाधानी पिढी जन्माला येत आहे. शिक्षणातून मुलांचे बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक जीवन समृद्ध होऊन आपली मुले मनातून शांत, समाधानी, आनंदी आणि मूल्य जपणारी व्हावी यासाठी मुलांचे मूलपण पालकांनी समजून घ्यावे. मुलांवर कोणतेही दडपण न टाकता ती शिकावी कारण सुरुंगाने पहाड फोडता येतो पण कळी उमलता येत नाही.

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com