डॉ. मुकुंद देशपांडे
Indian Agriculture : खरीप हंगाम सुरू झाला आहे. मातीची सुपीकता, मशागतीपासून पेरणीच्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त आहेत. अशा सर्व कामांमध्ये शेतकरी ‘डू इट यूवरसेल्फ’ ही संकल्पना किंवा तंत्रज्ञान खूप चांगल्या प्रकारे राबवू शकतात. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना राबवली जाते. त्यातील कामांच्या काही पद्धती येथे पाहूया.
पीक फेरपालट
‘डू इट युवरसेल्फ’ तंत्रज्ञान पद्धतीतील महत्त्वाचा मुद्दा आहे पीक फेरपालट. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. नत्राचे प्रमाण जमिनीत वाढविण्यासाठी डाळवर्गीय पिके उपयोगी ठरतात. आजकाल नत्रयुक्त खतांच्या किमती वाढत असल्याने हा पर्याय वरदान ठरू शकतो.
वेगवेगळ्या डाळवर्गीय पिकांमध्ये मुळांवर ज्या गाठी असतात त्या रायझोबियम या जिवाणूंमुळे आलेल्या असतात. हवेतील नायट्रोजन अमोनियाच्या स्वरूपात पिकांना मिळवून देण्याचे कार्य हा जिवाणू करतो. कोणत्या पिकासाठी रायझोबियमची कोणती प्रजाती वापरणे योग्य आहे, ज्यायोगे उत्पादन वाढेल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
विविध निविष्ठांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीतील कार्बन हवेत कार्बन डायऑक्साइडच्या रूपात जातो. साधारणपणे जमिनीत ३ ते ६ टक्के सेंद्रिय पदार्थ असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक जमिनींमध्ये एक टक्कादेखील सेंद्रिय पदार्थ नसतात.
सेंद्रिय कर्बाचे महत्त्व
पिकांचे अवशेष जमिनीत गाडले गेले की कार्बनचे प्रमाण वाढते. जमिनीत सेंद्रिय कर्ब दोन टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ती जमीन सुपीक समजली जाते. टेराप्रेटा या नैसर्गिक रित्या तयार झालेल्या मातीत कोळसा, राख आणि सेंद्रिय पदार्थ असतात.
त्याचेच नवे रूप म्हणजे बायोचार. वनस्पतींची पाने, तण, लाकूड आदी पदार्थ कमी हवेत जाळल्यावर तयार होणारा कोळसा म्हणजे बायोचार असून तो सच्छिद्र असतो. त्यामुळे सेंद्रिय खते त्यात जिरवता येतात. जिवाणूंची त्यात वाढ चांगली होते.
गांडूळ खताचे महत्त्व
गांडुळे जमिनीचा पोत सुधारण्याचे कार्य करतात. माती खाऊन त्यातील जाड कण आतड्यांत भरडून त्यांचे बारीक कणांत रूपांतर होते. शिवाय ते मातीचे थर खालीवर करतात. गांडुळांची जोमाने वाढ करण्यासाठी झाडांची पाने, कापलेले गवत, तण, काडीकचरा, पालापाचोळा, भाज्यांचे टाकाऊ भाग, शेणखत, लेंडीखत आदींचा वापर होतो.
गांडूळ खताच्या वापराने जमीन भुसभुशीत, हवेशीर, सुपीक होते. तिची जलधारणक्षमता वाढते. बहुतेक संशोधकांच्या मते गांडूळ खताची पोषणमूल्ये ही कंपोस्ट खतांपेक्षा जास्त आहेत. पालापाचोळा, गवत खड्ड्यात भरून किंवा जमिनीवर ढीग करून सेंद्रिय पदार्थांपासून कंपोस्ट तयार करता येते.
मायकोरायझा
पिकाच्या वाढीसाठी मायकोरायझा ही मित्रबुरशी महत्त्वाची आहे. शेतकरी आपल्या शेतात तिची निर्मिती करू शकतात. साधारपणे तीन महिन्यांत ती तयार करता येते. ही बुरशी जवळपास ८० टक्के वनस्पतींच्या मुळावर जगते. वनस्पतीच्या मुळांवर किंवा मुळांच्या आत ती वाढते.
पिकाला स्फुरद, नत्र, गंधक तसेच तांबे, जस्त, मॅग्नेशिअम आणि लोह यांची उपलब्धता वाढवून देते. त्यामुळे खत वापरात ५० टक्के बचत होऊ शकते. त्याचप्रमाणे या बुरशीचे कवकजाल खोलवर जात असते. वनस्पतीची मुळे तिथवर पोहोचत नाहीत. त्यामुळे पिकाला पाणी पोचवण्याचे काम होते. मका, बाजरी, गहू, कांदा,
सोयाबीन, वाटाणे, मसूर, अल्फाअल्फा (लसूण-घास) अशी पिके मायकोरायझा वाढविण्यासाठी उपयोगी असतात. या पिकांचे अवशेष पुन्हा जमिनीत गाडून पुढील पिकासाठी त्याचा उपयोग करून घेता येतो. काही वनस्पती, तसेच कोबी, बीटवर्गीय पिके मात्र मायकोरायझा तयार करीत नाहीत.
वनस्पतींचे अर्क
अनेक वनस्पती वेगवेगळी कीडनाशक संयुगे तयार करतात. त्यामुळे त्यांचा एकात्मिक कीड व्यवस्थापनात वापर करता येतो. निंबोणीच्या पानांचा आणि बियांचा अर्क रसशोषक किडी व अळीवर्गीय कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडतो. निंबोणी प्रमाणे अनेक वनस्पतींचे उकळत्या पाण्यात केलेले अर्क देखील शेतीमध्ये वापरता येतील.
यात सीताफळाची पाने, बिया आणि कच्ची फळे, मिरची, लसूण, आल्याचा कंद, पपई, हळदीचा कंद, तुळशीची पाने आणि खोड आदींचा समावेश करता येतो. आफ्रिकन झेंडूची शेताभोवती लागवड फायदेशीर ठरते.
एकात्मिक कीड नियंत्रणात पक्षी
एकात्मिक कीड नियंत्रणात पक्षी कसे उपयोगी पडतात यावर अभ्यास केला गेला आहे. तुरीच्या पिकात घाटे अळीचे काही प्रमाणात नियंत्रण पक्ष्यांमुळे होऊ शकते. त्यात अग्रभागी असतो तो कोतवाल. त्याचबरोबर मैना, वेडा राघू, बुलबुल, चिमण्या हे पक्षीही कीड नियंत्रणात हातभार लावतात. अनेक पक्षी घाटे अळी, कोळी, किंवा अन्य किडी खाण्यासाठी शेतात येतात.
काही वेळा शिकार करणारे पक्षी शेतात नुसते असले तरी उंदीर आणि धान्याची नासाडी करणारे पक्षीही दूर जातात. शेतकऱ्यांना कमी श्रमात आणि खर्चात कीड नियंत्रणाचा परिणाम साधता येतो. यासाठी थोड्याच गोष्टी कराव्या लागतात. पक्ष्यांना बसण्यासाठी जागा, राहण्यासाठी घरटी आणि पिण्यासाठी पाणी.
रोगप्रतिकारक जमीन तयार करणे
रोगांचे नियंत्रण करणारी मित्रबुरशी, जिवाणू यांचे प्रमाण जमिनीत वाढवून रोग प्रतिकारक जमीन तयार करता येते. उदाहरण सांगायचे तर झाडांच्या मुळांवर हल्ला करणाऱ्या बुरशींमध्ये स्क्लेरोशियम किंवा फ्युजारियम यांचा समावेश होतो.
ट्रायकोडर्मा या मित्रबुरशीचे जमिनीतील प्रमाण वाढविल्यास या शत्रूबुरशींचे प्रमाण कमी होते. जमिनीतील हानिकारक कीड, सूत्रकृमी यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी मेटारायझियम, पॅसिलोमायसिस या मित्रबुरशी तसेच बॅसिलस हा मित्र जिवाणू उपयोगात येतो.
मेटारायझियम, बिव्हेरिया आदी मित्रबुरशी अनेक विकरे तयार करून जमिनीतील रोगजन्य बुरशींना मारतातच. पण त्या पिकांच्या मुळांमध्ये पानांमध्ये, फुले आणि फळांमध्ये वाढतात आणि सहजीवन साकारतात. त्यांच्या उपस्थितीमुळे पिकाची रोग आणि कीड प्रतिकारक शक्ती वाढते. वाढ चांगली होते आणि ताण सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते.
मित्र जिवाणू, बुरशी शेतात वाढवताय?
रोगकारक बुरशीची पेशी भित्तिका तोडण्यासाठी ट्रायकोडर्मा बुरशी काही ‘कायटिनेज’ नावाचे विकर तयार करते. काही संशोधन संस्थांमध्ये या कायटिनेज विकरनिर्मितीच्या जनुकाचा वापर करून रोगकारक बुरशीचा प्रतिकार करणारी जनुकीय सुधारित वनस्पती तयार करण्यावर संशोधन सुरू आहे.
मित्र जिवाणू व बुरशी शेतात तयार करणे शक्य आहे का? या मुद्द्यावर बोलायचे तर एखादा जिवाणू शेतात वाढवायचा असेल, तर त्याला दुसऱ्या कोणाबरोबर पोषण स्पर्धा नको असते. अशा अवस्थेत तो हव्या असलेल्या गुणधर्मासहित वाढू शकत नाही. आगंतुक अन्य जिवाणू मात्र जोमाने वाढतात. त्यामुळे आपल्याला अपेक्षित मित्र जिवाणू वाढविताना निर्जंतुकीकरण आवश्यक असते. तीच गोष्ट बुरशी वाढविण्याची.
बुरशी हळूहळू वाढते. तर जिवाणू जोमाने पटीत वाढतात आणि सर्व पोषक द्रव्ये संपवतात. मग बुरशी हवी तेवढी आणि तशी वाढत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट गुणात्मक आणि परिणामात्मक वाढ नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. हे जिवाणू सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नसल्याने पुढे काय वाढून ठेवले आहे हे कळत नाही. त्यांचा उपयोग आणि परिणाम हवा असल्यास त्याचे संपूर्ण शास्त्रीय ज्ञान माहीत होणे गरजेचे असते.
- डॉ. मुकुंद देशपांडे, ९०११३५८९७७, (लेखक निवृत्त जैवरसायनशास्त्रज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.